मुंबई : राज्यातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल होण्याची शक्यता असून, येत्या १७ ते २० मार्च दरम्यान विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. या नैसर्गिक संकटामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या काढणीला मोठा अडथळा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १७ मार्चपासून राज्यात मेघगर्जनेसह पाऊस आणि विजांचा कडकडाट सुरू होईल. मात्र, १८ ते २० मार्च या काळात पावसाची तीव्रता अधिक असेल. यादरम्यान काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह गारपीट होण्याची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाच्या महत्त्वाच्या सूचना
सध्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा यांसारख्या पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी खालीलप्रमाणे आवाहन केले आहे
- काढलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा ताडपत्रीने झाकून ठेवावीत.
- पावसाचा अंदाज घेऊनच शेतीची कामे नियोजित करावीत.
- खते आणि कीटकनाशकांची फवारणी पावसाचा अंदाज घेऊनच करावी.
- वीज कडकडत असताना झाडाखाली आश्रय घेऊ नये.
हवामानाच्या या लहरीपणामुळे पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने बळीराजा चिंतेत आहे. नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी हवामानाच्या अद्ययावत अंदाजावर लक्ष ठेवावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.