Saturday, December 6, 2025

‘डिजिटल संविधान चित्ररथ’चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन; महाराष्ट्रात जनजागृतीसाठी विशेष उपक्रम!

Share

मुंबई : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘संविधान अमृत महोत्सवी वर्षा’निमित्त ‘डिजिटल संविधान चित्ररथ’ तयार करण्यात आलेला आहे. या चित्ररथाचे उद्घाटन आज ६ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. मुंबईतील प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिराच्या प्रांगणात हा शानदार सोहळा पार पडला. याप्रसंगी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, माजी राज्यमंत्री भाई गिरकर, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे, पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

हा चित्ररथ राज्यात विविध ठिकाणी फिरणार आहे. या चित्ररथामध्ये संविधानाची माहिती, संविधानाच्या मुलतत्त्वावरील माहिती, महत्त्वाची घडामोडी व लोकशाहीच्या मुल्यांवरील कलात्मक सादरीकरण व याबाबतचे प्रदर्शन बघायला मिळेल. या चित्ररथाद्वारे संविधान बाबतची जनजागृती करण्यात येणार आहे. संविधानाची माहिती सर्वसामान्यांना माहित व्हावी, या उद्देशाने या चित्ररथाची निर्मिती करण्यात आलेली आहे. राज्यातील जास्तीत जास्त जनतेने या चित्ररथ प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले आहे.

अन्य लेख

संबंधित लेख