Saturday, February 7, 2026

मुंबई महापौर निवडणूक २०२६ : भाजपकडून रितू तावडे महापौर तर शिवसेनेचे संजय घाडी उपमहापौर पदाचे उमेदवार

Share

मुंबई : आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महापालिकेवर (BMC) तब्बल २९ वर्षांनंतर भारतीय जनता पक्षाचा महापौर विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी आज (७ फेब्रुवारी २०२६) अधिकृतपणे रितू तावडे यांच्या नावाची महापौरपदासाठी घोषणा केली. महायुतीमधील जागावाटपानुसार उपमहापौरपद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला देण्यात आले असून, संजय शंकर घाडी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

रितू तावडे: भाजपच्या महापौर उमेदवार
मुंबईचे महापौरपद यंदा ‘सर्वसाधारण महिला’ गटासाठी राखीव आहे. रितू तावडे या भाजपच्या ज्येष्ठ आणि अभ्यासू नगरसेविका आहेत. तावडे यांनी २०१२ (प्रभाग १२७) आणि २०१७ (प्रभाग १२१) मध्ये विजय मिळवला होता. २०२५ च्या निवडणुकीत त्यांनी प्रभाग १३२ मधून पुन्हा एकदा बाजी मारली. त्यांनी यापूर्वी महापालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्षपद भूषविले आहे. त्या घाटकोपरमधील गुजराती बहुल मतदारांमधील आक्रमक ‘मराठी चेहरा’ म्हणून ओळखल्या जातात.

“मी मुंबईची महापौर म्हणून नव्हे, तर ‘सेवक’ म्हणून काम करणार आहे. सभागृहाची गरिमा ठेवून पक्षभेद विसरून मुंबईच्या हितासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची माझी इच्छा आहे,” अशा भावना रितू तावडे यांनी व्यक्त केल्या.

संजय घाडी: शिंदे गटाचे उपमहापौरपदाचे उमेदवार
शिवसेना शिंदे गटाने संजय घाडी यांच्या रूपाने एका अनुभवी चेहऱ्याला संधी दिली आहे. शिंदे गटाने सव्वा-सव्व वर्षांचा कार्यकाळ विभागून देण्याचा निर्णय घेतला असून, पहिल्या टप्प्यात संजय घाडी उपमहापौर असतील. घाडी हे १९८८ पासून शिवसेनेत सक्रिय आहेत. त्यांनी भारतीय विद्यार्थी सेनेचे विभाग प्रमुख, सिनेट सदस्य आणि मनसेचे राज्य सरचिटणीस म्हणूनही काम केले आहे. २०१७ मध्ये ते प्रथम नगरसेवक म्हणून निवडून आले होते.

ठाकरे गटाची रणनीती काय?
भाजपने रितू तावडे यांच्या रूपाने ‘मराठी’ उमेदवार दिल्याने ठाकरे गटापुढील पेच वाढला आहे. भाजपचा उमेदवार अमराठी असेल असा अंदाज लावला जात होता, मात्र मराठी चेहरा देऊन भाजपने ठाकरे गटाची कोंडी केली आहे. आता ठाकरे गट आपला उमेदवार रिंगणात उतरवणार की निवडणूक बिनविरोध होणार, याचा निर्णय आज होणाऱ्या बैठकीत घेतला जाईल.

मुंबई महापालिका २०२६ निकाल (पक्षीय बलाबल)
महायुतीकडे सत्तेसाठी आवश्यक असलेले बहुमत (११८ जागा) असून मॅजिक फिगर (११४) त्यांनी ओलांडली आहे.

भारतीय जनता पक्ष: ८९

शिवसेना (ठाकरे गट): ६५

शिवसेना (शिंदे गट): २९

काँग्रेस: २४

इतर (MNS, AIMIM, SP, NCP): २०

महत्त्वाची तारीख: महापौर पदाची निवडणूक ११ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता बीएमसी मुख्यालयात पार पडणार आहे.

अन्य लेख

संबंधित लेख