नागपूर : राज्यातील नगरपालिका निवडणुकीत महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवला असून, उपराजधानी नागपुरात भाजपने आपला बालेकिल्ला अधिक मजबूत केला आहे. या विजयानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्ह्यात भाजपाचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. नागपूर जिल्ह्यातील २७ पैकी २४ नगरपालिकांमध्ये महायुतीने झेंडा फडकावला असून, त्यापैकी २२ नगरपालिका एकट्या भाजपने जिंकल्या आहेत.
भाजप ठरला राज्यातील ‘नंबर १’ चा पक्ष
या निवडणुकीच्या निकालाने महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे स्पष्ट केली आहेत. मुख्यमंत्र्यांनी विजयाची आकडेवारी मांडताना सांगितले की, महाराष्ट्रात नंबर 1 चा पक्ष भाजपाच आहे! या नगरपालिका निवडणुकांमध्ये सुमारे 75% नगराध्यक्ष महायुतीचे निवडून आले असून, अनेक ठिकाणी महाविकास आघाडीचा पूर्णपणे पराभव झाला आहे. यासोबतच भाजपाने नगरसेवक निवडून आणण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. मागील निवडणुकीत सुमारे 1500 नगरसेवक असलेल्या भाजपाचे यावेळी 3000 पेक्षा अधिक नगरसेवक निवडून आले आहेत. राज्यातील एकूण नगरसेवकांपैकी 48% नगरसेवक एकट्या भाजपाचे आहेत. गेल्या 30 वर्षांच्या महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात हा एक ऐतिहासिक टप्पा आहे!
विकास आणि विश्वासाला जनतेचा कौल
हा विजय म्हणजे महाराष्ट्रातील नगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी आपल्या सरकारवर दाखवलेला विश्वास आहे. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सुरू केलेल्या विश्वास आणि विकासाच्या राजकारणाला प्रत्येक निवडणुकीत मिळणारा हा जनतेचा कौलअधिक बळ देणारा आहे. नागपूर जिल्ह्यातील सर्व 27 नगरपालिकांमध्ये दर्जेदार आणि सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी आपण स्वीकारली आहे. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संदेशानुसार नागरी जीवन अधिक सक्षम करत शहरांमध्ये गुणात्मक परिवर्तन घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
‘हा तर आगामी निवडणुकीचा ट्रेलर’
नगरपालिकांमधील हा विजय आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचे भविष्य ठरवणारा आहे. “या विजयाचे प्रतिबिंब आगामी निवडणुकांमध्येही दिसेल,” असा ठाम विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
नागपूरमधील या संवाद सोहळ्याप्रसंगी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार डॉ. आशिष देशमुख, आमदार समीर मेघे, आमदार चरणसिंह ठाकूर यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.