मुंबई : “मुंबईकरांचे आयुष्य प्रवासातच जाते, हे चित्र आम्हाला बदलायचे आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावरील (WEH) ताण कमी करण्यासाठी आम्ही कोस्टल रोडचे जाळे विरारपर्यंत विस्तारणार आहोत. १५ तारखेला तुम्ही महायुतीचे धुरंधर निवडून द्या, १६ तारखेपासून तुमच्या भविष्याची काळजी आम्ही घेऊ,” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचार सभेत ते बोलत होते.
मुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या पायाभूत सुविधांबाबत अनेक महत्त्वाकांक्षी घोषणा केल्या:
वांद्रे-वर्सोवा कोस्टल रोडचे काम सुरू असून २०२८ पर्यंत हा मार्ग भाईंदर आणि पुढे विरारपर्यंत नेण्याचे महायुतीचे स्वप्न आहे. बोरिवली ते ठाणे दरम्यान होणाऱ्या भुयारी मार्गामुळे दीड तासाचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांत पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले. पश्चिम द्रुतगती महामार्गाला समांतर असा गोरेगाव ते मागठाणे डीपी रोड तयार करून वाहतूक कोंडी फोडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
झोपडपट्टीमुक्त मुंबईचा संकल्प
सामान्य माणसाच्या घराच्या प्रश्नावर भाष्य करताना फडणवीस म्हणाले की, “झोपडपट्टीत राहणाऱ्या प्रत्येक मुंबईकराला हक्काचे घर देणे आणि मुंबई झोपडपट्टीमुक्त करणे हा आमचा संकल्प आहे. ओसी (OC) नसलेल्या इमारतींना लावली जाणारी दुप्पट पाणीपट्टी आम्ही रद्द केली असून, एसआरएच्या (SRA) माध्यमातून पुनर्विकासाचे अनेक प्रकल्प युद्धपातळीवर हाती घेतले आहेत.”
दहिसर रडारचा प्रश्न मार्गी!
दहिसरमधील एअरपोर्ट अथॉरिटीच्या रडारमुळे अनेक इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न प्रलंबित होता. “हा प्रश्न सोडवण्यासाठी महायुती सरकारने पाठपुरावा करून तो मार्गी लावला असून आता सामान्य माणसाला मोफत घरांचा मार्ग मोकळा झाला आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
या सभेला मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम, आमदार अतुल भातखळकर, आमदार संजय उपाध्याय, आमदार योगेश सागर, आमदार प्रवीण दरेकर आणि माजी खासदार गोपाळ शेट्टी यांसह महायुतीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.