Tuesday, January 13, 2026

कोणीही मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Share

मुंबई : “मुंबई कुणीही महाराष्ट्रापासून वेगळी करू शकत नाही, कोणाचा बाप आला तरी कोणीही मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही. इतकी वर्षे मुंबई महानगरपालिकेत त्यांची सत्ता असूनही त्यांनी फक्त खुर्च्याच तोडल्या, त्यांच्यामुळेच मराठी माणूस मागे पडला आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला. बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर आयोजित ‘महायुती महासभे’त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार भाषण करत मुंबईच्या विकासाचा आणि सुरक्षिततेचा महत्त्वाकांक्षी संकल्प मांडला. या सभेत त्यांनी विरोधकांच्या प्रचारावर तीव्र टीका करत मुंबईकरांसमोर महायुतीची विकासात्मक भूमिका स्पष्ट केली.

या सभेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे, भाजपा मुंबई अध्यक्ष व आमदार अमीत साटम, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व आमदार रविंद्र चव्हाण, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपा-महायुतीचे प्रमुख नेते व इतर मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबईकरांना खोटे सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या प्रचाराला महायुतीने सविनय आणि सपुरावा उत्तर दिले आहे. ही निवडणूक मराठी माणसाच्या अस्तित्वाची नसून, मराठी माणसाच्या मुळावर उठलेल्या विरोधकांच्या अस्तित्वाची आहे, असे सांगत फडणवीस यांनी विरोधकांवर टीकेची झोड उठवली. कालच्या सभेत काहींनी नक्कलही करून दाखवली, नक्कल करून काकांच्या पक्षाचे काय झाले इतकेच त्यांनी लक्षात ठेवावे. काकाकडे किमान नक्कल करण्याची आणि भाषण देण्याची तरी कला आहे, तुमच्याकडे तर तेही नाही,” असा टोला लगावला.

महायुती सरकारच्या विकासकामांचा आढावा देताना मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत नवी मुंबईमध्ये विमानतळ उभारले आणि आता तिसरे विमानतळ देखील तयार करणार आहोत. तसेच मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दीडपट विस्तार देखील करणार आहोत. विरोधकांना स्वतःच्या घराची जागा कमी पडली म्हणून त्यांनी स्वतःचे घर बदलले, मग मुंबईच्या आर्थिक विकासासाठी आम्ही नवीन विमानतळ उभारले, तर इतका विरोध का?, असा सवाल त्यानी केला.

त्रिभाषा सूत्राबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, महायुती सरकारच्या अहवालानुसार कोणत्याही दोन भाषा कोणत्याही घ्या, पण मराठी सक्तीचीच राहणार. याउलट काही लोकांनी मुख्यमंत्री असताना इयत्ता पहिलीपासूनच हिंदी भाषा सक्तीची केली, परंतु ते आता ‘गजनी’ झाले आहेत, त्यांना हे आठवणार नाही. त्यांना कदाचित हेही आठवणार नाही कि, हिंदी सक्तीच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयावर मुख्यमंत्री म्हणून त्यांनी स्वाक्षरी केली होती! मराठी आणि हिंदीच्या मुद्यावरून विरोधकांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे हे तेव्हाच स्पष्ट झाले, असल्याची टीकाही त्यांनी केली.

मुंबईतील पुनर्विकास प्रकल्पांचा उल्लेख करत म्हणाले, आमच्या महायुती सरकारने मुंबईमधील बीडीडी चाळीतील लोकांना हक्काचे घर दिले, पत्राचाळीतील लोकांना देखील हक्काचे घर दिले, मेट्रो आणि बससेवांमधून मुंबईकरांचा प्रवास सुखकर झाल्याचेही त्यांनी सांगितले. धारावीतील लोकांनाही पुनर्विकासातून हक्काचे घर देणार आहोत. खऱ्या अर्थाने मुंबईकरांचा विकास महायुती सरकार करत आहे. आता आम्ही केलेला विकास पाहून कोणाला मिर्ची झोंबली असेल, तर त्याला आमचा नाईलाज आहे.

देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, 2014 साली भारताची अर्थव्यवस्था जगात 11 व्या स्थानावर होती आणि आता ती तिसऱ्या क्रमांकावर आहे, आपली अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी उद्योगपतींनी योगदान दिले आहे. पण विरोधकांना आपल्याच भूमिपुत्रांना रोजगार द्यायचा नाही. परंतु, मुंबईतील तरुणांना रोजगार देऊन त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्याचा संकल्प महायुतीचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शेवटी, मुंबईच्या शाश्वत आणि खऱ्या विकासासाठी येत्या 15 तारखेला भाजपा महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईकरांना केले.

अन्य लेख

संबंधित लेख