महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आणि लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा आता देशाच्या सीमा ओलांडून जागतिक व्यासपीठावर पोहोचली आहे. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने आयोजित ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६’चा विस्तार यंदा प्रथमच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे परदेशात वसलेल्या मराठी बांधवांमध्ये आणि गणेशभक्तांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे.
यंदाच्या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय श्रेणी समाविष्ट केल्यामुळे जपान, श्रीलंका, जर्मनी, नायजेरिया आणि सिंगापूर यांसारख्या विविध देशांतील गणेशोत्सव मंडळांनी सहभाग नोंदवला आहे. नागरिकांनी केवळ परदेशात जाऊन आपले स्थान निर्माण केले नाही, तर आपल्यासोबत भारतीय संस्कृती आणि गणेशोत्सवाची समृद्ध परंपराही तिथे नेली. परदेशात राहूनही आपली संस्कृती, परंपरा आणि सण-उत्सव जपणाऱ्या अनिवासी भारतीयांच्या उपक्रमांची दखल घेण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. स्पर्धेसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २५ सप्टेंबर असून, आतापर्यंत राज्यभरातून ४३२ मंडळांनी नोंदणी केली आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातून सर्वाधिक ५२ अर्ज प्राप्त झाले आहेत.
लंडनचे टॉवर ब्रिज असो, टोकियोची रस्ते असोत, फ्रँकफर्ट शहर असो किंवा नायजेरियातील भारतीय वस्त्या असोत—भाद्रपद महिन्यात जगभरात ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर गुंजत असतो. मात्र, आतापर्यंत या परदेशी मंडळांना महाराष्ट्राच्या अधिकृत शासकीय पातळीवरील उपक्रमांशी थेट जोडणारी कोणतीही व्यवस्था नव्हती.
यंदा सांस्कृतिक कार्य विभागाने ही दरी मिटवली आहे. यामुळे जगभरातील मराठी आणि भारतीय समाज हिंदू मनाशी, महाराष्ट्राच्या मूळ सांस्कृतिक प्रवाहाशी जोडून ठेवले आहे. परदेशात अत्यंत प्रतिकूल किंवा भिन्न सामाजिक परिस्थितीतही मराठी भाषा, सण आणि परंपरेचे जतन करणाऱ्या मंडळांच्या प्रयत्नांचा गौरवल आहे.
स्पर्धेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर, तसेच राज्यस्तरावर प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे ७ लाख ५० हजार रुपये (प्रथम), ५ लाख रुपये (द्वितीय) आणि २ लाख ५० हजार रुपये (तृतीय) अशी रोख पारितोषिके दिली जाणार आहेत. याशिवाय तालुकास्तरावर प्रथम विजेत्यास २५ हजार रुपये, तर जिल्हास्तरावर अनुक्रमे ५० हजार, ४० हजार व ३० हजार रुपयांची पारितोषिके प्रदान केली जातील.
जगभरातील गणेशभक्तांना महाराष्ट्रातील सार्वजनिक आणि घरगुती गणपतींचे थेट दर्शन घेता यावे यासाठी https://ganeshotsav.pldmka.co.in हे विशेष ‘गणेशोत्सव’ पोर्टल खुले करण्यात आले आहे. या राज्यव्यापी व जागतिक महोत्सवात सर्व गणेश मंडळांनी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले आहे.