Friday, February 27, 2026

शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग ७

Share

सप्टेंबर २०१७ मध्ये मोदी सरकारच्या महागाईविरोधात शिवसेनेने मुंबईतल्या वेगवेगळ्या १२ ठिकाणी हे आंदोलन केलं… पेट्रोल दरवाढीचा भडका उडाला असताना दिवसेंदिवस होत असलेल्या महागाईला सेनेनं विरोध दर्शवला होता… दुर्देवानं ही पाळी आमच्यावर आली असून सत्तेत असलो, तरी सत्तेची चावी ज्यांच्या हातात आहे, त्यांनी ही भाववाढ केल्याचं आमचं म्हणणं होतं…

“नरेंद्र सरकार हाय हाय, देवेंद्र सरकार हाय हाय” अशा घोषणा देत शिवसैनिकांनी सरकारचा निषेध केला… मात्र कहर म्हणजे सत्तेत भागीदार असूनही… ‘एवढी माणसं कशाला, मोदीच्या मयताला’ अशा घोषणा द्यायला वाघाचं काळीज लागतं… हा उद्धव साहेबांनी पुढे चालवलेला “ठाकरी शैली” चा वारसा होता… त्या आंदोलनानंतर आठवडाभर भाजपवाले गायब होते… बहुधा मोदीच्या मयताला गेले असावेत असे म्हणून आम्ही शिवसैनिक खिदळत एकमेकांना टाळी देत होतो…

तोपर्यंत २०१८ साल आले… शिवसेनेचा व्याप आता वाढत होता… केंद्रात राज्यात आणि महापालिकेत तीनही ठिकाणी आम्ही स्वकर्तृत्वावर सत्तेत सहभागी होतो… मातोश्री बंगला शिवसैनिकांसाठी अपुरा पडत होता… म्हणून उद्धव साहेबांनी फक्त शिवसैनिकांच्या प्रेमापोटी जुन्या मातोश्री समोरच ८ मजली टोलेजंग मातोश्री २ या गडाचे बांधकाम करून घेतले…

(शिवसेनेचा आणि उद्धव साहेबांचा उत्कर्ष सहन न झालेले जळकुटे भाजप भक्त… तुमच्या साहेबांनी फोटोग्राफीवर बराच पैसा कमावला म्हणून फक्त हातपाय आपटत असतात… मी त्यांना “जलो मत, बराबरी करो” सांगून त्यांच्या जखमेवर मीठ चोळतो…)

याच २०१८ साली उद्धव साहेब अयोध्येला गेले होते… “हर हिंदू की यही पुकार, पहले मंदिर फिर सरकार”चे पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्ज शहरभर लागली होती… उत्तर प्रदेशच्या शिवसैनिकांनी उद्धव साहेबांचे दणक्यात स्वागत केले… भाजपने गोरखपूरच्या योगी आदित्यनाथ नावाच्या कोणत्या तरी संन्याश्याला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री केले होते… या आमच्या मुंबईच्या भाजपवाल्यांना त्या योगीचे कोण कौतुक… आम्ही तर त्या योगीचा त्याच्या मूळ नावाने… अजय सिंग बिश्त नावानेच उल्लेख करायचो आणि त्याचे कौतुक करणाऱ्या इथल्या भिकारड्या भाजपवाल्यांची “मराठी भैय्ये” म्हणून जाम टर उडवायचो…

त्या अजय सिंग बिश्तला… बाळासाहेबांच्या बछड्याने… उद्धव साहेबांनी त्याच्याच उत्तर प्रदेशात जाऊन… “पहले मंदिर फिर सरकार”चा सज्जड दम भरला होता…

आता २०१९ च्या लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले… प्रादेशिक पक्षांना गिळायला बसलेल्या कमळाबाईने आमचा घातच केला असता… पण नियतीपुढे तिचे काही चालले नाही…

त्यातच २०१८ मध्ये राज्याच्या “विशेष दर्जा”वरून चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसमने भाजपची साथ सोडली… राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडून त्यांनी मोदी सरकारवर अविश्वासाचा ठराव देखील आणला पण शिवसेना मात्र भाजपच्या बाजूने ठामपणे उभी राहिली…

२०१८ सालीच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड अशी महत्त्वाची राज्ये हातून निसटल्यावर… २०१९ ची लोकसभा देखील हातातून निसटते की काय या भीतीने गारठलेले…

भाजपचा अध्यक्ष अमित शहा नाक मुठीत धरून मातोश्रीवर आला… “वाकल्या झुकल्या गर्विष्ठ माना, या मातोश्री मंदिरी” अशीच ती भेट झाली होती… उद्धव साहेबांशी गोड गोड गप्पा मारल्या… युतीच्या आणाभाका घेतल्या… विधानसभेला देखील युतीतच लढू… सत्तेत अर्धी-अर्धी भागीदारी अर्थात

शिवसेनेला २.५ वर्षे मुख्यमंत्री पद द्यायला काहीच अडचण नाही… असा बंद दारा आड शब्द देऊन गेला… (हे स्वतः उद्धव साहेब सांगताहेत म्हटल्यानंतर आम्हा शिवसैनिकांच्या मनात कोणतीही शंका उरली नाही…)…

२०१९ ची लोकसभा आम्ही युतीतच लढणार हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले… कारण कमळाबाई आमच्या गळ्यातच पडली होती…

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही २३ जागांवर लढलो आणि परत एकदा आमचे १८ वाघ ठाकरे ब्रँडच्या जोरावर संसदेत डरकाळी फोडायला सज्ज झाले… कमळाबाईने २५ मतदार संघात पदर पसरला आणि २३ ठिकाणी पदरात दान पडले… त्यांच्या या विजयात शिवसैनिकांच्या कष्टांचा आणि मतांचा भरीव सहभाग होता… पण मान्य करेल तर ती कमळाबाई कसली…

२०१९ मे महिन्यात आमचे अरविंद सावंत नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मिनिस्टर झाले… बाकीच्या मंत्रिपदांसाठी उद्धव साहेबांचं पंतप्रधानांशी घमासान सुरू होतं… पण मना जोगता तोडगा निघत नव्हता…

आता जेमतेम ६ महिन्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका लागणार होत्या… उद्धव साहेबांना २.५ वर्षे मुख्यमंत्री पद देण्याचे लोकसभा निवडणुकी आधीच अमित शहा यांनी आधीच कबूल केलेले असल्यामुळे युती होणार हे नक्की होते…

ही निवडणूक आमच्यासाठी अभूतपूर्व होती… ठाकरे घराण्याचा वारस… मोठ्या साहेबांचे नातू… आदित्य साहेब स्वतः वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरले होते… त्यामुळे आमच्यासाठी ही निवडणूक विशेष उत्साहाची होती… प्रतिष्ठेची होती… ऐतिहासिक होती…

शिवसेनेचे तिथले आमदार सुनील शिंदे यांनी अगदी स्वखुशीने आदित्य साहेबांसाठी आपली जागा मोकळी केली… शिवाय उगाच दगाफटका नको म्हणून वरळी मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार सचिन भाऊ अहिर यांना उद्धव साहेबांनी शिवसेनेत घेतले… आदित्य साहेबांचा धूम धडाक्यात प्रचार सुरू झाला…

आदित्य साहेबांच्या फोटोसह “नमस्ते वरळी” चे पोस्टर्स गुजराती, हिंदी, इंग्रजी, मराठी आणि कन्नड भाषांमध्ये लावण्यात आले… पण उर्दूमधील “सलाम वरळी”चे होर्डिंग मात्र माझ्या डोळ्याला भयंकर खटकले… पण कदाचित उगाच दगाफटका नको म्हणून शिवसेनेने काळजी घेतली असेल… असे मानून मी मनाचे समाधान करून घेतले… पुढे प्रचाराच्या धुमधडाक्यात मी हे उर्दू होर्डिंग विसरूनही गेलो…

या निवडणुकीचा अर्ज दाखल करताना… आदित्य साहेबांनी जाहीर केलेली आपली संपत्ती बघून… मुंबईकरांच्या भुवया उंचावल्या होत्या.

अपेक्षेप्रमाणे युती झाली… यावेळी उद्धव साहेबांनी युतीला जागून विलक्षण त्याग करत १२४ जागांवर समाधान मानले… उद्धव साहेबांनी प्रचाराची शर्थ केली… शिवसैनिकांनी रक्ताचे पाणी केले आणि १२४ पैकी आमचे ५६ वाघ निवडून आले… राष्ट्रवादी काँग्रेस ५४ आणि काँग्रेस ४४ वर पोचली होती… प्रचारात “मी पुन्हा येईन… मी पुन्हा येईन… मी पुन्हा येईन…” चा धोशा लावणारी कमळाबाई १२२ वरून १०५ वर आली होती… पण तीची अक्कड गेली नव्हती…

शिवसेनेला २.५ वर्षे मुख्यमंत्री पद द्यायला कमळी कशीच तयार नव्हती… उद्धव साहेबांनी देवेंद्र फडणवीसचे (तब्बल १८) फोन उचललेच नाहीत आणि कमळाबाईची चांगलीच जिरवली…

महायुतीला १६१ जागांचे बहुमत मिळालेले असले तरी… कमळाबाईच्या आठमुठेपणामुळे सरकारच बनेना… शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद हवे होते… अमित शहाने दिलेल्या वचनानुसार हक्काने…

पण त्या बाबतीत एक अवाक्षर बोलायला तो तडीपार अमित शहा आणि टरबुजा देवेंद्र फडणवीस कोणीच बोलायला तयार नव्हते…

मग शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी देवेंद्र फडणवीसने अजित पवारांबरोबर… घाईघाईने पहाटेचा शपथविधी करून सरकार स्थापन केले… आणि ते ७२ तासांत कोसळले…

महाराष्ट्रात कमळाबाईचा हा तमाशा चालू असताना तिकडे दिल्लीत नरेंद्र मोदीच्या मंत्रिमंडळ विस्तारात राज्य मंत्रीपद मिळालेले अनिल देसाई शपथविधीसाठी मुंबईहून विमानाने दिल्लीला पोचले… पण इकडे महाराष्ट्रात कमळाबाईचा जो आडमुठेपणा सुरू होता त्यामुळे संतापलेल्या उद्धव साहेबांनी गनिमी कावा करून अनिल देसाईंना दिल्ली विमानतळावरून परत बोलावले… आणि आज्ञाधारक मावळ्याप्रमाणे अनिल देसाई मंत्रीपदाची शपथ न घेताच मुंबईला परत आले…

राष्ट्रपती भवनात अनिल देसाई यांचे नाव शपथविधीसाठी पुकारले गेले पण अनिल देसाई शपथ घ्यायला आलेच नाहीत… ते गनिमी कावा करून दिल्ली विमानतळावरूनच परतले होते हे पंतप्रधानांना सुद्धा माहित नव्हते… अनिल देसाई शपथविधीसाठी येत नाहीत असे बघून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पंतप्रधानांकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले… पंतप्रधानांचा चेहरा काळा ठिक्कर पडला… असे काळतोंड्या भक्त मला नंतर सांगत होता… मी खो-खो करून हसलो…

आता कमळाबाई चांगलीच कोंडीत सापडली होती… नाक मुठीत धरून शिवसेनेला २.५ वर्षाचे मुख्यमंत्रीपद द्यावेच लागणार या आनंदात आम्ही असताना… अचानक बातमी येऊन थडकली…

उद्धव साहेबांनी भाजपची साथ सोडून… काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर “महाविकास आघाडी” स्थापन करून… एक सर्वसामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री बनेल या अटीवर… (कारण स्वर्गीय बाळासाहेबांना त्यांनी तसे वचन दिले होते)… सरकार बनवण्याचा निर्णय घेतला आहे…

शिवसेनेचे ५६… राष्ट्रवादीचे ५४… आणि काँग्रेसचे ४४ आमदार… शिवाय कम्युनिस्ट आणि अपक्ष आमदारांचा पाठिंबा… म्हणजे बहुमताच्या १४४ आकड्याच्या पार आम्ही सहज जात होतो… पण मतदारांनी कौल तर महायुतीला दिलेला आहे… काँग्रेस आणि राष्ट्रवादीला विरोधी पक्षात बसण्याचा कौल जनतेने दिला होता…

मग आयुष्यभर बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला कडाडून विरोध केला… सोनिया गांधीसमोर झुकणारे हिजडे असतात म्हटलं… त्या काँग्रेस सोबत जायचं….? ज्या शरद पवारांना साहेबांनी नीच प्रवृत्ती म्हटलं त्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जायचं?… ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बाळासाहेबांनी आणि आम्ही शिवसैनिकांनी आयुष्यभर शिव्या दिल्या… त्यांची शेलक्या शब्दात उणीदुणी काढली… त्यांच्याविरुद्ध प्रचार केला निवडणुका लढवल्या… त्याच काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर निवडणुकांचा प्रचार केला तर मतदार जोड्याने मारणार नाहीत काय…? ज्या कॉम्रेड कृष्णा देसाईला आणि मुंबईतल्या कम्युनिस्टांना शिवसेनेने संपवलं… त्याच कम्युनिस्टांबरोबर सत्तेसाठी मांडवली करायची…? कारसेवकांवर गोळीबार करणाऱ्या मुस्लिम धार्जिण्या समाजवादी पक्षाबरोबर जायचं…? काँग्रेस राष्ट्रवादी कम्युनिस्ट समाजवादी यांच्या बरोबर जायचे म्हणजे हिंदुत्व सोडायचे?… मराठी माणसाचे न्याय हक्क सोडायचे… आजपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आपण ज्या शेलक्या भाषेत शिव्या दिल्या ते थुकलेल चाटायचं… कॉम्रेड कृष्णा देसाईंच्या आत्म्याची माफी मागायची?…  एक भयंकर अपराधीपणाची भावना माझ्या मनात दाटून आली… विचार करून मेंदूची नस फुटते की काय इतक्या भयानक निराशेने माझ्या मनाचा ताबा घेतला…

पण त्याच वेळी दुसरं मन म्हणत होतं… उद्धव साहेबांनी काहीतरी मोठ्या उद्देशाने काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जाण्याचा निर्णय घेतला असणार… शिवाय एक सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री होणार… शिवाय आम्हाला नेहमी पाण्यात पाहणाऱ्या भाजपचा कात्रजचा घाट केला याचाही मनातल्या मनात आनंद होत होता… पण माझं मन हेलकावे खात होतं…

आम्हाला कायम आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणारे भाजपचे भक्त टपूनच बसले होते… त्यांनी महाविकास आघाडीचा विषय काढल्याबरोबर… मी त्यांना सणकावले… काय रे भक्ताडांनो तुम्हीच आम्हाला वसंत सेना म्हणून चिडवत होतात ना?… बाळासाहेबांनी… इंदिरा गांधींच्या आणीबाणीला… महापौरपदासाठी मुरली देवरांना आणि मुख्यमंत्रीपदासाठी अब्दुल रहमान अंतुलेंना पाठिंबा दिलाच होता ना… मग काँग्रेस बरोबर जाण्यात आम्हाला कसली लाज…?

आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांबरोबर पहाटे शपथविधी करताना तुम्हाला लाज वाटली नाही का?… तुम्ही त्यांच्याबरोबर गेलेलं चालतं… आणि आम्ही गेलेलो चालत नाही… म्हणजे तुम करे तो चमत्कार और हम करे तो बलात्कार?…

कम्युनिस्टांकडे समाजवादी पक्षाकडे काही आम्ही पाठिंबा मागायला गेलो नव्हतो… ते आपणहून देणार असतील तर का घेऊ नये?… आम्ही पण राजकारण करतो… पाणपोई चालवत नाही… असे म्हणून गप्प केले… भक्त गप्प राहिले पण माझे मन मात्र मला खात होते… काहीतरी चुकतंय पण नेमकं काय चुकतंय हे कळत नव्हतं… जाऊ दे… एक सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री होतोय ना… मी आनंदात असतानाच उद्धव साहेबांनी आम्हाला दुसरा धक्का दिला…

“एका सर्वसामान्य शिवसैनिकाला मी मुख्यमंत्री करीन” असे वचन उद्धव साहेबांनी स्वर्गीय बाळासाहेबांना दिले होते… ते सर्वसामान्य शिवसैनिक म्हणजे स्वतः उद्धव साहेबच होते…

उद्धव साहेब स्वतः शिवसैनिक आहेतच आणि बाळासाहेबांचा सुपुत्र महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो आहे… काय हरकत आहे?… असा म्हणून मी माझ्या मनाची समजूत काढली… (सर्वसामान्य शिवसैनिक म्हणजे एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होणार अशी माझी खात्री होती)…

भक्तांनी मात्र… उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी लाचारी पत्करली आणि शिवसेना आता लाचार सेना झाली आहे… हा नॅरेटिव्ह सोशल मीडियावर चांगलाच रुजवला..

प्रत्युत्तर म्हणून “१०५ घरी बसवले” हे आमचे चिडवणे भक्तांच्या भयंकर जिव्हारी लागत होती… “मी पुन्हा येईन”ची आम्ही यथेच्छ टवाळी करत होतो… आणि बिच्चारे भक्तुले मान खाली घालून चूपचाप ऐकत असत…

(क्रमश:)

– तुमचाच
बाळासाहेबांचा शिवसैनिक

या आधीचे भाग वाचा –

१) शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग १

२) शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग २

३) शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग ३

४) शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग ४

५) शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग ५

६) शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग ६

अन्य लेख

संबंधित लेख