Friday, October 25, 2024

‘मातृप्रेरणा’ विशेषांकातून राष्ट्रनिर्मितीसाठी मातृत्वाचा संदेश

Share

पुणे : “करिअर जितके महत्वाचे आहे तितकेच मातृत्व देखील महत्वाचे आहे. राष्ट्रा साठी नवीन पिढी आणि चांगले नेतृत्व निर्माण करणे हे आपलेच कर्तव्य आहे. राष्ट्र निर्मिती साठी स्त्रियांनी आपले कर्तव्य जाणून आणि समजून निर्णय घेणे महत्वाचे आहे.” असे मत राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांनी सांस्कृतिक वार्तापत्र च्या ‘मातृप्रेरणा’ या विशेषांकाचा प्रकाशन सोहळ्यावेळी केले.

शांताक्का म्हणाल्या

  • गरीबी आणि दुःख असतानाही भारतीय मतांचा हॅपिनेस कोशंट जास्त, देशातील ६८ टक्के महिला आनंदी
  • बांगलादेशातील मातृशक्ती जागृत झाली म्हणून हिंदुंसह अल्पसंख्याकांचे संरक्षण झाले.
  • आई म्हणजे त्यागाची मूर्ती अशी विनोबा भावे यांची शिकवण.
  • राष्ट्र आणि प्रजानिर्मिती मातृशक्तीची जबाबदारी
  • शुभ अशुभ न पाहता दुःख सहन करत कुटुंबाच्या भल्यासाठी त्याग करणारी भारतीय नारी

प्रेम, त्याग आणि आपलेपणाचा भाव म्हणजे मातृत्व होय. भारतीय महिलांमध्ये हे मातृत्व जागृत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना घडविणाऱ्या राजमाता जिजाऊंप्रमाणेच आजच्या महिलांमध्ये संकल्पित मातृशक्तीची गरज आहे, असेही यावेळी शांताक्का म्हणाल्या.

राजमाता जिजाऊ यांच्या ३५० व्या स्मृतीवर्षानिमित्त गणेश सभागृहात दि. १३ ऑगस्ट २०२४ रोजी सांस्कृतिक वार्तापत्र च्या ‘मातृप्रेरणा’ या विशेषांकाचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या विशेषांकाचे प्रकाशन राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांच्या शुभहस्ते झाले तसेच, प्रमुख पाहुण्या म्हणून प्रसिद्ध लेखिका, समाजमाध्यमकर्मी शेफाली वैद्य या होत्या, विशेषांकाच्या अतिथी संपादक विनिता तेलंग तसेच संस्कृती जागरण मंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीरंग गोडबोले, विशेषांकाचे संपादक मिलिंद शेटे यांची प्रकाशनास खास उपस्थिती होती.

“मातृत्व म्हणजे फक्त मुल जन्माला घालणे नव्हे. राजमाता जिजाऊ, अहिल्यादेवी यांनी आपले मातृत्व प्रजेसाठी अर्पण केले. मातृत्व फक्त स्त्री पुरत मर्यादित नसून, मातृत्व हि एक भावना आहे, विचार आहे. हि भावना स्त्री-पुरुष या दोघांमध्ये वसलेली असते. म्हणूनच आपण ज्ञानेश्वरांना माऊली असे संबोधतो. आपल्या मुलांना स्वावलंबी बनवणे हे एका मातेचे मुख्य कर्तव्य आहे,” असे शेफाली वैद्य म्हणाल्या.

विनिता तेलंग यांनी “जुन्या पिढीतल्या प्रेरणेशी धागा जोडून ठेवून स्त्री च्या आजच्या आयुष्यातील विविध आयामांना स्पर्श करणारा हा विशेषांक असून तो प्रत्येकाने वाचलाच हवा,” असे म्हणत प्रत्येकाला विशेषांक वाचण्याचे आवाहन केले.

विविध मार्गाने हिंदुत्वाची तार छेडण्याचे काम सांस्कृतिक वार्तापत्र करते, असे मत विशेषांकाचे संपादक मिलिंद शेटे यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी विशेषांकाचा थोडक्यात परिचय करून दिला.

सांस्कृतिक वार्तापत्र च्या व्यवस्थापिका सुनिता पेंढारकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर, शितल फडके यांनी वैयक्तिक गीत सदर केले व मेघना घांगरेकर यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता झाली.

अन्य लेख

संबंधित लेख