मुंबई : कोणत्याही राष्ट्रात युगपुरुष जन्माला येतात तेव्हा सामाजिक न्यायाची चळवळ बळकट होते. भारत हा विविधतेने नटलेला देश असून इतक्या मोठ्या राष्ट्रात एकता, न्याय व समाजाची संघटित भावना दृढ करण्यासाठी संविधान निर्माण करणे हे अत्यंत मोठे व ऐतिहासिक कार्य होते. देशाच्या सामाजिक विविधतेत सर्वांना एकत्र बांधणारे व समान अधिकार प्रदान करणारे संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्राला दिले, असे प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले. मुंबईतील दादरच्या चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेबांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह समाजाच्या सर्वक्षेत्रातील मान्यवर तसेच डॉ. बाबासाहेबांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यपाल आचार्य देवव्रत म्हणाले, एखादे व्यक्तिमत्त्व जगातून गेले तरी त्यांचे विचार व कार्य जनतेच्या अंत:करणात सदैव जिवंत राहतात, त्यातूनच बाबासाहेब अमर आहेत. कठोर परिस्थितीतून शिकून त्यांनी संपूर्ण समाजाचा भविष्यकाळ बदलण्यासाठी शिक्षणाला सर्वात मोठे शस्त्र मानले. एक सुशिक्षित व्यक्ती संपूर्ण घराचे, समाजाचे आणि देशाचे भविष्य बदलू शकतो हा संदेश त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दिला.
सर्वप्रथम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केले. यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते सर्व भिक्खूंना चिवरदान देण्यात आले. त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने आयोजित छायाचित्र प्रदर्शनास मान्यवरांनी भेट दिली. यावेळी चैत्यभूमीवर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य त्रिभाषा धोरण समितीचे अध्यक्ष डॉ नरेंद्र जाधव यांनी सर्व मान्यवरांना संविधानाची प्रत दिली.