नवी दिल्ली : नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया (NITI) आयोगाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी राज्यातील दूध, कापूस, सोयाबीन आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या महत्त्वाच्या समस्यांना न्याय मिळावा अशी मागणी केली.नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात झालेल्या या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Mondi) यांच्याकडे या समस्या मांडल्या.
या परिषदेत विविध राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल यांच्यासह नीति आयोगाचे पदसिद्ध सदस्य, केंद्रीय मंत्री आणि नीति आयोगाचे उपाध्यक्ष उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शेतकऱ्यांसाठीचे प्रश्न आपण मांडले असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, कांद्याच्या किमती स्थिरीकरण निधी योजनेंतर्गत बफर स्टॉकसाठी कांदा खरेदी करण्यासंदर्भातील किंमत धोरणावर विचार करण्याची विनंती पंतप्रधानांना केली. सोयाबीन आणि कापसाचा हमी भाव वाढवून मिळावा. हंगामाच्या सुरुवातीपासूनच सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले. शेतकऱ्यांना पंतप्रधानच न्याय देऊ शकतात त्यामुळे लवकरच यावर तोडगा निघेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. दुधाची भेसळ रोखण्यासाठी कठोर कायदा करण्यासंदर्भात देखील केंद्राने पाउले उचलावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली.