Sunday, January 11, 2026

वसई-विरारच्या विकासासाठी महायुतीला संधी द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Share

नालासोपारा : वसई-विरार-नालासोपाऱ्याचा सर्वांगीण आणि भ्रष्टाचारमुक्त विकास साधण्यासाठी महायुतीला संधी देण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. वसई-विरार महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ नालासोपारा येथे आयोजित ‘विजयी संकल्प सभे’त ते बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत वसई-विरार आणि नालासोपाऱ्याच्या जनतेने विकासाच्या दिशेने मोठा निर्णय घेत क्रांतिकारी परिवर्तन घडवून आणले. आता हे शहर मागे राहणार नाही किंवा थांबणार नाही. पुढील परिवर्तन महानगरपालिकेतून घडवायचे असून, त्यासाठी जनतेने ठाम निर्धार केला आहे.

याआधी सत्तेत असलेल्या लोकांनी वसई-विरार महानगरपालिकेचा वापर विकासासाठी न करता केवळ ‘ATM’ म्हणून केला, असा आरोप त्यांनी केला. भ्रष्टाचारातून स्वतःची घरे भरली गेली, गुंडगिरी वाढली आणि त्यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) हा भाग विकासाच्या शर्यतीत मागे पडला. दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, कष्टकरी नागरिकांचे जीवन कठीण झाले, असे त्यांनी सांगितले.

एक वर्षापूर्वी विधानसभेतून विकासाच्या मार्गातील पहिला अडथळा दूर करण्यात नागरिक यशस्वी झाले असून, आता महानगरपालिकेत दुसरा अडथळा दूर करून संपूर्ण परिवर्तन घडवण्याची वेळ आली असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

वसई-विरार-नालासोपाऱ्याच्या भविष्यातील विकासाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, बुलेट ट्रेन, मेट्रो आणि उत्तन-विरार सागरी महामार्गामुळे या भागाची ओळख बदलणार आहे. बुलेट ट्रेन स्टेशन परिसरात BKCच्या धर्तीवर आधुनिक बिझनेस डिस्ट्रिक्ट उभारून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती केली जाईल.

याशिवाय गरिबांची घरे सुरक्षित ठेवण्यासाठी नवे क्लस्टर धोरण राबवले जाईल. पाण्याची समस्या सोडवण्यासाठी आवश्यक निधी दिला जाईल. हरितपट्टा आणि कोळी बांधवांच्या घरांचे संरक्षण केले जाईल. अतिरिक्त लोकल स्टेशन, पूरनियंत्रणासाठी विकासकामे, रेल्वे ओव्हरब्रिज, उड्डाणपूल, रिंगरोड तसेच नालासोपाऱ्यात मल्टी-स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

वाढवण बंदर प्रकल्पासोबत पालघर जिल्ह्यात ‘तिसरी मुंबई’ साकारत असून, या भागात विमानतळ उभारण्याची योजनाही असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण, मंत्री प्रताप सरनाईक, खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

अन्य लेख

संबंधित लेख