Monday, August 24, 2026

पुस्तकांच्या पेटीतला शब्दोत्सव!

Share

महाराष्ट्रातल्या सात जिल्ह्यांमधील शाळांमध्ये मुलामुलींना उत्तम साहित्य वाचायला मिळावे, यासाठी चाललेल्या उपक्रमाची ही ओळख…

अनुराग पुस्तकालयाच्या वतीने गेली ११ वर्षे आम्ही ‘पुस्तक मुलांच्या हाती’ या योजनेत ‘पुस्तकपेटी’ उपक्रम राबवत आहोत. सन २०१४ साली माझ्या ‘शब्दोत्सव’ या दिवाळी अंकाच्या दशकपूर्ती निमित्त ‘वेगळ्या वाटेचे प्रवासी’ या सदरासाठी मी विनायक रानडे यांची मुलाखत घेण्यासाठी नाशिकला गेलो होतो. ते अनेक वर्षांपासून पुस्तकपेटीचे काम करतात. आणि या मुलाखतीतून मला खरंतर पुस्तकपेटीची कल्पना सुचली. 

एक कार्यकर्ता म्हणून ‘ज्ञानप्रबोधिनी’चे काम करत असताना मला जाणवलेली एक गोष्ट अशी की, अनेक शाळांमध्ये ग्रंथालय व प्रयोगशाळांची प्रचंड कमतरता आहे व याविषयी प्रचंड उदासीनता आहे. एकूणच आपणा सर्वांचेच वाचन कमी झाले आहे. त्यामुळे आपल्या भागातील, ग्रामीण भागातील शाळांसाठी आपण ही पुस्तकपेटी योजना सुरू करावी असे माझ्या मनात आले. मी माझ्या  मित्रांशी बोललो, 

आणि तीन जानेवारी २०१५ रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीला पहिल्या पुस्तक पेटीचे वितरण कुंबेफळ इथल्या जयप्रभा माध्यमिक विद्यालय या ग्रामीण भागातील शाळेत केले.

पहिल्या पेटीला पुण्याचे उद्योजक रवींद्र जैन यांनी आम्हाला प्रायोजकत्व दिले.  हळूहळू पुस्तकपेटी ही योजना काय आहे हे आणखी काही लोकांना सांगत गेलो. आणि लोकसहभागातून या उपक्रमाचा विस्तार होत गेला.

आत्तापर्यंत, एकूण सात जिल्ह्यांमध्ये २१० पुस्तकपेट्यांचे वाटप झाले आहे.

पुस्तकपेटीमध्ये कोणती पुस्तके असतात? 

पुस्तकपेटीमध्ये पहिली ते चौथी, पहिली ते सातवी किंवा पाचवी ते दहावी शाळेतील या विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार पुस्तके असतात. या पुस्तकांमध्ये उत्तम कथा, कविता, चरित्रे, आत्मचरित्रे, व्यक्तिमत्व विकासाची पुस्तके, विज्ञानाची पुस्तके, करून पहा, विज्ञानातील का, कसे, कोण, किती, ओरिगामी, गणितातील गमती, शोधांच्या कथा, नव्या पद्धतीची रंगीत पुस्तके, भारतरत्न, एक पानी, सहा पानी पुस्तके, कोडी… ही आणि अशी अनेक पुस्तके आपण या पेटीमध्ये ठेवतो.

प्राथमिक शाळेच्या पेटीत शंभर पुस्तके असतात. माध्यमिक शाळा असेल तर पेटीत ८० पुस्तके असतात.

ही पुस्तकपेटी आम्ही कोणाला देतो? 

यात एकच साधा निकष आम्ही लावला की, वाचनाची आवड असलेल्या, कृतिशील शिक्षकांना आम्ही पुस्तकपेटी देतो. यात जिल्हा परिषदेच्या शाळा, संस्थांच्या शाळा आहेत. शाळेला कुठलेही पैसे भरावे लागत नाहीत आणि विद्यार्थ्यांना कोणतीही फी नसते. ही पेटी कायमस्वरूपी न देता पाच ते सात महिने पुस्तकपेटी शाळेमध्ये राहते. नंतर ती परत केली जाते. आणि त्या शाळेला आम्ही दुसरी पेटी देतो. अर्थात, दुसऱ्या पेटीत संपूर्णपणे वेगळी पुस्तके असतात. असं हे एका अर्थाने फिरते ग्रंथालय असते.

हळूहळू आमचा हा पुस्तक पेटीचा उपक्रम विस्तारत गेला. अनेक जणांनी उत्स्फूर्तपणे यासाठी आर्थिक सहयोग दिला. बघता बघता पुस्तकपेट्यांचे वितरण हे अंबाजोगाई आणि परिसरातल्या शाळांमध्ये सुरू झाले. एकदा पुस्तकपेटी दिल्यानंतर पुढे काय? असा प्रश्न अनेकांना पडतो.

पुस्तकपेटी देण्याच्या निमित्ताने विद्यार्थ्यांशी गप्पांचा कार्यक्रम होतो. त्यातून एक मुलगा आणि एक मुलगी पुस्तकपेटीचे प्रमुख म्हणून निवडले जातात. पुस्तकपेटी दिल्यानंतर पुढच्या काही महिन्यांमध्ये काय काय करायचं, अशी कल्पना आम्ही शिक्षकांना व मुलांना देतो.

१) वाचलेल्या पुस्तकांबद्दलचा अभिप्राय वहीत लिहून ठेवणे. 
२) वाचलेल्या पुस्तकांवर विद्यार्थ्यांनी परिपाठामध्ये बोलणे.
३) लेखकाला पत्र, प्रायोजकाला पत्र.
४) आवडलेल्या किंवा न आवडलेल्या पुस्तकाची कारणांसह नोंद.
५) याशिवाय कोणते वेगळे पुस्तक वाचायला आवडेल त्याची नोंद.
६) पेटीतील पुस्तकांचे छोटे पुस्तक प्रदर्शन भरवणे.
७) विद्यार्थी पुस्तक वाचतानाचे फोटो, मनोगत व्यक्त करतानाचे असे व्हिडिओ व्हाट्सअप ग्रुप वर टाकणे.
८) लेखक, कवींशी संवाद.
९) वक्तृत्व, वादविवाद, निबंध स्पर्धांमधील मुलांचा सहभाग वाढवणे. 
१०) हस्तलिखित तयार करणे.

या दरम्यान आम्ही त्या शाळेला पुन्हा भेट देतो व विद्यार्थ्यांशी चर्चा करतो. या पद्धतीने पुस्तकपेटीचे काम चालते. याशिवाय, या सगळ्या पुस्तकपेट्या दिलेल्या शाळांच्या शिक्षकांचा एक व्हाट्सअप ग्रुप आहे. यात विद्यार्थी पुस्तक वाचत असतानाचे फोटो असतात, वेगवेगळ्या पुस्तकांचा परिचय देणारे विद्यार्थ्यांचे व्हिडिओ असतात. पुस्तकाविषयी होणाऱ्या सर्व कार्यक्रमांची माहिती त्यात येते. त्यामुळे, ज्या शाळेत कार्यक्रम झाला त्या शाळेची माहिती मिळते व इतरांनाही असं काही करण्याची प्रेरणा मिळते.

या माध्यमातून परिसरातल्या कृतिशील शिक्षकांचा एक गटही तयार झाला आहे. अनेक पुस्तकप्रेमी व्यक्तींनी अशा पेट्यांचे प्रायोजकत्व स्वीकारले आहे. अनेक संस्थांनी यामध्ये आम्हाला मदत केली आहे. ज्यात मानवलोक, मनस्विनी प्रकल्प, ज्ञानप्रबोधिनी, जाणीवा ग्रुप, मैत्री ग्रुप यांचा समावेश आहे. 

आता पुस्तकपेटी आंबेजोगाई तालुक्याच्या बाहेर, बीड जिल्ह्यात तसेच परभणी, हिंगोली, लातूर, छत्रपती संभाजीनगर, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांत पोहचली आहे. त्या त्या भागातील पुस्तकपेटीची जवाबदारी स्वीकारणाऱ्या एकेका कृतिशील शिक्षकाला आम्ही ‘ग्रंथमित्र’ म्हणतो. हे ग्रंथ मित्र त्यांच्या भागातील शाळांचा समन्वय करून पुस्तकपेट्यांचे काम पाहतात.

यापुढेही ज्या शाळांना, ज्या विद्यार्थ्यांना पुस्तकांची गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आमचा मनोदय आहे. या उपक्रमासाठी समाजातून अनेक मदतीचे हात पुढे येतील हा विश्वास मनाशी बाळगून आम्ही हे काम करत आहोत. या उपक्रमात आपणही आपले योगदान देऊ शकता! आपण कृतिशील शिक्षक असाल तर आपल्या भागातील अशा शाळांमधून पुस्तकपेटी उपक्रम चालवू शकता. किंवा एक किंवा अनेक पेट्यांचे प्रायोजकत्व स्वीकारू शकता.

अभिजीत अरविंदराव जोंधळे, अंबाजोगाई
संपर्क : 9423471070, 9146722900

अन्य लेख

संबंधित लेख