Thursday, November 19, 2026

अकलेचे दिवाळे निघाल्याचा पुरावा!

Share

काँग्रेसच्या इतिहासात अध्यक्षपदी राहण्याचा विक्रम केलेल्या आणि दिवंगत राजीव गांधी यांच्या इटालियन वंशाच्या पत्नी असणाऱ्या सोनिया गांधी यांच्या बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह  या आत्मकथनाच्या प्रकाशन सोहळ्यात राहुल गांधी यांनी आपल्या आई-वडिलांच्या नात्याविषयी एक आठवण सांगितली. जेवताना दरवेळी वडील राजीव गांधी यांच्या मांडीवर आई सोनिया बसलेली असे, असे ते म्हणाले. लहानपणी त्यांना हे प्रत्येक घरात घडत असावे असेही वाटे; मात्र, मित्रांच्या घरी तसे दिसले नाही, तेव्हा त्यांनी मित्राला त्याबद्दल विचारले, अशीही आठवण त्यांनी सांगितली.

विवेकाला सोडचिठ्ठी

राहुल गांधी यांनी हा किस्सा सांगितला तेव्हा सभागृहात अनेक तालेवार नेते हजर होते. गेले अनेक महिने चर्चा होत असल्याने या प्रकाशन सोहळ्याकडे साऱ्या देशाचे लक्ष होते. सोनिया गांधी यांच्या पुस्तकाचे वितरण आधीच सुरू झाले होते. त्यातील काही भागांवर आक्षेपही नोंदविले जात होते. अशावेळी आपल्या केवळ आईच्या नव्हे तर देशातील एका महत्त्वाच्या राजकीय व्यक्तीच्या आत्मचरित्राचे प्रकाशन आहे; याचे भान राखत राहुल गांधी यांनी एका उंचीवरून बोलून आणि काळाचा मोठा पैस आखून आपल्या राजकीय परिपक्वतेचे  दर्शन घडवायला हवे होते. हा कार्यक्रम म्हणजे त्यांच्या राजकीय वाटचालीचे नव्याने पुनर्प्रक्षेपण करणारा सोहळाही ठरू शकला असता. प्रत्यक्षात राहुल गांधी यांनी ही संधी वाया घालवली. ते द्रष्टेपणाने तर काही बोलले नाहीतच पण व्यक्तिगत आणि खासगी जीवनातील अनावश्यक तपशील सांगून सगळ्यांचीच परिस्थिती कानकोंडी करून टाकली. जगातल्या कोणत्या मुलाने आपल्या आईच्या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यात अशा खासगी आठवणींचा व्यासपीठावर उच्चार केलेला असेल?

दोन प्रौढ व्यक्तींमधील प्रेम किंवा जिव्हाळा हा चर्चेचा विषय नसतो. प्रत्येक कुटुंबाचे आपले खासगी जग असते. खासगी आठवण सार्वजनिक व्यासपीठावर सांगताना तिचा संदर्भ, शब्दांची निवड आणि त्या व्यासपीठाचा उद्देश लक्षात घ्यावा लागतो. आईच्या पुस्तकाच्या प्रकाशनाचा सोहळा हा मुलांच्या बालपणीच्या आठवणी सांगण्यासाठीचा मंच नसतो. तिथे कोणती आठवण सांगावी आणि कोणती मनात ठेवावी, हा विवेकच हरपला तर काय होते, हे राहुल गांधी यांनी दाखवून दिले आहे. हा प्रश्न प्रेमाचा किंवा आदर्श नात्याचा नसून सार्वजनिक जीवनातील संयमाचा आणि संकेतांचा आहे, हे अजूनही अनेकांना समजलेले नाही. राहुल गांधी यांचे समर्थन करताना हे असे लोक वाहावत चालले आहेत.

या भाषणाचा राजकीय परिणाम मात्र दुर्लक्ष करण्यासारखा नाही. सोनिया गांधी यांच्या आत्मकथनात अनेक दशकांचा राजकीय आणि कौटुंबिक अनुभव आहे. त्यांच्या आयुष्यातील संघर्ष, सार्वजनिक जबाबदारी, वैयक्तिक दुःख आणि भारतात स्वीकारले जाण्याची भावना—या विषयांवर चर्चा होऊ शकली असती. त्याऐवजी चर्चेचा सर्वांत मोठा भाग एका वाक्यावर अडकला. ते वाक्यही अटळ नव्हते. त्याच्या उच्चाराने गांधी घराण्याच्या इतिहासावर काही प्रकाश पडला नाही. नवी लोकहिताची माहिती मिळाली नाही. नवा दृष्टिकोन लाभला नाही. पुस्तकातील मजकुरावर नव्याने प्रकाश पडला नाही. पुस्तकातील आशय मागे पडला आणि राहुल गांधी यांच्या वक्तव्याचीच चर्चा होत राहिली. राहुल गांधी यांना हेच अपेक्षित होते की काय? प्रसंग कोणताही असो, सार्वजनिक व्यक्तीने स्वतःच्या भाषणामुळे मूळ विषय झाकोळला जाणार नाही, याची काळजी घ्यायला हवी.

भारतीय प्राचीन साहित्याने बोलण्याच्या विवेकाला मोठे महत्त्व दिले आहे. भगवद्गीतेच्या सतराव्या अध्यायात वाणीचे तप सांगताना शब्दांनी अनावश्यक उद्वेग निर्माण करू नये. ते सत्य, हितकारक आणि योग्य असावेत, असा विचार मांडला आहे. याचा अर्थ असा नाही की सार्वजनिक व्यक्तींनी फक्त गोड बोलावे किंवा टीका टाळावी. अर्थ एवढाच—काय बोलतो आहोत, कोणासमोर बोलतो आहोत आणि त्या शब्दांचा परिणाम काय होईल, याचा विचार करायला हवा. प्राचीन तिरुक्कुरळ या तमीळ  ग्रंथातही कटू शब्द सहज टाळता येत असतील, तर ते वापरणे म्हणजे गोड फळाऐवजी आंबट फळ निवडण्यासारखे आहे, असे म्हटले आहे. सत्य असले तरी ते कुठे व कसे बोलावे किंवा काही प्रसंगी मनातच ठेवावे, याचा सारासार विवेक असावा लागतो. तो राहुल यांच्या बोलण्यातून गायब होता.

प्राचीन भारतीय राज्यशास्त्र आणि नीतीशास्त्रात राज्यकर्त्याचे वर्तन, त्याची वाणी आणि सार्वजनिक जीवनातील त्याची मर्यादा यांवर सखोल चिंतन आहे. या संदर्भांचा आधार घेत अनेक पारंपरिक विचारवंत आणि समीक्षक नेत्याच्या वर्तनाचे मूल्यमापन करतात.

  • कौटिल्याचे ‘अर्थशास्त्र’ आणि ‘इंद्रियजय’ : आचार्य चाणक्य (कौटिल्य) यांनी ‘अर्थशास्त्र’ या ग्रंथात राजाच्या किंवा राज्यकर्त्याच्या यशस्वितेसाठी ‘इंद्रियजय’ (इंद्रियांवर आणि भावनांवर नियंत्रण) हा महत्त्वाचा गुण मानला आहे. त्यांच्या मते, राज्यकर्त्याने आपल्या वैयक्तिक भावना, राग, लोभ किंवा खासगी गोष्टी सार्वजनिक हिताच्या आणि मर्यादेच्या पलीकडे नेऊ नयेत. राज्यकर्त्याची वाणी ही मोजकी, गंभीर, विवेकी आणि समाजाला योग्य दिशा देणारी असावी, अशी अपेक्षा तिथे व्यक्त केली आहे.
  • महाभारतातील शांतिपर्व आणि राजधर्म : ‘महाभारता’तील शांतिपर्वात भीष्म पितामह युधिष्ठिराला राजधर्माचे उपदेश करताना सार्वजनिक आचरणाचे महत्त्व सांगतात. तसेच भगवद्गीतेतील ‘ यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः ’ (समाजातील श्रेष्ठ किंवा नेतृत्व करणारी व्यक्ती जसे आचरण करते, तसेच सामान्य जनता अनुकरण करते) हा सिद्धांत नेत्यांनाही लागू होतो. या विचारांनुसार, सार्वजनिक व्यासपीठावर नेत्याने खासगी आणि कौटुंबिक गोष्टींचे अतिप्रदर्शन टाळावे. म्हणजे, पदाची प्रतिष्ठा आणि विषयाचे गांभीर्य कायम राहते.

लोकशाहीत नेत्यांना बोलण्याचे स्वातंत्र्य आहे. त्याच लोकशाहीत नागरिकांना त्या बोलण्याचे परीक्षण करण्याचा अधिकारही आहे. राहुल गांधींनी सांगितलेला किस्सा हा भारतीय कुटुंबजीवनाचा पुरावा नाही. पण तो प्रसंग सार्वजनिक व्यासपीठावर काय सांगावे आणि काय टाळावे, याबद्दलचा गंभीर प्रश्न नक्कीच उभा करतो. नेता देशाला पुढे नेतो तो केवळ मोठ्या घोषणांनी नाही—तर योग्य वेळी योग्य शब्द निवडण्याच्या संयमानेही. हा प्रौढ विवेक वयाची पन्नाशी उलटलेल्या राहुल गांधी यांच्या वक्तव्यात औषधालाही नव्हता. आपल्या मुलाच्या क्षमतांचा अंदाज सोनिया गांधी यांना असेलच. मात्र, त्या मर्यादांचे अतिशय वेदनादायी दर्शन त्यांना या निमित्ताने झाले. आता तरी त्यांनी आपल्या मुलाला पक्षाच्या आणि पर्यायाने देशाच्या डोक्यावर लादणे, बंद करायला हवे. त्यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनातून घ्यावयचा तोच सगळ्यात महत्त्वाचा धडा आहे.

अन्य लेख

संबंधित लेख