Monday, December 1, 2025

 ‘पैठणला देशातील पहिल्या १० स्वच्छ शहरांमध्ये आणणार’ – मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रचारसभेत ग्वाही

Share

पैठण (छत्रपती संभाजीनगर) : आगामी पैठण नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पैठण येथे भव्य जाहीर सभेला संबोधित केले. भाजपच्या नगराध्यक्ष उमेदवार मोहिनी लोळगे आणि सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्यासाठी आयोजित या सभेत फडणवीस यांनी पैठण शहराला पुन्हा वैभवशाली ओळख मिळवून देण्याचा संकल्प व्यक्त केला.

संत एकनाथ चरणी नतमस्तक, ‘दक्षिण काशी’तून प्रचाराची सुरुवात

दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैठणमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी संत शिरोमणी संत एकनाथ महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन दिवसाची सुरुवात केली. देवेंद्र फडणवीस म्हणाले: “पैठण हे अत्यंत ऐतिहासिक आणि वैभवशाली शहर आहे. या शहराला इतिहासात जो मान, गौरव आणि ओळख लाभली होती, तोच गौरव पुन्हा प्राप्त करून देण्याचा आमचा संकल्प आहे.”

पैठणसाठी ‘स्वच्छता मिशन’ आणि विकास योजना

फडणवीस यांनी पैठण नगरपालिकेत भाजपची सत्ता आल्यास शहराच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना राबवण्याची ग्वाही दिली:

स्वच्छ शहर मिशन: “स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पैठणला देशातील पहिल्या १० स्वच्छ शहरांमध्ये स्थान मिळावे, यासाठी आवश्यक ती सर्व मदत आम्ही निश्चितपणे करणार आहोत.”

पूर नियंत्रण: गोदावरी नदीला पूर आल्यानंतर त्या भागातील घरे विस्थापित होऊ नयेत यासाठी आवश्यक उपाययोजना करणार आहोत.

पक्षी अभयारण्य तोडगा: जायकवाडी धरण परिसरातील ‘पक्षी अभयारण्यामुळे मासेमारीवर आलेल्या निर्बंधावर तोडगा काढण्यासाठी येत्या अधिवेशनात बैठक घेऊन मार्ग काढू,” अशी घोषणा त्यांनी केली.

रोजगार आणि औद्योगिक विकास

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला औद्योगिक जिल्हा म्हणून विकसित करण्यावर भर देताना फडणवीस यांनी पैठणमधील रोजगाराच्या संधींवर भाष्य केले. “पैठण एमआयडीसीमध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योग येत आहेत. त्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराच्या व्यापक संधी उपलब्ध होतील.”

“येत्या २ तारखेला कमळ चिन्हाला मत टाकण्याची काळजी तुम्ही घ्या, पुढची ५ वर्षे पैठणवासियांची काळजी आम्ही घेऊ असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.” या जाहीर सभेला मंत्री अतुल सावे, खासदार डॉ. भागवत कराड, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे व इतर मान्यवर उपस्थित होते.

अन्य लेख

संबंधित लेख