Onion Export : गेल्या काही दिवसांपासून कांदा निर्याबंदी मुळे शेतकरी नाराज होते. मात्र आता कांद्यावरील निर्यातबंदी (Onion Export) उठवण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. आता शेतकऱ्यांना कांदा निर्यात करता येणार आहे. 40 टक्के निर्यात शुल्क लावून कांद्याची निर्यात करता येणार आहे. यावर, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) भाष्य केलं आहे.
“मला अतिशय आनंद आहे की, केंद्र सरकारने आम्ही जी मागणी वारंवार करत होतो ती मान्य केली आहे. आणि कांद्यावरची निर्यात बंदी आता केंद्र सरकारने परत घेतली आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. मोठ्या प्रमाणात कांद्याचे भाव वाढत आहेत. त्याचा फायदा हा निश्चितपणे शेतकऱ्यांना मिळेल’, तसेच फडणवीसांनी यावेळी केंद्र सरकारचे मनापासून आभार मानले.
दरम्यान, कांदा निर्याबंदी उठवावी यासाठी “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि आम्ही सगळ्यांनी सातत्याने केंद्र सरकारच्या पाठीमागे लागलो होतो. केंद्र सरकारला आम्ही विनंती केली होती. की शेतकऱ्यांचं नुकसान होतंय. त्यामुळे ही निर्यात बंदी आपण उचलली पाहिजे. आणि त्याला प्रतिसाद केंद्र सरकारने दिलाय, याचा मला मनापासून आनंद असल्याचं यावेळी त्यांनी बोलून दाखवलं.
“निश्चितपणे प्रश्नाच्या दोन्ही बाजू होत्या. एकीकडे देशामध्ये कांद्याचे उत्पादन कमी असताना तो निर्यात झाला आणि देशात कांद्याची कमतरता तयार झाली तर देशामध्ये आपल्याला अनेकवेळा मग अशी परिस्थिती येते की दुप्पट तिप्पट किमतीत बाहेरून कांदा आयात करावा लागतो. म्हणून केंद्र सरकार साधारणपणे उत्पादन काय आहे? आपली मागणी किती आहे? कधी कुठलं उत्पादन येणार आहे? याच्या आधारावर हे सगळे निर्णय घेतले असतात. मात्र आता या सगळ्या परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने एक चांगला निर्णय घेतलेला आहे. यावर, विरोधकांनी नेहमीच राजकारण करण्याचा प्रयत्न केला पण मला असं वाटतंय की केंद्र सरकार शेतकऱ्यांचं हित पाहतं केंद्र सरकार सामान्य माणसाचे हित पाहतं’, असही यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले.