देखणे ते चेहरे जे प्रंजलाचे आरसे
देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे
या ओळी अगदी तरुणपणी पु ल आणि सुनीताबाईंच्या काव्यावाचन कार्यक्रमात ऐकल्या तेव्हां त्याचा अर्थ फार कळला नव्हता. इतक्या दशकांनंतर तो असा डोळ्यासमोर उभा राहील अशी कल्पनाच नव्हती. अचानक ते देखणे चेहरे आणि देखणे हात आणि हडमासाची माणसे पाहताना या ओळी अगदी अचूक डोळ्यासमोर उभ्या ठाकल्या.
Little Rann या प्रदेशात असंख्य प्रकारचे आणि रंगांचे पक्षी सहज दिसतात. सगळाच आसमंत भारून जातो त्यांच्या आवाजाने व रंगांनी. त्यांचे उडणे, विहरणे, थव्याने जागा बदलणे सगळेच अगदी मन मोहक. जिथे मनुष्य प्राण्याचे फार अस्तित्व फार नाही, तिथे ते निर्भयपणें विहरतात. त्यांची अन्नसाखळी उपलब्ध आहे. जो पर्यंत तापमान योग्य असते, तो पर्यंत म्हणजे उन्हाळ्याच्या प्रारंभा पर्यंत त्यांचे वास्तव्य असते. तो सगळा प्रदेश म्हणजे पाणथळ. पक्षी सहज चालत चालत त्यांचे अन्न म्हणजे लहान मोठे मासे, पकडतात. शिवाय खेचारांचे कळप सहज दिसतात. फार आपल्या जवळ येत नाहीत. थोडे अंतर ठेऊनच पहावे लागतात, हा प्राणी मात्र देखणा आहे. फोटो साठी संधी कमीच. मात्र वनस्पती जीवन फार कमी. एका मर्यादपर्यंतच झुडुपे दिसतात. त्यापुढे अथांग वाळवंट, गवताचे पातेही क्वचितच दिसते.

पुढे मिठागरे आहेत, भूगर्भातून पाणी उपसून ते तयार केलेल्या उथळ खड्यात सोडतात.पाण्याचे बाष्पीभवन होऊन मग मीठाचे स्फटिक तयार होऊ लागतात. लांबून एक अगदी झोपडीवजा घर दिसले, तिथे पोचता पोचता एक तरुण म्हणावी अशी स्त्री बाहेर आली. इतका वेळ मानवाचे अस्तित्वच न जाणवल्या मुळे नवलच वाटले. चेहऱ्यावर प्रसन्न भाव व मंद स्मित. तिला विचारलं की तिच्या घरचे फोटो काढू का? ती आनंदाने हो म्हणाली. तिचे नाव खुशी
घर अगदी साधे, आत फार सामान नाही, आजूबाजूला मैलोन मैल काही नाही, म्हणजे एक शेजारची झोपडी सोडली तर कशाचेच अस्तित्व नाही. बाहेर सोलर पॅनल बसवलेले,त्यावर पाणी उपसण्यासाठी पंप चालतो व विजेचे दिवे लागतात, शिवाय फोन रिचार्ज होतो. पिण्यासाठी व वापरण्यासाठी पाणी टँकरने येते. सामान तिचा नवरा गरजे प्रमाणे आणतो.
शेजारच्या घरात लहान मुलगी होती, तीही उत्सुकतेने पाहत होती, फोटो काढू का म्हणाल्यावर थोडी लाजली, पण आईची परवानगी आहे असे पाहताच आनंदाने तयार झाली. आम्ही पोचलो तेंव्हा निर्व्याज आनंदाने बागडत होती. आपल्या सभोवती सामान्यपणे जशी मुले दिसतात तशीच आनंदात दिसत होती. आजूबाजूच्या परिस्थितीचा परिणाम तिच्यावर नव्हता. तिचे वडील आम्हाला तयार झालेले मीठ दाखवत होते. पांढरे शुभ्र खडे मीठ त्यांनी काढून हातावर ठेवले. इतके नैसर्गिक व शुद्ध मीठ मी प्रथमच पाहताना मन अगदी हरखून गेले. आता हळु हळू प्रकाश कमी होत होता, सूर्यास्ताची वेळ होती. माझे शहरी मन बिचकत होते, त्याभरात मी एक खुळाच प्रश्न खुशीला विचारला. भीती नाही वाटत इथे तुम्हाला? तिच्या चेहेऱ्यावर आश्चर्य दाटले, व गोंधळून ती म्हणाली नाही, पण तिला बहुतेक विचारायचे होते, का वाटेल भीती? माझे पुढचे प्रश्न मनातच विरले.

वाटले विचारावे त्यांना, करमणुकीचे साधन काय, मुलांच्या भविष्याचा ते काय विचार करतात. पण ते सारे विरले. लांबवर एक खेळण्यातली दिसावी तशी इमारत दाखवून ड्रायव्हर म्हणाले,” तिथे ही मुले थोडे शिकतात”. आजुबाजुला तर काही वस्ती नव्हती, मग कोण येते शिकायला, असे वाटले, पण काय विचारणार?
खुशीचे लग्न १५ वर्षापूर्वी झाले, तेंव्हा पासून ती दोघे हे काम करत असावीत. वाळवंट अन हाडे गराठवणारी थंडी व भीषण उन्हाळा हाय कमाचा कालखंड. तापमान ५० अंशांपर्यंत जाते. आपण पुणेकर ४० तापमान टेकले की अवकाळी पावसाची वाट पाहणारी माणसे. त्यालाच भीषण उन्हाळा म्हणणार, अस्वस्थ होणार. पण या माणसांच्या कमावरच्या निष्ठेचे दर्शन अंतर्मुख करणारे होते. आपल्या रोजच्या अन्नात विलक्षण चवीची पखरण करणारे त्यांचे हात पाहून मन अंतर्बाह्य थरारले. कष्टाला पारावारच नाही. म्हणूनच मिठाला जागावे असे म्हणत असावेत.
असे देखणे चेहरे व हात पाहण्याचा हा भग्यायोग होता.
विद्या देशपांडे