Friday, February 27, 2026

शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग ८

Share

२८ नोव्हेंबर २०१९ रोजी उद्धव साहेब आणि त्यांच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी झाला…

बेरकी शरद पवारांनी गृह आणि अर्थ अशा दोन्ही खात्यांचे लोण्याचे गोळे पळवले… अन्न नागरी पुरवठा, सहकार, गृहनिर्माण अशी सगळी कळीची खाती देखील ढापली… कायमस्वरूपी उपमुख्यमंत्री असलेले अजीत पवार मानगुटीवर बसले ते वेगळेच…

काँग्रेसने महसूल, सार्वजनिक बांधकाम, शालेय शिक्षण, वैद्यकीय शिक्षण खात्यांवर दरोडा घातला…

मग उरलं काय आणि शिवसेनेच्या वाट्याला आलं काय?… अळवाचं फदफदं…

उद्योग आणि सार्वजनिक बांधकाम (हे सुद्धा फक्त सार्वजनिक उपक्रम) सोडलं पण आमच्याकडे सगळी दुय्यम तिय्यम दर्जाची खाती आली…

पण त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त आमचे आमदार असताना आणि मुख्यमंत्रीही आमचा असताना… गृह आणि अर्थ खाती शिवसेनेला न मिळण्याची आमची सल भयंकर होती…

उद्धव साहेबांनी आम्हा शिवसैनिकांना तिसरा धक्का दिला तो म्हणजे… पहिल्यांदाच आमदार झालेले आदित्य साहेब थेट कॅबिनेट मंत्री झाले… आणि मुंबई उपनगराचे पालकमंत्री देखील…

मोठ्या साहेबांचा नातू म्हणून… ठाकरे घराण्याच्या पुढच्या पिढीचा वारसदार म्हणून… काही हरकत नाही म्हणत मी तो धक्का सहन केला पण…

पण मुंबई शहराचा पालकमंत्री काँग्रेसचा असलम शेख झाला… हा धक्का सहन करण्यापलीकडचा होता… त्याने हाजी अलीच्या दर्ग्याला मुगल गार्डनच्या धर्तीवर बाग बनवण्यासाठी ५० कोटी रुपये देऊ केले…

भरीस भर म्हणून तुम्ही भायखळ्याला उर्दू भाषा भवनासाठी एक भूखंड दिलात… आणि त्याच्यासाठी महापालिकेने जवळपास १३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला… आणि त्यावेळी मराठी भाषा भावनाचा कोणताच अतापता नव्हता…

माझं मन खूपच खट्टू झाले… मुंबईचा पालकमंत्री नेमताना उद्धव साहेबांनी थोडी काळजी घ्यायला हवी होती असे मला मनापासून वाटू लागले… अर्थात राजकारणात नाईलाजाने अशा तडजोडी कराव्या लागतात असे म्हणून मी माझ्या मनाला समजावले…

आणि या सगळ्या गदारोळात आम्ही भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडल्यामुळे… केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांना मंत्रिमंडळाचा राजीनामा द्यावा लागला होता… त्यामुळे आता केंद्रातल्या सत्तेत आमचा कोणताही मंत्री नव्हता…

उद्धव साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर लगेच… २२ जानेवारी २०२० रोजी… नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीवरुन सुरु असलेल्या वादावर मुंबईतील २०० मुस्लीम नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव साहेबांची पोलीस आयुक्तालयात भेट घेतली… मुख्यमंत्री आहेत त्यांना कोणीही भेटू शकतं म्हणून ती बातमी मी काही खोलात जाऊन वाचली नाही…

दुसऱ्या दिवशी आमच्या नाक्यावरच्या रोजच्या चहाच्या अड्ड्यावर एक खवट्या भक्त भेटला… आणि त्याने त्या २०० मुस्लिम नेत्यांमध्ये रझा अकादमीचे नेते देखील होते असे सांगितले… उद्धव साहेबांचा रझा अकादमीच्या प्रमुखांबरोबरचा फोटोही त्याने मला दाखवला… रझा अकादमी म्हटल्यावर माझे कान उभे राहिले…

याच रझा अकादमीने ११ ऑगस्ट २०१२ला… आझाद मैदानावरील मोर्चाच्या वेळी अक्षरशः नंगानाच घातला होता… पोलिसांच्या गाड्या पेटवून दिल्या होत्या… हुतात्मा स्मारकाची लाथा मारून विटंबना केली होती… अगदी महिला पोलिसांच्या अब्रूला देखील हात घातला होता… त्या रझा अकादमीच्या प्रमुखांना भेटायची उद्धव साहेबांना काय गरज होती हेच मला कळेना?…

रझा अकादमीच्या मोर्चातील नंगानाच एक वेळ परवडला… पण या भक्तांचा त्या भेटीवरूनचा नंगानाच मला जास्त घाबरवत होता…

यानंतर मार्च २०२० मध्ये कोरोनाची लाट आली… कोणीच कल्पना केली नसेल अशा एका भयंकर संसर्गजन्य रोगाची जगभरातच लाट आली होती… कडक लॉकडाऊनमुळे संचारबंदी सारखी स्थिती होती… शासन प्रशासन जनता सगळेच हतबल झाले होते… या रोगावर कोणती लस नसल्यामुळे सगळ्यांमध्येच एक असाहाय्यतेची भावना होती…

कोणत्याच सभागृहाचे सभासद नसल्यामुळे उद्धव साहेबांना ६ महिन्याच्या आत विधीमंडळाच्या कोणत्या तरी सभागृहात निवडून येणे आवश्यक होते…

विधानसभेत निवडून येणे शक्यच नव्हते… कारण शिवसेनेच्या एखाद्या आमदाराने राजीनामा देऊन उद्धव साहेबांसाठी जागा मोकळी केली असती तर… या कपटी कमळाबाईने कोरोनाचे कारण पुढे करून निवडणूकच होऊ दिली नसती आणि उद्धव साहेबांचे मुख्यमंत्रीपद गेले असते…

म्हणून उद्धव साहेबांनी विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदार होण्याचा प्रयत्न केला… पण मोदी शहांच्या हातातला बाहुला असलेला तो काळी टोपी धोतरवाला म्हातारा कोश्यारी तात्या… मुख्यमंत्री हा राज्यपाल नियुक्त आमदार असणे शोभणार नाही असे सांगून टाळाटाळ करायला लागला.

म्हणून शेवटी विधान परिषदेवर निवडून येण्यासाठी तयारी करावी लागली… पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनामुळे अमेरिकेत अडकलेल्या मुख्य निवडणूक आयुक्तांना फोन करून महाराष्ट्रातील विधान परिषदेची निवडणूक घ्यायला सांगितली… म्हणून आज उद्धव साहेब मुख्यमंत्री आहेत… अशा फुशारक्या मारणाऱ्या भक्तांना मी… “मोदी गया तो समझो गुजरात गया” असा बाळासाहेबांनी तुमच्या अडवाणी वाजपेयींना सज्जड दम दिला म्हणून त्यांचे मुख्यमंत्रीपद वाचले आणि म्हणून आज ते पंतप्रधान होऊ शकले… तुमच्या मोदीने काही उपकार नाही केले… उलट त्या उपकाराची परतफेड केली आहे… असे सांगून हडकावतो…

मात्र निवडणूक लढवण्यासाठी तुम्हाला तुमची संपत्ती जाहीर करावी लागली होती… मुंबई महापालिकेच्या कंत्राटांमधील टक्केवारीची चर्चा भक्त मंडळी अगदी चवीने करू लागली… जनतेमध्येही दबक्या आवाजात चर्चा चालू झाली होती… आमच्या दृष्टीने उद्धव साहेब बाळासाहेबांचे सुपुत्र असल्यामुळे हा आकडा गौण होता…

ही वेळ मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेचे “कुटुंब प्रमुख” या नात्याने राज्याची काळजी घेण्याची होती… उद्धव साहेबांनी ती पुरेपूर घेतली… आता या काळात ते मंत्रालयात गेलेच नाहीत… फेसबुकवरून कारभार चालवला… या कमळाबाईच्या पिलावळीच्या आरोपात काय अर्थ आहे?… अरे अक्कलशून्य भक्ताडांनो… आज वर्क फ्रॉम होमचाच जमाना आहे… आणि फेसबुकसारखं जनतेशी संवाद साधण्याचे दुसरे प्रभावी माध्यम नाही… उद्धव साहेबांनी नेमकं तेच केलं… तुमचा मोदी नाही का आकाशवाणी वरून मन की बात करत… ते काय असतं?… असं विचारलं की माना खाली घालतात…

पण त्यातला एखादा दीड शहाणा भक्त… पण मोदीजी देशभर  फिरताहेत म्हणाला की मी… त्या मोदीला बायका पोरं नाहीत… मागे पुढे रडायला पण कोणी नाही सांगितले की… तोंडात खेटर मारल्यासारखा गप्प बसायचा…

अजून एखादा अडीच शहाणा भक्तुला पचकायचाच… देवेंद्रजी विरोधी पक्षनेते असून पायाला भिंगरी लावल्यासारखे फिरताहेत… त्याला मी चांगलाच खडसवायचो… अरे हा अनाजी पंत इतका कारस्थानी आहे की, कोरोना पण घाबरून याच्या वाटेला जाणार नाही…

हे काय घेऊन बसलात… उद्धव साहेबांच्या घरीच मंत्रालय येतं… कारभार चालल्याशी मतलब… घरून काय नि मंत्रालयातून काय… उद्धव साहेबांची सही होणं महत्वाचं… माझ्या दृष्टीने हा विषय संपला…

पण मुख्यमंत्री उद्धव साहेब यांच्या कारकिर्दीत सामान्य शिवसैनिकाला व्यथित करणाऱ्या काही घटना निश्चितपणे घडल्या… त्यातल्या काही तर दूरदृष्टीचा विचार केला असता भयंकर घातक होत्या… आम्ही त्याचे समर्थन करू शकत नव्हतो… बाहेरून भाजपच्या भक्ताडां समोर त्या घटनेच्या समर्थनाचा कितीही आव आणला तरी ते उसने अवसान असायचे… आमचा आतला आवाज सांगत असायचा… कुठेतरी काहीतरी चुकतंय… “तोंड दाबून बुक्क्याचा मार” म्हणजे काय ते आयुष्यात आम्ही पहिल्यांदा अनुभवत होतो… आमच्या आत मध्ये एक अपराधीपणाची… न्यूनगंडाची भावना तयार झाली होती…

नंतर माझ्या एका खास मित्र भक्ताने हसत हसत माझ्याकडे उद्धवजींचे आभार मानले होते… तो म्हणाला… कोरोना काळात उद्धवजी महाराष्ट्र पिंजून काढतील अशी आम्हाला भीती वाटत होती… त्यांच्या हातात सत्ता होती… कोरोना सारख्या आपत्ती काळात मिळालेले विशेष अमर्याद अधिकार होते… तुमचा साहेब जर त्यावेळी आमच्या देवेंद्रजींसारखा पायाला भिंगरी लावून फिरला

असता तर पुढच्या निवडणुकीत आमचे तेल निघाले असते… पण तुमचा हा “घरकोंबडा” घरीच बसला आणि आम्ही सुटकेचा निःश्वास सोडला…

५ एप्रिल २०२० रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात अनंत करमुसे यांनी सोशल मीडियावर एक आक्षेपार्ह (मॉर्फ केलेले) चित्र पोस्ट केले होते…या पोस्टमुळे संतप्त झालेल्या जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षारक्षकांनी आणि कार्यकर्त्यांनी करमुसे यांना आव्हाड यांच्या ‘नाद’ निवासस्थानी नेले आणि तिथे बेदम मारहाण केली… मारहाणीदरम्यान पोलीस कर्मचारीही तिथे उपस्थित होते असा आरोप करण्यात आला…

मीडिया आणि सोशल मीडियावर उद्धव साहेबांच्या सरकारची भयंकर बदनामी करण्यात आली… हे सरकार सूड भावनेने वागते असा भ्रम पसरवण्यात आला… म्हणजे पाप करायचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी आणि बदनामी होणार उद्धव साहेबांची… कमीत कमी शरद पवार साहेब तरी काहीतरी खुलासा करतील अशी माझी अपेक्षा होती… पण बहुदा त्यांनी सगळी जबाबदारी उद्धव साहेबांवरच ढकलली…

याच दरम्यान १६ एप्रिल २०२० मध्ये पालघर जिल्ह्यात २ साधू आणि त्यांच्या गाडीच्या चालकाला अक्षरशः ठेचून ठार मारण्यात आलं… मॉब लिंचींगचा तो भयावह प्रकार होता… अशा घटना कोणतेच सरकार थांबवू शकत नाही… त्यामुळे या प्रकरणात उद्धव साहेबांना दोष देण्यात काहीही अर्थ नाही…

पण ही गोष्ट देखील खरी आहे की… गुन्हेगारांना शासन होण्यासाठी सरकारने कडक कायदेशीर कारवाई करायला हवी होती… आणि गृह खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्यामुळे ती त्यांची जबाबदारी होती… त्यांनी ती कितपत पार पाडली याची मला तरी कल्पना नाही… (मुख्यमंत्री उद्धव साहेबांची काहीच जबाबदारी नव्हती का?… या भक्तांच्या प्रश्नावर… उद्धव साहेब कोरोनाशी लढतील की साधूंच्या खुन्यांशी?… असे थातुर मातुर उत्तर देऊन मी माझी सुटका करून घेत असे…)…

काहीही असले तरी ही घटना माझ्या खूप जिव्हारी लागली… शिवसेनेच्या राज्यात ही घटना व्हायला नको हवी होती… आम्ही हिंदुत्वाचा वसा घेतला होता… मृत्यूपूर्वीचा त्या साधूचा तो केविलवाणा… आयुष्याची भीक मागणारा चेहरा पाहिला की माझ्या मनाला खूप वेदना होतात… आणि क्षणभर वाटते तो उद्धव साहेबांच्या सरकारला शापत असावा… पण साधुसंत कधी शापत नाहीत असे म्हणून मी माझ्या मनाचे समाधान करून घेतो… कितीही राजकीय कोलांट्या उद्या मारल्या… शाब्दिक कसरती केल्या तरी… माझ्या आत साहेबांनी घडवलेला हिंदू अंतरात्मा होता… तो मला स्वस्थ बसू देईना…

८ जूनला सुशांत सिंह राजपूतची सेक्रेटरी असलेल्या दिशा सालीयनने आपल्या मालाडच्या १४व्या मजल्यावरच्या फ्लॅटमधून उडी मारून आत्महत्या केली होती. विरोधकांनी आदित्य साहेबांचे नाव घेऊन नुसता धुराळा उडवला होता…

त्यानंतर लगेचच अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने १४ जून २०२० रोजी मुंबईत आत्महत्या केली… त्याच्या मृत्यूभोवती मिडिया आणि सोशल मीडियावर संशयकल्लोळ उभा केला गेला… रिपब्लिक टीव्हीचा हलकट अर्णब गोस्वामी यात सगळ्यात आघाडीवर होता… पण ती आत्महत्याच होती या बाबतीत माझ्या मनात कोणतीच शंका नव्हती… मुंबई पोलिसांच्या तपासात तसेच स्पष्ट झाले होते…

या प्रकरणी पाटणा शहराचे पोलीस अधीक्षक (SP) विनय तिवारी हे सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासावर देखरेख करण्यासाठी २ ऑगस्ट २०२० रोजी मुंबईत पोहोचले होते… त्यांना आयपीएस मेसमध्ये राहण्यासाठी जागा तर दिलीच नाही पण वर हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारून १४ दिवसांच्या विजनवासात पाठवण्यात आले…

काहीही झालं तरी तो एक आयपीएस ऑफिसर होता… आपली ड्यूटी बजावण्यासाठी तो मुंबईत आला होता… मुंबई पोलिसांच्या तपासावर तो काय आणखी तपास करणार होता?… तो कोण मोठा शेरलॉक होम्स लागून गेला होता?… कर नाही त्याला डर कशाला हवी होती?… उद्धव सरकारने गरज नसताना विरोधकांच्या संशयकल्लोळाला आयती संधी दिली… असं मला कायम वाटत राहिलं…

त्या दीड फूट्या नेपाळी नितेश राणेने… आदित्य साहेब त्यावेळी तिथे उपस्थित होते… त्यांचा सीडीआर चेक करा म्हणून उद्धव सरकारला अक्षरशः कोंडीत पकडले… त्यावेळी आदित्य साहेब हे उद्धव साहेबांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री असल्यामुळे उद्धव साहेबांच्या सरकारची त्यातून सुटका होण्यासारखी नव्हती… आरोप भयंकर गंभीर होता…

वास्तविक उद्धव सरकारने ताबडतोब आदित्य साहेबांचा सीडीआर काढून… विरोधकांच्या विशेषतः त्या दीड फुट्या नेपाळच्या तोंडावर मारायला हवा होता… एक अक्षर न बोलता आदित्य साहेब सहीसलामत सुटले असते… आम्ही वाट बघत होतो… अजूनही बघतोच आहे… दाल में कुछ काला तो नही ना?… अशी शंका माझ्या मनाला चाटून जाते…

४ नोव्हेंबर २०२० रोजी रिपब्लिक टीव्हीच्या अर्णब गोस्वामीला मुंबई पोलिसांनी घरातून उचलला तेव्हा आम्हा शिवसैनिकांना खरोखर मनापासून आनंद झाला होता… उद्धव साहेबांच्या कारकिर्दीतील प्रत्येक राई एवढ्या चुकीचा पर्वत करायचा… आपल्या टीव्ही चॅनेलवर नुसती बोंबाबोंब करायची… “पूछता है भारत”च्या नावाखाली हाच आपल्या मनातले प्रश्न विचारायचा… अर्णव गोस्वामी ठाकरे सरकारच्या पाठी हात धुवून लागला होता… कोणाची तरी सुपारी घेतली असावी तसा…

मात्र अर्णब गोस्वामीच्या अटकेवर विरोधकांनी विशेषता भाजपने प्रचंड गदारोळ माजवला… वृत्तपत्र स्वातंत्र्यावर हल्ला म्हणून महाविकास आघाडी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले… आणीबाणी वेगळी काय होती? असा सवाल मीडिया सोशल मीडिया सगळीकडे विचारला जाऊ लागला… भक्तांच्या भडीमाराला उत्तर देणे आम्हाला अवघड होऊन बसले…

फक्त अर्णबला उचलताना असा उचलायला हवा होता की बराच काळ त्याला जामीन देखील मिळाला नसता… तो आतच राहिला असता… अर्णबचा उल्लेख असलेली पण न्यायालयाने बंद केलेली इंटिरियर डिझायनर अन्वय नाईक आणि त्यांच्या आईने केलेल्या आत्महत्येची जुनी फाईल… न्यायालयाच्या परवानगी शिवाय परत ओपन करून अर्नबला अटक करण्याचा मूर्खपणा गृहखात्याने कोणा मूर्खाच्या सल्ल्यावरून केला देव जाणे… ती काळजी न घेतल्यामुळे त्याला आठवड्याभरातच जामीन मिळाला… आणि तो विजयी वीरासारखा बाहेर आला… अर्थात ही चूक गृहखात्याची होती आणि गृहखाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे होते…

न्यायालयाने बंद केलेली फाईल… न्यायालयाच्या परवानगी शिवाय परत ओपन करणे हा न्यायपालिकेचा अक्षम्य असा अपमान होता… महाराष्ट्राच्या गृह खात्याने विरोधकांच्या हातात कोलीत दिले होते… पण शेवटी महाविकास आघाडीचे सरकार हे  ठाकरे सरकार म्हणून ओळखले जात होते… त्यामुळे आमचे उद्धव साहेब बदनाम होत होते… भक्तांना तर नुसता चेव चढला होता… प्रत्येक भक्त स्वतःला छोटा मोठा अर्णब गोस्वामी समजत होता… तावातवाने जाब विचारत होता… उद्धव सरकारकडून घिसाडघाई झाली होती एवढे निश्चित…

(क्रमश:)

– तुमचाच
बाळासाहेबांचा शिवसैनिक

या आधीचे भाग वाचा –

१) शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग १

२) शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग २

३) शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग ३

४) शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग ४

५) शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग ५

६) शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग ६

७) शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग ७

अन्य लेख

संबंधित लेख