मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा धुरळा शांत झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष महापौरपदाच्या खुर्चीकडे लागले आहे. नगरविकास विभागाने यासंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली असून, २२ जानेवारी २०२६ रोजी मंत्रालयात महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे. या सोडतीनंतरच कोणत्या शहराला कोणत्या प्रवर्गाचा महापौर मिळणार, हे स्पष्ट होईल.
मंत्रालयात होणार फैसला
नगरविकास विभागाने जारी केलेल्या पत्रकानुसार, गुरुवारी (२२ जानेवारी) सकाळी ११ वाजता मंत्रालयातील परिषद सभागृहात राज्यमंत्री (नगर विकास) यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत होईल. १५ जानेवारीला मतदान आणि १६ जानेवारीला निकाल लागल्यानंतर आता या आरक्षण सोडतीमुळे अनेक नवनिर्वाचित नगरसेवकांचे भवितव्य ठरणार आहे.
आरक्षण सोडतीत मोठा ‘ट्विस्ट’ येण्याची शक्यता?
यंदाच्या आरक्षण सोडतीत एक मोठा बदल होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, महापौर आरक्षणाची ‘चक्राकार पद्धत’ (Rotation System) नव्याने सुरू केली जाऊ शकते.
नवा नियम काय असू शकतो? आरक्षणाची सुरुवात पुन्हा ‘ओपन’ (खुला प्रवर्ग) पासून होण्याची शक्यता आहे.
कोणाला फटका, कोणाला फायदा? जर चक्राकार पद्धत बदलली, तर अनेक वर्षांपासून आरक्षणाची वाट पाहणाऱ्या प्रवर्गांना संधी मिळू शकते, तर प्रस्थापित नेत्यांची गणिते बिघडू शकतात. सध्या एससी, एसटी, ओबीसी आणि महिलांसाठी कायद्यानुसार रोटेशन पद्धत लागू आहे.
भाजपची ऐतिहासिक मुसंडी
नुकत्याच झालेल्या निकालात भाजपने राज्यातील १९ महापालिकांमध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
पुणे-पिंपरी चिंचवड: अजित पवार गटाला धक्का देत भाजपने एकहाती सत्ता मिळवली.
नागपूर: आपला गड पुन्हा एकदा भक्कमपणे राखला.
छत्रपती संभाजीनगर: ठाकरेंच्या वर्चस्वाला धक्का देत महायुतीने सत्ता खेचून आणली.
मुंबई: ८९ जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
या विजयानंतर आता आपल्या आवडीच्या नगरसेवकाला महापौर करण्यासाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे, मात्र २२ जानेवारीच्या आरक्षणावरच सर्व काही अवलंबून असेल.
प्रमुख मुद्दे एका नजरेत:
सोडतीचा दिनांक: २२ जानेवारी २०२६
वेळ: सकाळी ११:०० वाजता
ठिकाण: परिषद सभागृह, ६ वा मजला, मंत्रालय, मुंबई.
महत्त्व: २९ शहरांच्या महापौरांचा प्रवर्ग निश्चित होणार.