मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत राज्याचा २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर केला. दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर अर्थमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारलेल्या फडणवीसांनी आपल्या भाषणात ग्रामीण भागाचा कायापालट आणि मुंबईच्या दळणवळण व्यवस्थेवर मोठ्या घोषणा केल्या आहेत.
ग्रामीण महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा: ‘काँक्रीट रस्ते’ कनेक्टिव्हिटी
ग्रामीण भागातील दळणवळण सुलभ करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. ज्या गावाची लोकसंख्या १ हजार पेक्षा जास्त आहे, अशी राज्यातील सर्व गावे आता मुख्य रस्त्यांशी काँक्रीट रस्त्यांनी जोडली जाणार आहेत. यामुळे पावसाळ्यात खराब होणाऱ्या रस्त्यांची समस्या कायमस्वरूपी मिटणार असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा केली आहे. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने’ अंतर्गत ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत ज्या शेतकऱ्यांचे पीककर्ज थकीत आहे, अशा पात्र शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय सरकारने घेतला आहे. तर, जे शेतकरी प्रामाणिकपणे आणि नियमितपणे कर्जाची परतफेड करतात, त्यांना अन्याय होऊ नये म्हणून ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो कर्जबाजारी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.