पुणे मेट्रोने २०२५ या वर्षात सार्वजनिक वाहतुकीचा विश्वास अधिक दृढ करत उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे.
पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन मार्गांवर एकूण ६.७१ कोटी प्रवाशांची वाहतूक करत १०७.६ कोटी रुपयांचा महसूल मिळवण्यात मेट्रोला यश आले.
मासिक प्रवासीसंख्या फेब्रुवारीतील ४३.०७ लाखांवरून सप्टेंबरमध्ये ७५.९२ लाखांपर्यंत पोहोचली, तर महसूलही ६.७३ कोटी रुपयांवरून ११.७० कोटी रुपयांपर्यंत वाढला. जुलै, सप्टेंबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये ६० लाखांहून अधिक प्रवासी मेट्रोने प्रवास करत असल्याने, दैनंदिन प्रवासासाठी मेट्रोवरील वाढता विश्वास स्पष्ट झाले आहे.
प्रवासीसंख्येतील सातत्यपूर्ण वाढ ही पुणे मेट्रोच्या कार्यक्षम, वेळेवर आणि सुरक्षित सेवांवरील नागरिकांच्या विश्वासाचे द्योतक आहे, असे मत मेट्रो अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. खासगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतुकीकडे कल वाढत असून, वाहतूक कोंडी कमी करण्यामध्ये मेट्रोची भूमिका अधिक ठळकपणे दिसून येत आहे. कार्यालयीन प्रवासी, विद्यार्थी आणि व्यावसायिक वर्गासाठी मेट्रो हा सोयीचा आणि विश्वासार्ह पर्याय बनत चालला आहे.
दरम्यान, पुणे मेट्रोच्या पुढील टप्प्याला गती देणाऱ्या घडामोडी शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी निर्णायक ठरत आहेत. केंद्र सरकारकडून टप्पा–२ मधील लाईन ४ आणि ४अ या मार्गांना मिळालेली कॅबिनेट मंजुरी तसेच हिंजवडी–सिव्हिल कोर्ट मेट्रो मार्ग लवकरच प्रवासी सेवेसाठी सुरू होण्याची अपेक्षा, यामुळे मेट्रो जाळ्याचा प्रत्यक्ष वापर मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः हिंजवडी आयटी कॉरिडॉर थेट मध्यवर्ती पुण्याशी जोडला गेल्यास, लाखो कर्मचाऱ्यांना वेगवान आणि सुरक्षित प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
या नव्या मार्गांमुळे पूर्व, पश्चिम आणि दक्षिण पुण्यातील आयटी हब्स, औद्योगिक क्षेत्रे, शैक्षणिक संस्था आणि निवासी भाग यांच्यातील संपर्क अधिक सुलभ होणार आहे. परिणामी, पुणे मेट्रोचे जाळे केवळ विस्तारत नाही, तर शहराच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. प्रवासीसंख्या आणि महसुलातील वाढ पाहता, येत्या काळात पुणे मेट्रो ही आधुनिक, एकात्मिक आणि शाश्वत शहरी वाहतूक व्यवस्थेची खरी ओळख ठरणार आहे.
केंद्र सरकारकडून पुणे मेट्रोच्या टप्पा–२ मधील नव्या मार्गांना मिळालेली मंत्रिमंडळाची मंजुरी आणि हिंजवडी–सिव्हिल कोर्ट मेट्रो मार्ग लवकरच प्रवासी सेवेसाठी सुरू होण्याची अपेक्षा — या दोन्ही घडामोडी पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी निर्णायक टप्पा ठरत आहेत. यामुळे पुणे मेट्रो केवळ विस्ताराच्या टप्प्यात नसून, प्रत्यक्ष वापराच्या दृष्टीनेही नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे.
लाईन ४ (खराडी–हडपसर–स्वारगेट–खडकवासला) आणि लाईन ४A (नळ स्टॉप–वारजे–माणिक बाग) या मार्गांमुळे पूर्व, दक्षिण आणि पश्चिम पुण्यातील आयटी हब्स, औद्योगिक पट्टे, शैक्षणिक संस्था आणि निवासी भाग यांच्यातील संपर्क अधिक सुलभ होणार आहे. याच काळात हिंजवडी–सिव्हिल कोर्ट मेट्रो लाईन सुरू झाल्यास, पश्चिम पुण्यातील प्रमुख आयटी कॉरिडॉर थेट शहराच्या मध्यवर्ती भागाशी जोडला जाणार आहे. त्यामुळे कामासाठी रोज प्रवास करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांना सुरक्षित, वेगवान आणि विश्वासार्ह पर्याय उपलब्ध होईल.
एकत्रितपणे ३१.६३६ किलोमीटर लांबीच्या आणि २८ उन्नत स्थानकांच्या लाईन ४ व ४अ मुळे पुण्याच्या शहरी आराखड्याला गती मिळत आहे. केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार आणि बाह्य वित्तसंस्थांच्या संयुक्त निधीतून सुमारे ९,८५७.८५ कोटी रुपयांचा हा प्रकल्प पाच वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
नव्या मार्गांना मिळालेल्या कॅबिनेट मंजुरीसोबतच हिंजवडी–सिव्हिल कोर्ट लाईन सुरू होण्याच्या दिशेने सुरू असलेली तयारी पाहता, पुणे मेट्रोचे जाळे लवकरच १०० किलोमीटरचा टप्पा ओलांडणार आहे. हे पुणे शहराला आधुनिक, एकात्मिक आणि शाश्वत शहरी वाहतूक व्यवस्थेकडे नेणारे एक महत्त्वाचे वळण ठरणार आहे.
२०२५ मधील पुणे मेट्रो : प्रवासीसंख्या व महसूल
| महिना | प्रवासी संख्या (लाखांत) | महसूल (₹ कोटींत) |
| जानेवारी | ४९.६४ | ७.८७ |
| फेब्रुवारी | ४३.०७ | ६.७३ |
| मार्च | ४४.८१ | ७.०१ |
| एप्रिल | ४६.५९ | ७.४७ |
| मे | ४७.६२ | ७.७२ |
| जून | ५२.४१ | ८.३३ |
| जुलै | ५९.५८ | ९.४२ |
| ऑगस्ट | ६९.४८ | १०.७२ |
| सप्टेंबर | ७५.९२ | ११.७० |
| ऑक्टोबर | ५९.३१ | ९.३६ |
| नोव्हेंबर | ६१.४८ | ९.४४ |
| डिसेंबर | ६१.०५ | ९.५६ |
| एकूण | ६.७१ कोटी | १०७.६ कोटी |