नागपूर : सहकाराच्या माध्यमातून खरेदी-विक्री, साठवणूक, प्रक्रिया आणि विपणन व्यवस्था अधिक बळकट करून मच्छिमारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा शासनाचा सातत्यपूर्ण प्रयत्न असल्याचे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केले. राज्यातील मच्छिमार समाजाच्या आर्थिक, सामाजिक व व्यावसायिक उन्नतीसाठी शासनाने राबविलेल्या विविध लोकाभिमुख योजना, धोरणात्मक निर्णय तसेच दिलेल्या सातत्यपूर्ण पाठबळाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने मच्छिमार सहकारी परिषद संस्थेच्या वतीने शिक्षक सहकार बँक सभागृहात आयोजित आभार मेळावा मंत्री राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
मंत्री राणे म्हणाले, मच्छिमार समाज हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा घटक आहे. मच्छिमारांच्या जीवनमानात सुधारणा व्हावी, त्यांचे उत्पन्न वाढावे आणि मत्स्यव्यवसाय अधिक शाश्वत व्हावा, यासाठी शासन विविध योजना प्रभावीपणे राबवत आहे. मत्स्यबीज पुरवठा, आधुनिक बोटी व जाळ्यांसाठी अनुदान, साठवणूक व्यवस्था, मत्स्य प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन, विमा संरक्षण तसेच सुलभ कर्जपुरवठ्याद्वारे मच्छिमारांना सक्षम केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. मच्छिमार सहकारी संस्थांनी एकत्रितपणे आणि पारदर्शक पद्धतीने कार्य केल्यास शासनाच्या योजना अधिक प्रभावीपणे तळागाळातील मच्छिमारांपर्यंत पोहोचतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या मेळाव्यात मच्छिमार बांधवांनी इंधन दरवाढ, बाजारपेठेतील चढ-उतार, नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान, विमा भरपाई तसेच कर्ज प्रक्रियेसंदर्भातील अडचणी याबाबत आपली मते व अपेक्षा मांडल्या. मच्छिमारांच्या समस्यांवर शासन सकारात्मक निर्णय घेईल व आवश्यक त्या उपाययोजना राबविल्या जातील, असे मंत्री राणे यांनी सांगितले.