मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या भेटीगाठींचे सत्र जोरात सुरू असतानाच, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी बुधवारी (१८ फेब्रुवारी) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. ठाण्यातील ‘नंदनवन’ या निवासस्थानी ही भेट पार पडली. या भेटीनंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले असून, शिवसेना (शिंदे गट) प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.
राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात बराच वेळ खलबतं झाली. ही भेट कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत मनसेच्या नगरसेवकांनी शिवसेनाला दिलेल्या पाठिंब्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आभार मानल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच, महापालिका सभागृहातील कामकाजात मनसेचे सहकार्य कायम राहील, असे आश्वासनही राज ठाकरे यांनी दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या भेटीत केडीएमसी निवडणुकांसह इतर राजकीय घडामोडींवरही चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या भेटीनंतर शिवसेना शिंदे गटाच्या आक्रमक प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा भेटीचा फोटो शेअर करत उद्धव ठाकरेंचे नाव न घेता त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
म्हात्रे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की:
“माझा पक्ष पळवला… माझा बाप पळवला… आता माझा भाऊ पळवला !!!”
या विधानाद्वारे त्यांनी उद्धव ठाकरेंच्या भूतकाळातील विधानांची आणि आरोपांची खिल्ली उडवल्याचे दिसून येत आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी सातत्याने ‘माझा पक्ष आणि धनुष्यबाण चोरला’ अशी टीका केली होती. आता राज ठाकरेंनी शिंदेंची भेट घेतल्यावर म्हात्रे यांनी ‘भाऊ’ (राज ठाकरे) देखील शिंदेंच्या बाजूने गेल्याचे सूचित करत टोला लगावला आहे.