Friday, January 2, 2026

शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग ६

Share

२००९ लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आमच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीची केंद्रातली सत्ता तर दूर राहिली पण… महाराष्ट्रात मात्र मी मोठा भाऊ असल्याचे सिद्ध झाले… २२ जागा लढवून आम्ही ११ जिंकल्या तर २५ जागा लढलेल्या भाजपच्या ९ जागा आम्ही निवडून आणल्या… (भक्ताडं आता मात्र स्ट्राइक रेट काढायला तयार नव्हती…) डॉक्टर मनमोहन सिंह पुन्हा एकदा पंतप्रधान पदाच्या गादीवर बसले…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ही लोकसभा निवडणूक लढवली होती… जिथे युतीत भाजपचे अमराठी उमेदवार होते… म्हणजे भैय्या गुजराती किंवा मद्रासी… तिथे गनिमी काव्याने जर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार असेल तर… गनिमी कावा करून आम्ही त्याला मते दिली…

आता एक आशा होती महाराष्ट्र विधानसभा… पण तिथेही घात झाला…

१६० जागा लढवून आमचे ४४ आमदार निवडून आले तर कमळाबाईने ११९ जागा लढवल्या आम्ही त्यांचे ४६ आमदार निवडून आणले… विरोधी पक्षनेतेपद दळभद्री कमळाबाईकडे गेले… एकनाथ खडसे महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते झाले…आम्हाला फक्त २ जागा कमी पडल्या… आम्ही फेकलेल्या तुकड्यावर जगणारी कमळी आज डोक्यावर पदर घेऊन आमच्या समोर तोरा मिरवत होती…

आधीच्या विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून दमदार कामगिरी करणाऱ्या रामदास भाई कदम यांना… भाजपला मोठ्या मनाने विरोधी पक्षनेते पद देता आले असते… हे देखील सांगण्याची सोय राहिली नाही कारण… आमच्याच आतल्या घातक राजकारणाने रामदास भाईंचा गुहागर मतदार संघातून पराभव केला होता… (रामदास भाईंना पाडण्यासाठी मातोश्रीवरून चोख व्यवस्था करण्यात आली होती हे काही भाजपवाले अगदी शेरलॉक होम्सच्या तोऱ्यात सांगतात.)

शिवाय नव्याने स्थापन झालेल्या मनसेचे… नव्याच्या नवलाईमुळे १३ आमदार निवडून आले… पण आमचे २६ आमदार पाडण्याचे काम मात्र त्यांनी इमानेइतबारे बजावले होते… त्यांना मिळालेली मते कोणाची होती? आमचीच ना?… घर फिरलं की घराचे वासे देखील फिरतात ते असे…

साहेबांचे नातू आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली… शिवसेना पक्षाच्या आणि साहेबांच्या आशिर्वादाने २०१० साली “युवासेना” ही तरुणांच्या समस्या, विचार, आणि हक्कांसाठी लढणारी एक प्रभावी युवा संघटना सुरू झाली… युवासेनेच्या माध्यमातून शिवसेनेमध्ये मराठी तरुणांचा भरणा होणार होता… (नेहमीप्रमाणे भक्तांच्या कल्पनाशक्तीला ऊत आला होता… काय तर म्हणे तिसऱ्या पिढीची सोय लावून दिली… ज्यांच्या पुढच्या पिढीकडे कर्तृत्व नसते त्यांची सोय लावून द्यावी लागते… उद्धव साहेब आणि आदित्य साहेब यांच्या कर्तृत्वाबद्दल प्रश्नच नव्हता… कारण बाळासाहेबांचे पुत्र आणि नातू आहेत ते… कर्तृत्ववानच असणार ना.)

यावेळी साहेबांनी “जे हिजडे असतात ते सोनिया गांधी समोर झुकतात” म्हणून काँग्रेसवाल्यांची अक्षरशः अब्रू काढली होती… त्यांचा हा डायलॉग खूप गाजला… आजही गाजतो आहे… पण त्यावेळी काँग्रेसच्या हिजड्यांवर आम्ही खूप हसलो होतो… बाळासाहेबांच्या ठाकरे शैलीवर जाम खुश झालो होतो…

२०१२ चे वर्ष… भारताच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक होती… भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार म्हणून लोकसभेचे माजी सभापती पी.ए संगमा होते… काँग्रेस प्रणित यूपीएचे उमेदवार प्रणव मुखर्जी शिवसेनेचा पाठिंबा मिळवण्यासाठी मातोश्री वर आले… व्यापक राष्ट्रहित लक्षात घेऊन साहेबांनी प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा जाहीर केला… कारण दोन्ही उमेदवार अमराठी होते… मग त्यातल्या त्यात प्रणव मुखर्जी राष्ट्रपतीपदासाठी अत्यंत सुयोग्य उमेदवार आहेत असे साहेबांना वाटले…

प्रणव मुखर्जी यांना मातोश्रीवर शरद पवार घेऊन आले होते… शरद पवार आणि साहेबांचे वैयक्तिक संबंध मैत्रीचे होते मात्र राजकीय वैमनस्य भयंकर होतं…

साहेबांनी आपल्या ठाकरे शैलीत… “शरद पवार जरी मित्र असला, तरी ती नीच प्रवृत्ती आहे “… या शब्दात शरद पवारांची राजकीय औकात दाखवून दिली होती…

तरीही आता आम्हाला अंध:कार दिसत होता… केंद्रात सत्ता नाही राज्यात सत्ता नाही… त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे मुंबई महापालिकेत आमची सत्ता होती पण… बाळासाहेब सुद्धा दिवसेंदिवस क्षीण होत चालले होते… त्यांना वृद्धत्व जाणवत होते… अजूनही दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होत होता… एखाद्या पक्षाने, दरवर्षी एका ठराविक दिवशी, एकाच जागी वर्षानुवर्षं सलग सभा घेणं हा जागतिक विक्रम असावा… त्यामुळे आम्हा शिवसैनिकांसाठी शिवाजी पार्क हे “शिवतीर्थ” झाले होते… आणि “मातोश्री” हे तीर्थक्षेत्र…

२०१२ च्या मुंबई महापालिका निवडणुकांचे देखील वर्ष… आमच्यासाठी मुंबई महापालिका म्हणजे ” इज्जत का सवाल”.

साहेब शरीर साथ देत नसल्यामुळे प्रचाराच्या स्थितीत नव्हते… उद्धव साहेबांनी प्रचाराची धुरा एकहाती समर्थपणे सांभाळली… आमचे ७५ नगरसेवक निवडून आले आणि त्या कमळीचे ३१ निवडून आणले… मोठा भाऊ म्हणून आम्ही आमचे कर्तव्य पार पाडले… आणि आमच्याच मतांमध्ये वाटमारी करून जगणारे बांडगुळ ७ वरून २८ वर पोचले होते… आमच्या २८ जागा इमानदारीत पाडून.. पण महापौर मात्र आमचाच झाला… मुंबई महापालिका ठाकरेंची… शिवसेनेची… मराठी माणसाची आहे याची ग्वाही मिळाली…

आणि आला २०१२ सालचा दसरा मेळावा… शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यामुळे स्वतः या दसरा मेळाव्याला येऊ शकले नाहीत… मात्र चित्रफितीच्या माध्यमातून त्यांनी आम्हा शिवसैनिकांना संबोधित केले…

“मी तुमच्यावर घराणेशाही लादली असेल तर विसरून जा. काँग्रेस-राष्ट्रवादीसारखी घराणेशाही आमच्याकडे नाही, उद्धव व आदित्यला मी लादलेले नाही. तुम्ही त्यांचा स्वीकार केला आहे. यापुढेही त्यांना सांभाळा, इमानाला महत्त्व द्या….” शिवसेनाप्रमुखांनी असे भावनिक आवाहन दसरा मेळाव्यानिमित्त शिवाजी पार्क येथे जमलेल्या शिवसैनिकांना केले तेव्हा उपस्थित तमाम शिवसैनिकांचे हृदय हेलावून गेले.

उद्धव साहेब आणि आदित्य साहेब यांची साथ कधीच सोडणार नाही… साहेबांना असे मनोमन वचन देऊन मी सभेतून परतलो… आणि आजही मी ते वचन पाळतो आहे…

पण शेवटी काळाने घाला घातलाच… १७ नोव्हेंबर २०१२… दिवसा सूर्य मावळला… घनघोर अंधःकार पसरला… आयुष्यभर मराठी माणसासाठी देह झिजवलेल्या साहेबांनी ८६व्या वर्षी या दुनियेला “जय महाराष्ट्र” केला… मी धाय मोकलून रडलो… अख्खी मुंबई… उभा महाराष्ट्र… अवघा देश हमसून हमसून रडला… साहेब गेले तेव्हा उत्स्फूर्तपणे जी मुंबई बंद झाली होती ती आजपर्यंत कोणी पाहिली नव्हती… माझ्या आजोबांच्या तोंडून लोकमान्य टिळक गेले तेव्हा १ ऑगस्ट १९२० चे मुंबई बंदचे वर्णन ऐकले होते… तशीच मुंबई बंद झाली… अवघा देश शोकाकुल झाला…

आणि आता शिवसेनेत सुरु झालं… उद्धव साहेबांचं नवीन युग…

बाळासाहेबांच्या वियोगाच्या दुःखातून बाहेर पडेपर्यंत… २०१४ च्या लोकसभा निवडणूका येऊन ठेपल्या… बाळासाहेबांच्या पश्चात देखील सेना भाजप युती अभंग राहिली होती…

स्व. बाळासाहेबांचा वारसा उद्धव साहेब तितक्याच समर्थपणे सांभाळू शकतील का…? अशी फुकटची चिंता भाजपचा भक्तगण करत होता…

२०१४ लोकसभा निवडणुकांचे निकाल आले… आमच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला देशात प्रचंड बहुमत लाभले… नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले…

महाराष्ट्रात आम्ही २० जागा लढवून आमचे १८ वाघ तर भाजपचे २४ पैकी २३ उमेदवार निवडून आणले… भाजपने कितीही बाता मारल्या तरी महाराष्ट्रात “ठाकरे ब्रँड”चीच जादू चालली होती… हे प्रत्येक शिवसैनिकाचे अंतर्मन सांगत होते… कमळाबाईला २८२ जागा मिळालेल्या असल्या तरी त्या शिवसेना, अकाली दल, तेलगू देसम यांच्यासारख्या मित्र पक्षाच्या आधारावरच मिळाल्या होत्या हे निर्विवाद सत्य आहे… पण ही खडूस कमळाबाई ते कधीच मान्य करत नाही… ते “मोदी ब्रँड”चं तुणतुण घेऊन बसले होते…

असो… नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात… पुन्हा एकदा शिवसेनेचे वाघ डरकाळ्या फोडू लागले…

आणि पाठोपाठ २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुका लागल्या… पण गोचीडासारख्या रक्त पिणाऱ्या कमळाबाईने घात केला… सत्तेच्या हव्यासा पायी अजून जागा हव्यात अजून जागा हव्यात म्हणून शेवटपर्यंत जागा वाटपाचा घोळ घातला… आम्हाला किमान १५१ जागा हव्या होत्या… आमचा हक्कच होता तो… २००९ च्या विधानसभेला आम्ही १६० जागा लढवल्या होत्या… होय नाही होय नाही करत कमळाबाईने अगदी शेवटच्या क्षणी युती तोडली… उद्धव साहेब म्हणाले गेलात उडत… २५ वर्षांच्या संसाराचा घटस्फोट झाला… आम्ही शिवसैनिक मनातून जाम खुश झालो…

आता दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणुका लढवायला मोकळे झाले होते… दुसऱ्या बाजूला काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी देखील तुटली होती… त्यामुळे आता प्रत्येक पक्षाचा कस लागणार होता… कुलटा कमळाबाईची संगत नकोच ही शिवसैनिकांची मनोमन इच्छा यावेळी पूर्ण झाली होती…

मोठ्या साहेबांच्या काळातही अनेक वेळा युतीत कुरबुरी झाल्या… संशय कल्लोळ झाला… रागवारागवी झाली… पण साहेबांनी कधी युती तुटू दिली नाही… असे ज्ञानामृत पाजणाऱ्या भक्ताडांना मी… टाळी एका हाताने वाजत नाही म्हणून चूप करतो…

पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी राज्यभर तुफान दौरे केले… शिवसैनिकांनी प्रत्येक मतदारसंघात प्राणाची बाजी लावली… शिवसेनेने झंझावती प्रचार केला…पंतप्रधान नरेंद्र मोदींना महाराष्ट्रात २३ सभा घ्याव्या लागल्या यातच “ठाकरे ब्रँड”चा आणि उद्धव साहेबांचा दरारा आणि रुबाब दिसून येतो…

२८२ जागा लढवून आमचे ६३ वाघ निवडून आले… राज्यात आम्हाला सुमारे १९.५०% मते मिळाली… हे जे काही होते ते एकट्या आमच्या शिवसेनेचे होते… आमच्यामुळे तुम्ही म्हणायला कोणालाच संधी नव्हती… साहेबांच्या पश्चात राज्याच्या पहिल्याच निवडणुकीत ६३ आमदार निवडून आणणे ही… उद्धव साहेब वडिलांचा वारसा समर्थपणे सांभाळणार याची ग्वाही देणारी असामान्य बाब होती… महाराष्ट्रात “ठाकरे ब्रँड”च चालणार याची ग्वाही देणारी ही संख्या होती… शिवसैनिक मनोमन सुखावला होता…

भाजपला १२२ जागा मिळाल्या होत्या त्यामुळे मुख्यमंत्री त्यांचाच होणार हे निश्चित होते… देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले… सुरुवातीला थोडी रुसवारुसवी झाली… आम्ही विरोधी बाकावर बसण्याचा निर्णय घेतला… पुन्हा एकदा कमळाबाई मातोश्री च्या भोवती गिरट्या घालू लागली… आणि शेवटी… २५ वर्षांच्या मैत्रीला जागून… उद्धव साहेबांनी युती करण्याचा निर्णय घेतला…

शिवसेना भाजपचे सरकार राज्यात स्थानापन्न झाले… उद्योग, परिवहन, पर्यावरण अशी खाती आमच्या पदरात पडली… पुन्हा एकदा युतीचा संसार सुरू झाला…

आज आपल्याकडे बाळासाहेब नाहीत आणि भाजपकडे नरेंद्र मोदी आहेत याचे भान उद्धव साहेबांनी ठेवले हा आमच्यासाठी शुभ शकुन होता…

२०१५ मध्ये जम्मू काश्मीरमध्ये भाजपने… पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी या मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या पक्षाशी युती करून सरकार बनवले… तो भाजपच्या दृष्टीने मास्टर स्ट्रोक होता आणि आमच्या दृष्टीने भाजपची “लाचारी”… शिवसेनाप्रमुखांनी मुस्लिम लीगशी केलेल्या तात्कालीक युतीबद्दल आजही अकलेचे तारे तोडणारे भाजपचे भक्त या अभद्र युतीबाबत मात्र चिडीचूप बसतात.

त्यातच ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ८ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्या… भारतात नोटबंदी आली… आम्ही सत्तेत सहभागी असताना देखील आमच्या साहेबांना नोटबंदीची कल्पना देखील देण्यात आली नाही… नोटबंदी सारख्या मोठ्या निर्णयात आमच्या साहेबांना अंधारात ठेवणारा हा मोदी देशाला आपल्या बापाची मालमत्ता समजतो काय? असाच संताप प्रत्येक शिवसैनिक व्यक्त करू लागला.

आणि मग आली २०१७ ची मुंबई महापालिका निवडणुक… आणि कमळाबाईच्या आतला राक्षस जागा झाला… मुंबई महापालिका काहीही करून हडपायची म्हणून आम्ही स्वतंत्र लढणार अशी घोषणा तिने करून टाकली.

उद्धव साहेबांनी जीवाचे रान केले… शिवसैनिकांनी रक्ताचे पाणी केले… आम्ही निकराने मुंबई महापालिका लढलो… आमचे ८४ नगरसेवक निवडून आले… केंद्राची सत्ता राज्याची सत्ता हातात असताना… पाण्यासारखा प्रचंड पैसा खर्च करून… कमळाबाई ८२ वरच अडकली… तिच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला…

दुसऱ्या बाजूला बांडगुळ सेनेचा सगळा तोरा उतरला… नगरसेवकांची संख्या २८ वरून ७ वर आली… हीच त्यांची खरी औकात होती…

शिवसेना सगळ्यात मोठा पक्ष म्हणून निवडून आला… उद्धव साहेबांनी चतुराईने गनिमी कावा करत बांडगुळांच्या ७ मधले ६ नगरसेवक फोडले… आता आमचे नगरसेवक झाले ९०… आपला महापौर कसाच होत नाही हे लक्षात आल्यावर कमळाबाईने नांगी टाकली… न मागता शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा दिला… पुन्हा एकदा मुंबईचा महापौर आमचाच झाला…

मधून मधून युतीत कुरबुरी सुरू होत्या… पण युती टिकली पाहिजे या मताचा मी होतो… उद्धव साहेब सुद्धा मोठ्या हुशारीने संसार मोडणार नाही इतपतच कमळाबाईची अब्रू काढत होते… पण आम्ही शिवसैनिक कुठले ऐकायला…

(क्रमश:)

-तुमचाच
बाळासाहेबांचा शिवसैनिक

या आधीचे भाग वाचा –

१) शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग १

२) शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग २

३) शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग ३

४) शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग ४

५) शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग ५

अन्य लेख

संबंधित लेख