Saturday, January 17, 2026

महापालिकेत झटका, आता जिल्हा परिषदेसाठी दोन्ही राष्ट्रवादींचे ‘मिशन एकत्र’

Share

बारामती : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या मोठ्या विजयानंतर आता राजकीय समीकरणे वेगाने बदलू लागली आहेत. मुंबई, पुणे, ठाणे आणि पिंपरी-चिंचवडसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला (शरद पवार व अजित पवार गट) मोठा धक्का बसला आहे. या पराभवातून सावरण्यासाठी आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये एकत्र येण्याच्या तयारीत आहेत.

जिल्हा परिषदेसाठी ‘पवार पॅटर्न’?
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी बारामती येथे शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आगामी निवडणुकांसाठी मोठी घोषणा केली. “येणाऱ्या १२ जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका जेथे शक्य आहे, तेथे दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्रितपणे लढवाव्यात, यावर आमची चर्चा झाली आहे,” असे शिंदे यांनी सांगितले.

शहरात भाजपची लाट, ग्रामीण भागात पवारांवर भिस्त
महानगरपालिकांच्या निकालावर भाष्य करताना शशिकांत शिंदे म्हणाले की, “स्थानिक पातळीवर जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. शहरी भागातील कल वेगळा असला, तरी ग्रामीण भागात आजही शरद पवार यांच्या विचारांचा पाया मजबूत आहे. ग्रामीण भागात मतांचे विभाजन टाळण्यासाठी आम्ही एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे.”

विलिनीकरण की केवळ युती?
गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत. यावर स्पष्टीकरण देताना शिंदे म्हणाले, “आज विलिनीकरणाचा कोणताही विषय नव्हता. केवळ आगामी निवडणुका एकत्रित लढवण्याबाबत शरद पवार यांची परवानगी घेण्यासाठी आम्ही आलो होतो. जिथे गरज पडेल तिथे आम्ही एकत्र लढू आणि जिथे शक्य नसेल तिथे स्वतंत्रपणे सामोरे जाऊ.”

निवडणुकीचे वेळापत्रक:
मतदान:
५ फेब्रुवारी २०२६

निकाल: ७ फेब्रुवारी २०२६

अन्य लेख

संबंधित लेख