मुंबई : मुंबई आणि मराठी माणसाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “विकास करणारे आपल्या कामातून ओळख निर्माण करतात, तर बोलघेवडे फक्त पोकळ घोषणांवर जगतात,” अशा शब्दांत उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटावर (उबाठा) कडाडून टीका केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी भाजप सरकारने मुंबईसाठी केलेली कामे आणि ठाकरे सरकारच्या काळातील अपयशाची तुलना करणारा ‘हिशोब’ मांडला आहे.
भाजपच्या कामांची ‘विकासगाथा’
मुंबईच्या पायाभूत सुविधांमध्ये भाजपने कशा प्रकारे क्रांती घडवून आणली, याची यादीच उपाध्ये यांनी सादर केली. त्यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे:
नितीन गडकरींचे योगदान: मुंबईत ५६ उड्डाणपुलांचे जाळे विणणे आणि वांद्रे-वरळी सी-लिंकसारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्याचे श्रेय गडकरींना जाते.
देवेंद्र फडणवीस यांचा ‘व्हिजन’: मुंबईचा नवा अभिमान असलेला ‘अटल सेतू’ (MTHL), देखणा ‘कोस्टल रोड’ आणि शहरात पसरलेले मेट्रोचे जाळे ही फडणवीस यांच्या दूरदृष्टीची फळे आहेत.
गोपीनाथ मुंडे: मुंबईला ९० च्या दशकातील भीषण टोळीयुद्धातून मुक्त करून सर्वसामान्यांना सुरक्षितता मिळवून देण्यात मुंडेंचा मोलाचा वाटा होता.
पंतप्रधान मोदी: दशकांपासून प्रलंबित असलेला मराठी भाषेला ‘अभिजात दर्जा’ मिळवून देण्याचा ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात झाला.
ठाकरे सरकारवर ‘भ्रष्टाचारा’चा प्रहार
दुसरीकडे, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आणि मुंबई महानगरपालिकेत सत्तेत असताना केवळ अडवणुकीचे राजकारण झाले, असा आरोप उपाध्ये यांनी केला. त्यांनी काही गंभीर मुद्दे उपस्थित केले:
कोरोना काळातील स्थिती: कोरोना संकटकाळात सर्वाधिक मृत्यू मुंबईत झाले आणि या काळात ‘मृतदेह बॅग’ खरेदीतही भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला.
प्रकल्प अडवले: मेट्रोसारखे महत्त्वाचे सार्वजनिक प्रकल्प केवळ राजकीय अहंकारातून अडवून ठेवण्यात आले, ज्यामुळे मुंबईकरांचे नुकसान झाले.
महापालिकेतील लूट: रस्ते, कचरा व्यवस्थापन आणि अगदी गरिबांना दिलेल्या ‘खिचडी वाटपा’मध्येही घोटाळे झाले, असा दावा त्यांनी केला.
“उबाठाने केली मुंबई स्तब्ध”
मुंबई आणि मराठी माणसाच्या केवळ गप्पा मारून या गटाने शहराची प्रगती रोखली आहे. “मुंबई आणि मराठी माणसाच्या विकासासाठी प्रत्यक्ष काम फक्त भाजपनेच केले आहे. उबाठाच्या काळात मुंबईचा वेग मंदावला होता,” अशी टीकाही त्यांनी केली.