Friday, November 22, 2024

‘एकरूप होऊ सगळे आम्ही एकीयाचे बळे’

Share

सद्भावना बैठकीत पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी दिला मंत्र

▪️कितीही संकटे,अडचणी आल्या तरीही आपण सर्वांनी एकी आणि एकजुटीने एकमेकांना आधार दिला पाहिजे. समजून घेत सामावून घेतले पाहिजे. अनादी काळापासून आपल्या भाषा, देव-देवता भिन्न आहेत. असे असले तरी; आपण एक समाज, एक राष्ट्र आहोत. माता भूमी आहे. मी पृथ्वीचा पुत्र आहे तोच हा अखंड भारत आहे. एकतेची कास धरणे हीच काळाची गरज आहे. जेजुरी येथे नुकत्याच झालेल्या सद्भावना बैठकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी दिलेला मंत्र कार्याची दिशा स्पष्ट करणारा आहे.

▪️सर्व ज्ञातींच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन करताना पू. डॉ. भागवत यांनी सर्व ज्ञातींना एकोपा ठेवण्याचा दिलेला संदेश महत्त्वपूर्ण आहे. पू. सरसंघचालक यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा हा गोषवारा…

▪️विषमता
सामाजिक आर्थिक विषमता हा सर्व ज्ञातींचा प्रश्न आहे. विदेशी आक्रमणामुळे प्रत्येकाला कोणाकडे तरी पहावे लागते, अवलंबून राहावे लागते, त्यामुळे परावलंबित्वाची भावना निर्माण झाली आहे. आपण ग्रामविकास करायला पाहिजे, मतभेद विसरून गावाच्या हितासाठी एक व्हायला हवे. फोडा आणि जोडा ही इंग्रजांनी निती अवलंबण्याचा कोणालाही मोह होऊ नये इतके आपल्याला एक राहावे लागणार आहे. सामाजिक न्याय, आरोग्य, शिक्षण या सुविधा सर्वांना मिळायला पाहिजेत. समाज म्हणून, एक राष्ट्र म्हणून हिंदू समाज सद्भावनेतून विकसित करणे, ‘एकीच्या बळावर एकरूप होऊ सगळे’ असेच आपले वर्तन असावे असा एकीचा संदेश देत सरसंघचालक पू. डॉ. भागवत यांनी मार्गदर्शन केले.

▪️जितक्या ज्ञाती तेवढे प्रश्न आणि तितक्याच शंका. या बैठकीला उपस्थित अनेक ज्ञाती बांधवांनी अत्यंत मोकळेपणाने आपल्या शंका, प्रश्न पू. सरसंघचालकांसमोर मांडले.

▪️समरसतेचा मंत्र
एका प्रश्नाला उत्तर देताना जातीनिहाय जनगणना हे सरकारचे काम आहे; आपले नाही, असे पू. सरसंघचालक डॉ. भागवत यांनी स्पष्ट केले. समाजात जे मागे, अप्रगत राहिलेले आहेत, त्यांचा शासनाला विकास करायचा आहे. संविधानानुसार आपण सर्व समान आहोत. जनगणनेचा राजकीय फायदा घेतला जाऊ नये. हिंदू धर्मात जाती नाहीत. मंदिर हा धर्म नाही, भेदाभेदाला हिंदूशास्त्रात कोठेही स्थान नाही. सध्या मात्र ‘जात’ संकल्पना विकसित होत आहे. व्यवस्था बदलत राहतात. मात्र आपला एकोपा कायम टिकायला हवा. एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हायला हवं. आक्रमण काळात जाती तीव्र झाल्या. संकट आल्यावरच एकत्र यायला पाहिजे असे नव्हे तर कायमस्वरूपी मतभेद विसरून एकत्र आले पाहिजे. `मात्र मला काय त्याचं,’ ही भावना असता कामा नये. प्रत्येकाचे प्रत्यक्ष वागणे सद्भावाचे पाहिजे. पुढच्या पिढीला सर्व मिळायला पाहिजे म्हणून आधीची पिढी झटत असते; मुलांना सगळे उत्तम मिळायला पाहिजे यासाठी आई झटते तशी वृत्ती बाळगायला पाहिजे. आपला-परका या पद्धतीने आपण फरक करत असतो. गणेशोत्सवाप्रमाणे वाल्मिकी जयंतीही सर्वांनी मिळून साजरी केली पाहिजे. सध्या महापुरुषांना आपण वाटून टाकले आहे, हे चुकीचे आहे.

▪️समरसतेचा विचार कायम मनात आणि आचरणात असावा. हिंदू समाजात जितके प्रकार तितके मित्र असावेत. सर्वांचे एकमेकांशी येणे-जाणे, संबंध, जिव्हाळा, आत्मीयता वाढला पाहिजे. भेटीची वारंवारिता वाढल्यास द्वेषभावना आपोआप गळून पडतात.

▪️मनोवृत्तीत बदल व्हावा
शाळेच्या दाखल्यांवरील जातीचा उल्लेख काढावा. असे झाले तर उत्तम होईल. शासनाकडून मात्र तसे बदल होण्यापूर्वी स्वतःमध्ये, आपल्या मनोवृत्तीत बदल व्हायला हवा. समाजाच्या, एकतेच्या आड काहीच यायला नको. पुढील दोन वर्षात आपल्याच उद्धारासाठी समाजातील सज्जनशक्तीने एकत्र येऊन सर्व समाजातून पुढे जावे; हळूहळू प्रक्रिया सुरू करावी. हे होणे अवघड वाटत असले तरी अशक्य नक्कीच नाही.

▪️भूता परस्परे जडो
भारताने जगाला जोडणारा धर्म दिला. धर्माची चौकट – सत्य, करुणा, पवित्रता, तपश्चर्या यामध्ये आहे. तोच खरा धर्म. ज्यामुळे हिंसा होते, अंतरबाह्य पवित्रता बिघडते तो अधर्म. धर्म हा भारताचा प्राण आहे. देशात पवित्र स्थाने सर्वत्र आहेत. भगवान महावीर, गुरुनानक, संत ज्ञानेश्वर यांनी देशासाठी, समाजासाठी काम केले आहे. सर्वांनी भारतीय धर्मासोबत कर्म केले आहे. धर्माची शिस्त असते ती पाळावी. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे हेच महत्त्वाचे नाही का!

▪️वसुधैव कुटुंबकम्
पोट भरण्यास शिक्षण आवश्यक आहेच. मनगटातील ताकद महत्त्वाची असून चांगला माणूस निर्माण होण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे. मनुष्य हा विचारी प्राणी आहे, करुणा आपलेपणा त्याच्या अंगी आहे. त्यामुळेच भुकेलेल्यासमोर आपण जेऊ शकत नाही. त्यांचा विचार आपल्या मनात आधी येतो. हे आपल्याला संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, संत गाडगेबाबा यांच्या शिकवणुकीतून उमगले आहे. शिक्षणाचा उपयोग आत्मविश्वास वाढण्यासाठी करायला हवा. सकारात्मक विचार, आत्मविश्वास देणारे, माणुसकी शिकविणारे शिक्षण हवे. विद्या आपले जीवन सुखरूप करते.आधुनिक ज्ञान विज्ञान पुढे गेले आहे. विज्ञान जवळ आले आहे. एक विश्वव्यापी जाणिवेतून ते उभे राहिले आहे; नेणिवेच्या पलीकडे ही जाणीव आहे. उचित वेचावे, समाज म्हणून एक देश म्हणून आपण नेहमी उभे राहावे एक आहोत एकच राहिले पाहिजे उपेक्षा झाली तरी सांभाळून घ्यावे सर्वांना सामावून घेतले पाहिजे.

▪️एकरूप होऊयात
कायदा पाळूनच समाज चालावा लागतो. समाजासाठी काही नियम आहेत. आपलेपणामुळे सद्भावना ही आपली देशाची भावना आहे. उदार लोकांची पृथ्वी एक कुटुंब आहे अनादी काळापासून आपल्या भाषा देव-देवता वेगवेगळ्या आहेत आपण एक समाज एक राष्ट्र आहोत. आपण सर्व हिंदू आहोत त्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतील. आपण ज्या वर्गाचे लोकप्रतिनिधित्व करत आहोत त्याच्या विकासासाठी, त्या ज्ञातीत काम करावे. प्राप्त परिस्थितीत आपणा सर्वांना मिळून चांगले काम करता येईल. उदाहरणार्थ आर्थिक समस्या, आक्रमण. आपल्यातील दुर्बल जे आहेत त्यांची सक्षमता कशी करता येईल, त्यांना सशक्त करण्यासाठी काय करता येईल यावर विचार मंथन केले पाहिजे. विखुरलेला समाज एकत्रित करून देश उभा राहिला पाहिजे. देश सशक्त होणे ही जगाची आवश्यकता आहे. एकत्र राहणेही कायमचीच गरज आहे त्यासाठी फक्त सद्भावना हवी.

सद्भावना अनंत आहेत तसेच कार्य करत राहूया, समस्यांना उपाय शोधूया, आपल्या सर्वांना धैर्याने मात करावी लागेल. एकरूप राहूया सगळे…

अंजली तागडे

अन्य लेख

संबंधित लेख