विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून सर्व क्षेत्रांत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रिया कामे करू लागल्या. पण गृहकृत्यांच्या जबाबदारीतून तिला सुटका मिळालेली नाही. साहजिकच घर आणि नोकरी यातली दुहेरी कसरत सांभाळताना, स्वतःच्या शारीरिक आरोग्याबाबत तिच्यापुढे अनेक समस्या उभ्या राहात गेल्या.
विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून सर्व क्षेत्रांत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रिया कामे करू लागल्या. त्यामुळे ‘अबला नारी’चे आर्थिक बाबतीत काहीसे सक्षमीकरण झाले खरे; पण तिच्या या घराबाहेरील कर्तृत्वाबरोबर, आज एकविसाव्या शतकातही गृहकृत्यांच्या जबाबदारीतून तिला सुटका मिळालेली नाही. घर आणि नोकरी यातली दुहेरी कसरत सांभाळताना आजची नोकरदार महिला स्वतःच्या आरोग्य समस्या कडे पाहिजे तसे लक्ष देताना दिसत नाही.
वयोगटात आणि आजारात बदल – पंचवीस – तीस वर्षांपूर्वी सर्वसाधारणपणे स्त्रियांचे आजार वयाच्या चाळीशीनंतर दिसू लागायचे, आज तेच विकार घेऊन विशीतल्या तरुण मुली दवाखान्याच्या पायऱ्या चढताना दिसत आहेत. यात पूर्वीच्या त्रासांबरोबर बदललेल्या जीवनशैलीच्या नवनव्या शारीरिक समस्या दिसून येत आहेत.
आजच्या नोकरी करणाऱ्या स्त्रियांमध्ये दिसून येणाऱ्या या आजारांबाबत ‘असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स अण्ड इंडस्ट्रीज’ (असोचॅम) यांनी पुणे, मुंबई, अहमदाबाद, चेन्नई, बेंगळुरू, दिल्ली, हैदराबाद, जयपूर, कोलकाता आणि लखनौ या शहरातील १२० मोठ्या कंपन्यांत काम करणाऱ्या २८०० स्त्रियांची नमुना चाचणी केली. या पाहणीच्या अहवालानुसार –
- ७५ टक्के स्त्रियांमध्ये कुठला न कुठलातरी गंभीर त्रास आढळून आला.
- ७८ टक्के स्त्रियांमध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, लट्ठपणा, रक्तातील कोलेस्टेरॉलची वाढ, मूत्रपिंडाचे आजार, हृदयरोग असे त्रास होते.
- ४२ टक्के स्त्रियांमध्ये त्यांच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुले पाठ-कंबरदुखी, निद्रानाश, नैराश्य, चिंता असे आजार आढळून आले.
- जागतिक आर्थिक मंदीमुळे आपली नोकरी सुटली तर आपल्या पोटावर पाय येईल ही तीव्र भीती या सर्व महिलांमध्ये प्रकर्षाने आढळली.
- यापैकी ९० टक्के स्त्रिया आपल्या आजारासाठी कुठलाही वैद्यकीय उपचार नियमितपणे घेत नव्हत्या.
घर सांभाळून नोकरी करणाऱ्या स्त्रियांमध्ये प्रामुख्याने आढळणारे आजार
१. ॲनिमिया: ७० टक्क्याहून अधिक भारतीय स्त्रिया अॅनिमियाने ग्रस्त आहेत. नोकरीतील आणि घरातील कामाच्या वेळातील कसरतींमुळे, खाण्याच्या वेळा कधीच पाळल्या जात नाहीत. त्यातच चौरस आणि सकस आहाराची तत्त्वे न सांभाळता आल्याने, मिळेल ते आणि जमेल तेव्हा खाणे या गोष्टी घडतात. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. अशक्तपणा, दम लागणे ही लक्षणे दिसतात.
ॲनिमिया हा एक शारीरिक विकार आहे यात लाल रक्तपेशींची संख्या किंवा त्यांच्यातील हिमोग्लोबिनचे प्रमाण सामान्य पातळीपेक्षा कमी असते. भारतात मोठ्या संख्येने स्त्रिया आणि मुले अॅनिमिक आढळतात. वारंवार पडणारे दुष्काळ, त्यानंतर झालेली हरितक्रांती, विसाव्या शतकाच्या अखेरीस सुरू झालेले जागतिकीकरण, औद्योगिक, संगणकीय, विविध प्रकारच्या सेवा देणाऱ्या कंपन्यांची वाढ आणि पाश्चात्य संस्कृतीचा वाढता परिणाम, यातून सर्व आर्थिक स्तरातल्या स्त्रियांच्या आहार पद्धतींमध्ये बदल होत गेले. स्वातंत्र्योत्तर काळापासून आजपर्यंत स्त्रियांमध्ये ॲनिमियाचे प्रमाण सातत्याने वाढतच चालले आहे.
राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणामध्ये (NHFS) 2019-20 भारतातल्या बहुतेक सर्व राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये, अर्ध्याहून अधिक स्त्रियांना अॅनिमिया असल्याचे आढळले. या आकडेवारीतून स्त्रियांमधल्या या आरोग्य संकटाशी निगडित, विश्लेषण आणि उपाय योजना करण्याची तातडीची गरज अधोरेखित करते.
ॲनिमिया आणि भारतीय वर्किंग विमेन
नोकरी – व्यवसाय करणाऱ्या भारतीय महिलांमध्ये अशक्तपणाचे सर्वांत प्रमुख कारण म्हणजे आहारात कडधान्यांचा अभाव. गहू आणि तांदूळ यांच्यावर जास्त अवलंबून राहणे आणि हिरव्या पालेभाज्यांचा पुरेसा वापर न होणे या पारंपरिक आहारदोषांमध्ये, कमी पोषणमूल्ये असलेल्या पॅकेज्ड आणि प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांच्या, जंकफूड आणि फास्टफूडच्या सेवनात कमावत्या महिलांमध्ये झालेली वाढ, हे देखील त्यांच्या अॅनिमियाचे एक प्रमुख कारण आहे.
ॲनिमियाच्या कारणांमध्ये लोहाच्या कमतरतेची कारणे पाहिली, तर सामाजिक वर्ग, जात आणि धर्म यांचा प्रभाव दिसून येतो. राममोहन आणि निवी अव्ययफेसो या समाज शास्त्रज्ञांनी केलेल्या सर्वेक्षण संशोधनामध्ये हा निष्कर्ष काढला आहे. धान्याचा साठा अपुरा असलेली दुष्काळी राज्ये, गरीबी आणि जातीयतेमुळे होणारी उपेक्षा, यामुळे ॲनिमियाचे प्रमाण वाढले आहे, असे या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. श्रीमंत, विशेषाधिकारप्राप्त सामाजिक गटांच्या तुलनेत सर्वांत गरीब, अधिक अत्याचारित गटातील रोजगार करणाऱ्या आणि नोकरी-व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांमध्ये मध्यम ते गंभीर अॅनिमियाची टक्केवारी जास्त आढळते.
सामाजिक कारणांमध्ये, समाजातल्या पितृसत्ताक पद्धतीमध्ये स्त्रियांबाबत जन्मापासूनच भेदभाव केला जातो. परिणामतः त्यांना लहानपणापासून पुरेशा प्रमाणात पोषण मिळत नाही. जेवताना आधी पुरुष आणि मुले जेवतात, उरलेले अन्न मुली आणि इतर स्त्रियांना मिळते. स्त्रियांना आवडणाऱ्या पदार्थांपासून त्यांना वंचित केले जाते. त्यात पुन्हा परंपरागत चालत आलेले महिन्याभरातले ५-६ उपवास अॅनिमियामध्ये भर टाकतात.
आहाराबरोबरच, मासिक पाळी, गर्भावस्था, बाळांना स्तनपान करणे यातून स्त्रियांचे हिमोग्लोबिन घटत जाते. गर्भावस्थेच्या सुरुवातीपासूनचे नऊ महिने आणि स्तनपानाची दोन वर्षे या पावणे तीन वर्षांच्या काळात स्त्रियांना लोह, जीवनसत्त्वे, प्रथिने यांनी समृद्ध आहार देण्याची गरज असते. परंतु ते कोणत्याही आर्थिक स्तरात दिले जात नाही. कमावत्या नोकरदार स्त्रियांमध्येही या काळात योग्य आहार आणि उपचाराची आवश्यकता पूर्ण केली जात नाही.
२. वजनवाढ: घरातली कामे उरकून कामावर निघणे, कामाच्या जागेवर पोहोचेपर्यंतचा प्रवास, त्यानंतर ६ ते ८ तासांची ड्युटी संपवून पुन्हा घरी येण्याचा प्रवास आणि घरात आल्यावर त्यापुढची घरकामे या दैनंदिन कामात गुरफटलेल्या नोकरदार आणि व्यावसायिक स्त्रियांना साहजिकच व्यायामासाठी वेळही मिळत नाही. या धबडग्यात त्या इतक्या दमून गेलेल्या असतात की त्यांना व्यायामासाठी उत्साहही उरत नाही.
यात भर म्हणून, सुट्टीच्या दिवशी स्वयंपाकालासुद्धा सुट्टी देऊन बऱ्याचदा फास्टफूड, बाहेरचे चमचमीत, तळलेले पदार्थ, चरबीयुक्त पदार्थ खाण्यात येतात. त्यामुळे अतिरिक्त वजनवाढ होते. विशेषतः कंबरेचा घेर वाढून पोट सुटते. अंगात रक्ताचे प्रमाण कमी आणि वजन मात्र जास्त, असा विरोधाभास असलेली शरीरप्रकृती बहुसंख्य स्त्रियांत आढळते. त्यात पुन्हा चाळिशीनंतर रजोनिवृत्ती झाल्यावर हार्मोन्सच्या परिणामांनी आणखी वजनवाढ होते.
३. जीवनशैलीचे आजार: वजनवाढ आणि व्यायामाचा अभाव यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, सांधेदुखी हे त्रास प्रामुख्याने आढळतात. तरुण मुलींत ‘पॉलिसिस्टीक ओव्हेरियन सिंड्रोम’ आढळून येतो. यात पाळी अनियमित येत असल्याने या महिलांमध्ये वंध्यत्वाच्या समस्याही मोठ्या प्रमाणात आढळून येतात.
उच्च शिक्षण घेण्यात मुलींची पंचविशी उलटून जाते, त्यानंतर नोकरी-व्यवसायात स्थिर होण्यासाठी किंवा कौटुंबिक जबाबदारी पार पाडण्यात आणखी पाच वर्षे निघून जातात. त्यामुळे आजच्या काळात मुलींचे लग्नाचे वय २८ ते ३५ झाले आहे. उशिरा लग्न झाल्यामुळे प्रेग्नन्सी उशिरा होते किंवा अनेकदा वंध्यत्वाच्या समस्याही उद्भवतात. वयाच्या तिशीनंतर होणारी गरोदरावस्था जोखमीची समजली जाते. आज असंख्य वर्किंग विमेन या परिस्थितीला तोंड देत आहेत.
हार्मोन्सबाबतीत थायरॉइडचा विकारही आजकाल या स्त्रियांत मोठ्या प्रमाणात आढळून येऊ लागला आहे.
४. मानसिक विकार: कामातील जबाबदाऱ्या, डेडलाईन्स, उशिरापर्यंत कामे करणे, माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील रात्रपाळ्या आणि ताणतणाव यामुळे निद्रानाश, चिंता, नैराश्य, आत्मविश्वास गमावणे अशा विकारांचा प्रादुर्भाव होतो. याच बरोबर नोकरी करणाऱ्या स्त्रियांना, त्यांच्या नोकरीतल्या समस्यांना एकतर घरातून साथ मिळत नाही किंवा नवराबायको दोघेही नोकरी करत असल्यामुळे एकमेकांना हवा तितका वेळ देऊ शकत नाहीत. या कारणांनी हे ताणतणाव आणि मनोविकार वाढत चाललेले दिसून येत आहेत. याशिवाय, नवराबायको उभयता जरी काम करत असले तरी घर, संसार आणि मुलांचे संगोपन करण्याची जबाबदारी त्या स्त्रीचीच मानली जाते. हा पैलूदेखील अनेक मानसिक, सामाजिक आणि शारीरिक प्रश्न निर्माण करतो.
५. सांध्यांचे विकार: बँक्स, कंपनी ऑफिसेस, शाळा-कॉलेजेस आणि कारखान्यात सततचे बैठे काम करणाऱ्या स्त्रियांमध्ये गुडघे दुखणे, कंबर-पाठ सतत दुखणे, मानेच्या मणक्यांचा स्पाँडिलायटिस, मनगटे दुखणे, हातांची बोटे बधीर होणे असे त्रास दिसून येतात. नैसर्गिक सूर्यप्रकाशाला पारख्या असल्याने ‘ड’ जीवनसत्त्वाचा अभाव घडून हाडे विरळ होणे आणि हात-पाय, पाठ सतत दुखण्याच्या तक्रारी जास्त प्रमाणात दिसतात.
योग्य आहार, कामाच्या वेळा पाळून थोडे व्यायाम, मेडिटेशन, योगासने, ठरावीक विश्रांती, काही छंद जोपासणे अशा गोष्टी केल्यास या विकारांवर डोळसपणे मात करता येऊ शकेल.
६. कर्करोग: भारतीय स्त्रियांमध्ये आजही स्तनाचा आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग मोठ्या प्रमाणात आढळून येतो आहे. एकेकाळी वयाची चाळीस-पन्नास वर्षे उलटल्यावर रजोनिवृत्तीच्या काळात उद्भवणारे हे आजार, नोकरदार स्त्रियांमध्ये वयाच्या तिशीत आढळून येऊ लागले आहेत. स्तनाच्या कर्करोगाच्या निदानपूर्व तपासण्या, उदा. वैद्यकीय तपासणी, स्वयं तपासणी, मॅमोग्राफी, सोनोग्राफी अशा अनेक सोयी उपलब्ध असूनदेखील बहुसंख्य सुशिक्षित आणि नोकरदार स्त्रिया त्या टाळताना दिसतात. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे पूर्व निदान करणाऱ्या पॅप स्मीअर सारख्या तपासण्याबाबतसुद्धा टाळाटाळ केली जाते. एखाद्या महिलेच्या आईला, बहिणीला किंवा रक्ताच्या नात्यात जवळच्या असलेल्या स्त्रीला जर हे कर्करोग झाले असतील, तर जनुकीय तपासणीद्वारे तो कर्करोग उद्भवण्याआधीच त्याची शक्यता लक्षात येते आणि तो टाळण्यासाठी किंवा त्या संभाव्य आजाराचा मागोवा घेत राहून, अगदी लवकरात लवकर निदान करता येते आणि कर्करोगाचे निराकरण करता येते. पण याचाही फायदा अतिशय कमी स्त्रिया घेतात.
गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी, मुलगी वयात आल्यावर किंवा तिचे लग्न होण्यापूर्वी एचपीव्ही लस घेतल्यास तो कर्करोग टळू शकतो. ही लस सर्व मुलींना व्यापक स्तरावर देण्याचे भारत सरकारने नुकतेच जाहीर केले आहे. साहजिकच सर्व तरुण मुलींनी आणि स्त्रियांनी ही लस घेतल्यास या कर्करोगाचे प्रमाण कमी होऊ शकेल.
काही वर्षांपूर्वीपर्यंत स्त्रियांमध्ये मिश्री, तंबाखू खाण्यामुळे मुखाचा कर्करोग मोठ्या प्रमाणात आढळून येत असे. परंतु आजच्या वर्किंग विमेनमध्ये मिश्री नव्हे, पण तंबाखू, गुटखा आणि मुख्यत्वे धूम्रपानाचे प्रमाण वाढताना दिसून येते आहे. त्यातून मुखाच्या आणि फुप्फुसांच्या कर्करोगाची शक्यता नजीकच्या काळात वाढण्याची शक्यता आहे.
कुटुंबाच्याच नव्हे, तर आपल्या देशाच्या उन्नतीमध्ये महिलांचा वाटा मोठा आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याबाबत जाहीर केलेली सरकारी धोरणांची पूर्तता तर होणे आवश्यक आहेच, पण त्याचबरोबर कुटुंबातील सर्व सदस्यांचा आणि पर्यायाने साऱ्या समाजाचा वर्किंग विमेनकडे पाहण्याचा आणि वागण्याचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे.
डॉ. अविनाश भोंडवे
(लेखक ज्येष्ठ आरोग्य विश्लेषक आणि पुण्यातील फॅमिली डॉक्टर आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र शाखेचे ते माजी अध्यक्ष आहेत.)