८ ऑक्टोबर १९३२ रोजी ब्रिटीश राजवटीत ‘रॉयल इंडियन एअर फोर्स’ म्हणून स्थापन झालेल्या भारतीय हवाई दलाने (IAF) गेल्या नऊ दशकांत देशाच्या सीमांच ज्या ताकदीने संरक्षण केल आहे, त्यामुळे जागतिक स्तरावर भारताच्या भू-राजकीय (Geopolitical) आणि सामरिक ताकदीचा एक अभेद्य दरारा निर्माण झाला आहे. भारतीय हवाई दलाच ब्रीद वाक्य आहे, ‘नभः स्पृशं दीप्तम्’ (आकाशाला स्पर्श करणारे देदीप्यमान सामर्थ्य) हे भगवद्गीतेतील अकराव्या अध्यायातून घेतलेल आहे. त्याशब्दांचा प्रतिध्वनी हवाई दलाच्या मोहिमांमुळे त्रिखंडात निनादतोय. त्याला जोड आहे आधुनिक तंत्रज्ञान आणि स्वदेशीचा जागर !
आज अमेरिका, रशिया आणि चीन यांच्यानंतर भारतीय हवाई दल हे जगातील चौथे सर्वात मोठे आणि शक्तिशाली हवाई दल मानले जाते. ‘वर्ल्ड डायरेक्टरी ऑफ मॉडर्न मिलिटरी एअरक्राफ्ट’ (WDMMA) च्या अहवालानुसार, मोहिमांची सज्जता (Operational Readiness) आणि युद्धकौशल्याच्या बाबतीत भारतीय हवाई दल अग्रगण्य स्थानावर आहे.
हवाई दलाची सद्यस्थिती
आधुनिक युद्धतंत्रात हवेतील वर्चस्व (Air Superiority) हेच कोणत्याही भूभागावरील विजयाची पहिली अट असते. भारतीय हवाई दलाची ताकद त्याच्या वैविध्यपूर्ण आणि अत्याधुनिक ताफ्यामध्ये सामावलेली आहे.सध्या भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात १,७०० ते १,८०० हून अधिक विमाने कार्यरत आहेत.यात सुखोई Su-30MKI, राफेल (Rafale), मिराज २००० आणि स्वदेशी तेजस (Tejas) यांचा समावेश आहे. दोन आघाड्यांवरील (चीन आणि पाकिस्तान) संभाव्य युद्धाचे आव्हान पेलण्यासाठी हवाई दलाची स्वीकृत क्षमता ४२ स्क्वॉड्रन्सची (प्रत्येक स्क्वॉड्रनमध्ये १८ ते २१ विमाने) आहे. जुनी मिग-२१ विमाने टप्प्याटप्प्याने निवृत्त झाल्यामुळे सध्या ही ताकद ३० ते ३१ स्क्वॉड्रन्सवर आली आहे. ११ ते १२ स्क्वॉड्रन्सचा तुटवडा भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने परदेशी आयातीवर अवलंबून न राहता स्वदेशी बनावटीच्या तेजस मार्क-१ए (Tejas Mk-1A) आणि एमआरएफए (MRFA – 114 लढाऊ विमाने) प्रकल्पांना सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.
ताफ्यात सुमारे ६००+ लढाऊ विमाने आहेत, जी ३० ते ३१ स्क्वॉड्रन्समध्ये विभागलेली आहेत. यात सुखोई Su-30MKI, राफेल (Rafale), मिराज २००० आणि स्वदेशी तेजस (Tejas) यांचा समावेश आहे. C-17 ग्लोबमास्टर, C-130J सुपर हर्क्युलिस, An-32 आणि नव्याने समाविष्ट होत असलेली C-295 विमाने भारताची वाहतूक व सुरक्षा क्षमता मजबूत करतात. ५०० हून अधिक हेलिकॉप्टर्स (एमआय-१७, अपाचे, चिनूक, प्रचंड, रुद्र आणि ध्रुव) विविध दुर्गम भागात तैनात आहेत.
स्वदेशीकरण आणि ‘आत्मनिर्भर भारत’: संरक्षणात नवी क्रांती
गेल्या काही दशकांत भारताने परदेशी शस्त्रास्त्रांची आयात करणारा देश ही ओळख पुसून टाकली असून, देशांतर्गत डिझाईन, विकास आणि उत्पादनावर भर दिला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO), एरोनॉस्टिकल डेव्हलपमेंट एजन्सी (ADA) आणि हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे भारताने स्वतःची प्रगत लढाऊ विमाने विकसित करण्यात यश मिळवले आहे.
एलसीए तेजस (LCA Tejas) – तेजस हे भारताने स्वतः विकसित केलेले अत्यंत हलके, सुपरसॉनिक आणि बहुउद्देशीय लढाऊ विमान आहे. याचा वेग मॅक १.८ (सुमारे २,२०० किमी/तास) असून याचा पल्ला ३,००० किमी आहे. केंद्र सरकारने हवाई दलासाठी ८३ तेजस मार्क-१ए विमाने (₹४८,००० कोटी) आणि अतिरिक्त ९७ विमानांच्या खरेदीला मंजुरी दिली आहे. यात ६५% हून अधिक घटक स्वदेशी आहेत. तसेच यामध्ये AESA रडार आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर (EW) यंत्रणा बसवण्यात आली आहे.
एलसीएच प्रचंड (LCH Prachand) – दुर्गम भागातील रक्षक: हे जगातील एकमेव अटॅक हेलिकॉप्टर आहे जे ५,००० मीटर (१६,४०० फूट) पेक्षा जास्त उंचीवर (उदा. सियाचीन आणि पूर्व लडाख) सहजरीत्या उतरू शकते आणि तिथून क्षेपणास्त्रे डागू शकते. भूदल आणि हवाई दलासाठी १५६ प्रचंड हेलिकॉप्टर्सच्या खरेदीची प्रक्रिया वेगाने सुरू आहे.
आगामी क्रांतिकारी प्रकल्प:
- तेजस मार्क-२ (Tejas Mk-2): अधिक शक्तिशाली GE-F414 इंजिन असलेले ४.५ जनरेशनचे मध्यम वजनाचे विमान.
- AMCA (Advanced Medium Combat Aircraft): हा भारताचा ५ व्या पिढीचा (5th Generation) स्टेल्थ लढाऊ विमान प्रकल्प आहे, जो २०३० च्या दशकाच्या सुरुवातीला हवाई दलात समाविष्ट होणे अपेक्षित आहे.
सर्जिकल स्ट्राइक व बालाकोट
२०१९ चा बालाकोटचा सर्जिकल स्ट्राइकने भारताच्या लष्करी धोरणातील एक नवीन पर्व सुरू केले. २०१४ नंतर भारताने सीमापार दहशतवादाविरोधात आपल्या संरक्षणात्मक भूमिकेतून बाहेर पडून ‘सक्रिय आणि प्रतिबंधात्मक कारवाई’ (Proactive & Pre-emptive Retaliation) चे आक्रमक धोरण स्वीकारले. पाकिस्तानने अनेक दशके भारताविरोधात चालवलेल्या छुपे युद्ध (Proxy War) आणि ‘न्यूक्लियर ब्लॅकमेल’च्या सिद्धांताला भारताने हवाई सामर्थ्याच्या जोरावर सुरुंग लावला. सुमारे २५० हून अधिक दहशतवादी, त्यांचे म्होरके आणि प्रशिक्षक ठार झाले. यामुळे भारताने सिद्ध केले की दहशतवाद्यांचे तळ कुठेही असले तरी भारतीय हवाई दल तिथे पोहोचून अचूक प्रहार करू शकते.
बालाकोट एअरस्ट्राइकची लष्करी व तांत्रिक सहभाग
२६ फेब्रुवारी २०१९ रोजी पहाटे ३:३० वाजता भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बालाकोट येथे असलेल्या जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळावर यशस्वी हल्ला केला.
- विमान : १२ मिराज २००० (Mirage 2000) स्ट्राइक विमाने, हवेत संरक्षण देण्यासाठी ४ सुखोई Su-30MKI, नेत्रा (Netra) व फाल्कन AWACS (रडार प्रणाली) आणि IL-78 Mid-air Refueler यांचा समावेश होता.
- इस्रायली बनावटीच्या SPICE 2000 लेझर/जीपीएस गायडेड बॉम्बचा वापर करण्यात आला.
२७ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानने केलेल्या प्रतिहल्ल्याला (ऑपरेशन स्विफ्ट रिटॉर्ट) उत्तर देताना, विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी जुन्या मिग-२१ बाइसन (MiG-21 Bison) या विमानाचा वापर करून पाकिस्तानचे अत्याधुनिक F-16 हे ५ व्या पिढीच्या श्रेणीतील लढाऊ विमान पाडले. ही घटना भारतीय वैमानिकांच्या अतुलनीय कौशल्याची साक्ष देते.
भारतीय हवाई दल आज आपल्या स्थापनेच्या ९३ व्या वर्षात पदार्पण करत असताना, ते जगातील कोणत्याही सामर्थ्याशी दोन हात करण्यास पूर्णपणे सक्षम आहे. आयातदार देशाकडून ‘आत्मनिर्भर’ उत्पादक देशाकडे झालेली ही वाटचाल भारताच्या संरक्षण क्षेत्राला नवा आत्मविश्वास देणारी आहे.
तेजस, प्रचंड यांसारखी स्वदेशी विमाने, बालाकोटसारखी निर्भीक सामरिक पावले आणि मातृभूमीसाठी प्राण पणाला लावणारे शूर वैमानिक यांच्या बळावर भारतीय हवाई दल देशाच्या आकाशाला अभेद्य ठेवत आहे.