Wednesday, August 19, 2026

राष्ट्र: अर्थात देशाचा प्राण

Share

प्रस्तावना

राष्ट्राय स्वाहा| इदं न मम|| म्हणजेच, राष्ट्रासाठी हे अर्पण असो! हे माझे नाही, राष्ट्राचेच आहे! — हे वाक्य कानावर पडताच मनात एक समर्पणाची भावना जागृत होते. हा केवळ एक श्लोक किंवा केवळ एक घोषणा नाही, तर भारतीय परंपरेतील यज्ञसंस्कृती आणि राष्ट्रभक्तीचा एक अत्यंत सुंदर संगम आहे! आपण अनेकदा ‘भारत देश’ आणि ‘भारत राष्ट्र’ हे शब्द अगदी सहजासहजी समानार्थी म्हणून वापरतो. मात्र, संस्कृत साहित्य, वेद आणि भारतीय चिंतनपरंपरेत या दोन्ही संकल्पनांमध्ये सूक्ष्म पण महत्त्वाचा फरक दडलेला आहे. ‘शब्दांच्या दुनियेत’ या मालिकेतील आजच्या लेखात आपण ‘राष्ट्र’ या शब्दामागील अर्थ जाणून घेणार आहोत…

राष्ट्रभृत् यज्ञ

वैदिक साहित्यात, विशेषतः तैत्तिरीय संहितेत (३.४.७) आणि बौधायन श्रौतसूत्रात (१४.१६) ‘राष्ट्रभृत् यज्ञाचा’ उल्लेख आला आहे. या यज्ञाच्या जन्मामागे देवासुर संग्रामाची एक रंजक कथा आहे.
प्राचीन काळात जेव्हा देव आणि असुरांमध्ये ब्रह्मांडाच्या आणि पृथ्वीच्या आधिपत्यासाठी तुंबळ युद्ध सुरू झाले, तेव्हा असुरांचे बळ वाढू लागले. असुरांनी देवांचे राज्य, त्यांची अधिकारसूत्रे आणि राष्ट्राचे सामर्थ्य हिसकावून घेण्यास सुरुवात केली. देवांचे साम्राज्य ढासळू लागले आणि त्यांच्यावर ‘राष्ट्रहीन’ होण्याचे संकट आले. या बिकट परिस्थितीत सर्व देव एकत्र आले आणि त्यांनी प्रजापतीकडे धाव घेतली आणि प्रार्थना केली. देवांची ही व्याकुळता पाहून प्रजापतीने त्यांना अलौकिक मंत्र दिले. तेच हे- ‘राष्ट्रभृत्’ मंत्र. 

‘राष्ट्रं विभर्ति (धारयति) इति राष्ट्रभृत्।’ म्हणजे ‘जे राष्ट्राचे भरण-पोषण करते, त्याला सन्मार्गाने धारण करते आणि स्थैर्य देते, ते ‘राष्ट्रभृत्’ होय.’

या राष्ट्रभृत मंत्रांमधून केवढे मोठे तत्त्वज्ञान सांगितले आहे- “राष्ट्राची उभारणी ही केवळ शस्त्रांनी होत नाही. राष्ट्राला धारण करण्यासाठी ‘सुशासन’ (नियम/कायदा) आणि ‘प्रजाशक्ती’ (समृद्धी) या दोघांचाही सुवर्णमध्य साधावा लागतो. राष्ट्रातील वेगवेगळ्या शक्तींना एकत्र बांधून ठेवणारे हे ‘राष्ट्रभृत्’ मंत्र आहेत.”

यावरून एक गोष्ट स्पष्ट होते- ‘राष्ट्र’ म्हणजे केवळ जमिनीचा तुकडा नव्हे, तर त्याला धारण करणारी जिवंत व्यवस्था, संस्कृती आणि लोकशक्ती होय.

मग भारत नक्की काय आहे: देश की राष्ट्र?

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत राजकीयदृष्ट्या एक आधुनिक ‘लोकशाही देश’ म्हणून जगात उभा राहिला, परंतु, भारतीय परंपरेत त्याची ‘सांस्कृतिक राष्ट्र’ ही कल्पना प्राचीन आहे.

  • सांस्कृतिक धागा: भारताच्या पश्चिमेकडील द्वारकेपासून पूर्वेकडील जगन्नाथ पुरीपर्यंत आणि उत्तरेकडील केदारनाथपासून दक्षिणेकडील रामेश्वरमपर्यंत भाषा, वेशभूषा आणि अन्न बदलत गेले, तरी लोकांची जीवनमूल्ये आणि आंतरिक चेतना एकच आहेत.
  • मातृभूमीची संकल्पना: भारतीय परंपरेत या भूभागाला केवळ ‘जमिनीचा तुकडा’ मानले गेले नाही किंवा fatherland म्हटले नाही. तर त्याला ‘माता’ (भारतमाता) मानले गेले.
  • सांस्कृतिक प्रवाह: आषाढी वारी असो, कुंभमेळा असो किंवा नद्यांना पवित्र मानण्याची परंपरा असो; संपूर्ण भारतात एकाच प्रकारची सांस्कृतिक स्पंदने जाणवतात. राजकीय सीमा बदलल्या किंवा साम्राज्ये उध्वस्त झाली, तरी भारतातील हा सांस्कृतिक प्रवाह कधीही खंडित झाला नाही. धर्म, संस्कृती, देश, भाषा व इतिहास यातून जी आत्मीयता हृदयात उचंबळून येते, तीच राष्ट्राचे अधिष्ठान असते. म्हणूनच भारत हा केवळ नकाशावरचा देश नसून एक जिवंत ‘सांस्कृतिक राष्ट्र’ आहे.

राजकीय सीमा बदलल्या, साम्राज्ये उध्वस्त झाली, पण भारतातील हा सांस्कृतिक प्रवाह कधीही खंडित झाला नाही. धर्म, संस्कृती, भाषा व इतिहास यांच्या पलीकडे जाऊन जी आत्मीयता हृदयात उचंबळून येते, तीच राष्ट्राचे खरे अधिष्ठान असते. म्हणूनच भारत हा केवळ नकाशावर आखलेला देश नसून एक जिवंत ‘सांस्कृतिक राष्ट्र’ आहे!

देश आणि राष्ट्र संकल्पना

आता या दोन शब्दांचा संस्कृतदृष्ट्या अर्थ पहिला तर अर्थ अधिक स्पष्ट होतो:

देश: संस्कृतमधील ‘देश’ या शब्दाचा अर्थ ‘ज्याचा ठराविक दिशांनी किंवा सीमांनी निर्देश केला जातो तो देश.’ त्यामुळे, ‘देश’ ही प्रामुख्याने भौगोलिक संकल्पना आहे. जमीन, ठराविक भूभाग, भौतिक मर्यादा किंवा सीमांकित प्रदेशाचा बोध करून देण्यासाठी संस्कृतमध्ये ‘देश’ शब्द वापरला जातो. ऋग्वेदात यासाठी विविध शब्द आले आहेत- क्षेत्र, भूमि, पृथिवी, वगैरे. उत्तर वैदिक साहित्याच्या काळात देश शब्दाचा अर्था विशिष्ट स्थान, जागा,ठिकाण किंवा भाग एवढ्या मर्यादित अर्थानेच येत होता.

राष्ट्र: ‘राष्ट्र’ या शब्दाचा मूळ अर्थ ‘जे स्वतेजाने, सुशासनाने आणि संस्कृतीने शोभून दिसते’. त्यामुळेच, पूर्वपरंपरा, मातृभूमी व संस्कृती यांच्या अभिमानाने एकरूप व एकजूट झालेला समाज म्हणजे राष्ट्र!

ऋग्वेदात हा शब्द राज्याचा भूप्रदेश या अर्थाने वापरलेला आढळतो. वरूणाला राष्ट्राचा राजा म्हटले आहे. तर, शुक्ल यजुर्वेदात राष्ट्रामध्ये गुणी जनांची गरज असते असे मांडले आहे. अथर्ववेदात राष्ट्राभिवर्धन सूक्तामध्ये राष्ट्रनिर्मितीमागील त्याग, तप आणि कल्याणाची भावना आवश्यक असते हे मांडतो. तर, आणखी एका सूक्तात पृथ्वीला माता असे संबोधून राष्ट्राला सामर्थ्य व तेज देण्याविषयी तिची प्रार्थना केली आहे. पुढे सुमारे इसवीसनाच्या चौथ्या शतकात कामंदकांच्या नीतिसरामध्ये तसेच, अग्निपुराणात राष्ट्र संकल्पनेचा स्पष्ट उल्लेख दिसतो-

राज्यांगानां च सर्वेषां राष्ट्राद् भवति सम्भवः ।
तस्मात् सर्वप्रयत्नेन राजा राष्ट्रं समुन्नयेत् ॥

म्हणजे, राष्ट्रातूनच राज्याची सर्व अंगें उद्भवतात. म्हणून राजाने सर्वंकष प्रयत्न करून राष्ट्राची उन्नती करावी; असे म्हणले.

शेवटी

‘देश’ ही प्रामुख्याने एक भौगोलिक आणि राजकीय चौकट आहे. नकाशावरील ठरलेल्या सीमारेषा, कायदे, सरकार, प्रशासन आणि जमीन म्हणजे ‘देश’. एखादा देश सरकार बदलून किंवा आंतरराष्ट्रीय कराराने रातोरात अस्तित्वात येऊ शकतो.

मात्र, ‘राष्ट्र’ ही एक अतिशय खोल, सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि भावनात्मक संकल्पना आहे! जेव्हा एखादा समाज सामायिक इतिहास, संस्कृती, जीवनमूल्ये आणि परंपरेने एकमेकांशी हृदयापासून जोडला जातो, तेव्हा ‘राष्ट्र’ बनते. राष्ट्र हे कागदावरच्या कराराने बनत नाही, तर ते शेकडो-हजारो वर्षांच्या सहजीवनातून आणि भावबंधातून हळूहळू आकारास येते.

त्यामुळे, देश राष्ट्राला आकार देतो; पण राष्ट्र देशाला अर्थ देते. त्यामुळे, भारताचे जर ‘देश’ हे मानवी ‘शरीर’ असेल, तर ‘राष्ट्र’ हा त्या शरीराचा ‘आत्मा’ आहे!

अन्य लेख

संबंधित लेख