Sunday, September 8, 2024

बारावीच्या पुनर्परीक्षेला पोहचू न शकणाऱ्या परिक्षांर्थीसाठी शिक्षण मंडळाचा महत्त्वाचा निर्णय

Share

पुणे : पुण्यातील (Pune) मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) बारावीच्या पुनर्परीक्षेला (12th re-examination) पोहोचू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्राच्या उच्च माध्यमिक मंडळाची इयत्ता बारावीची पुनर्परीक्षा सध्या सुरु असून राज्यभरातील पावसाची एकूण परिस्थिती लक्षात घेता आज काही परिक्षार्थी परीक्षेसाठी पोहोचू शकणार नाहीत, ही अडचण केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांनी महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दीपक केसकर (Deepak Kesarkar) यांना सांगितली असता जे परिक्षार्थी आजच्या पेपरसाठी पोहोचू शकणार नाहीत, अशा परिक्षार्थींसाठी पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पुण्यासह राज्यभरासाठी असणार आहे. या संदर्भातील लेखी निर्णय लवकरच प्रसिद्ध होईल. जे परिक्षार्थी पोहोचू शकले नाहीत, त्यांनी सुरक्षित ठिकाणी थांबावे, अशी विनंतीही त्यांनी केली. तसेच, तातडीनं निर्णय घेतल्याबद्दल दीपक केसरकर यांचे आभार मानले.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पुण्यात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे काही विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षेसाठी केंद्रांवर पोहोचणे अशक्य झाले. या विद्यार्थ्यांना दुसरी संधी देण्यासाठी शिक्षण मंडळाने पुढील तारखांमध्ये परीक्षा घेण्याचे ठरवले आहे. नवीन परीक्षेच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळांमार्फत या विषयीची माहिती दिली जाईल. तसेच, विद्यार्थ्यांनी या संधीचा योग्य फायदा घ्यावा आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी तयारी सुरू ठेवावी, असे आवाहन शिक्षण मंडळाने केले आहे.

अन्य लेख

संबंधित लेख