Monday, January 19, 2026

“आधी सोबत असलेले तरी सांभाळा!” भाजपचा संजय राऊतांना सणसणीत टोला

Share

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निकालांनंतर महापौरपदावरून राजकीय कलगीतुरा रंगला आहे. “भाजपचा महापौर होऊ देणार नाही, पुन्हा चमत्कार घडेल,” या संजय राऊत यांच्या विधानाचा भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी खरपूस समाचार घेतला आहे. “चार वर्षांपूर्वीही अशाच पोकळ गमजा मारल्या होत्या, तेव्हा भुईखालून आमदार कधी निघून गेले ते कळलंच नाही,” अशा बोचऱ्या शब्दांत उपाध्ये यांनी राऊतांवर निशाणा साधला.

“नगरसेवक सांभाळा, मग गप्पा मारा”
केशव उपाध्ये यांनी सोशल मीडियाद्वारे संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, “आज पुन्हा ‘भाजपाचा महापौर नको’ असे रडगाणे गात, पुन्हा एकदा ‘चमत्कार’ होणार असल्याचा सूर आळवत संजय राऊत फिरत आहेत. मात्र त्यांनी आता तरी वास्तव स्वीकारावे. आधी सध्या सोबत असलेले नगरसेवक सांभाळा आणि मग इतर मोठमोठ्या गप्पा मारा.”

जुन्या आठवणींना दिला उजाळा
२०२२ मध्ये शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीचा संदर्भ देत उपाध्ये यांनी राऊतांना आरसा दाखवला. चार वर्षांपूर्वी ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदार बाहेर पडले होते, त्याचा उल्लेख करत उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे गटाला सावध राहण्याचा इशारा दिला आहे. “भुईखालून आमदार कधी निघून गेले, ते कळलंच नाही,” असे म्हणत त्यांनी राऊतांच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

“तरी मला हवालदार म्हणा…”
संजय राऊत यांच्या विधानांची खिल्ली उडवताना उपाध्ये यांनी एका जुन्या म्हणीचा वापर केला. “…तरी मला हवालदार म्हणा अशी अवस्था तुमची का झाली, हे आधी तपासा,” असा टोला त्यांनी लगावला. मुंबईत भाजप ८९ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला असताना, राऊत करत असलेले सत्तेचे दावे केवळ ‘पोकळ गमजा’ असल्याचे भाजपने म्हटले आहे.

अन्य लेख

संबंधित लेख