Saturday, October 10, 2026

श्रीपाद अमृत डांगे सच्चा भारतीय कॉम्रेड

Share

१० ऑक्टोबर १८९९ रोजी नाशिकजवळील करंजगाव येथे कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचा जन्म एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात झाला…

कॉम्रेड डांगे साम्यवादी असले तरी त्यांनी आपला साम्यवाद हा रशियन साम्यवादाचे अंधानुकरण न करता भारतीय विचारधारेला अनुकूल असाच बनवण्याचा प्रयत्न केला…

२६ डिसेंबर १९२५ रोजी कानपूरला भारतातील श्रीपाद अमृत डांगे, एस.व्ही. घाटे, मुजफ्फर अहमद अशा स्थानिक कम्युनिस्ट नेत्यांनी एकत्र येऊन कानपूर येथे अधिकृत परिषद घेतली आणि भारतात पक्षाची स्थापना केली…

वास्तविक त्यापूर्वी १७ ऑक्टोबर १९२० रोजी मानवेंद्रनाथ रॉय, अबनीनाथ मुखर्जी आणि एव्हलिन रॉय यांनी त्यावेळच्या सोव्हिएत युनियनच्या ताश्कंद येथे पहिल्यांदा भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली होती…

परंतु भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना भारतातच झाली पाहिजे… रशियामध्ये झालेल्या स्थापन झालेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाला आम्ही “भारतीय” मानणार नाही अशी सुस्पष्ट भूमिका घेऊन कॉम्रेड डांगे यांच्या पुढाकाराने भारतात भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली…

आजही भाकप (CPI) हा पक्ष २६ डिसेंबर १९२५ रोजी कानपूर येथे झालेली परिषद आपली अधिकृत स्थापना मानतो…

तर भाकप मार्क्सवादी (CPI-M) हा पक्ष १७ ऑक्टोबर १९२० रोजी ताश्कंदमध्ये झालेल्या स्थापनेला मूळ स्थापना मानतो…

यावरून कॉम्रेड डांगे यांची कम्युनिस्ट तत्त्वज्ञानाचे भारतीयकरण करण्याची दूरदृष्टी किती अचूक होती याची आपल्याला प्रचिती येते…

१५ ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नव्या सरकारशी आणि परिस्थितीशी कसे जुळवून घ्यायचे यावरून भारतीय कम्युनिस्ट पक्षात मतभेद निर्माण झाले…

पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे सरकार आणि सोव्हिएत युनियनमधील संबंध सुधारत असताना… कॉम्रेड डांगे यांच्या नेतृत्वाखालील एका गटाने (आपण याला मवाळ गट म्हणू) प्रबळ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसशी (INC) सहकार्य करण्याची भूमिका मांडली…

मात्र त्याला अती जहाल डाव्या विचारसरणीच्या  कट्टर नेत्यांनी कडाडून विरोध केला…

आणि इथे पक्षात वैचारिक संघर्ष सुरू झाला…

१९६२ च्या भारत-चीन युद्धानंतर पक्षातील कॉम्रेड डांगे यांचा मवाळ गट आणि चीनधार्जिण्या/कट्टर अती डाव्या जहाल गटातील संघर्ष टोकाला गेला…

चीनच्या भारतावरील आक्रमणाचा कॉम्रेड डांगे आणि पक्षातील पाठीराख्यांनी कडाडून विरोध केला… आपण कम्युनिस्ट असलो तरी भारतीय आहोत… चीनच्या आक्रमणाचे आपण समर्थन अथवा स्वागत कसे करू शकतो?… तो देशद्रोह ठरणार नाही का?… असा रोकडा सवाल त्यांनी पक्षातील चीनधार्जिण्या नेत्यांना केला…

चीनचे समर्थन करणाऱ्या किंवा आक्रमक भूमिका घेणाऱ्या अनेक नेत्यांना नेहरू सरकारने  तुरुंगात टाकले होते…

त्याचवेळी जागतिक स्तरावर सोव्हिएत युनियन आणि चीन यांच्यातील वैचारिक वाद वाढत गेले… आणि त्याचा थेट परिणाम भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या धोरणांवर झाला…

पक्षातील वैचारिक संघर्ष वाढत जाऊन शेवटी १९६४ साली भारतीय कम्युनिस्ट पक्षात (CPI) मध्ये मोठी फूट पडली…

आणि चीनधार्जिणा भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) [CPI(M)] हा नवा पक्ष स्थापन झाला…

सहाजिकच कॉम्रेड डांगे भारतीयत्वाची कास धरणाऱ्या मूळ भारतीय कम्युनिस्ट पक्षातच (CPI) राहिले…

१९७० च्या दशकाच्या उत्तरार्धात… विशेषतः आणीबाणीच्या काळात आणि त्यानंतर कॉम्रेड डांगे यांनी इंदिरा गांधी आणि काँग्रेस पक्षाच्या धोरणांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती…

सीपीआय (CPI) मधील बहुसंख्य नेते आणि कार्यकर्ते डांगे यांच्या या काँग्रेसधार्जिण्या राजकीय मार्गाच्या पूर्णपणे विरोधात होते… सी. राजेश्वर राव यांच्या नेतृत्वाखालील गटाने इंदिरा गांधींच्या सरकारला विरोध करण्याची आणि मार्क्सवादी पक्षांशी (CPI-M) जवळीक साधण्याची भूमिका घेतली होती…

या वैचारिक मतभेदांमुळे कॉम्रेड डांगे यांना प्रथम १९७८ मध्ये पक्षाच्या अध्यक्षपदावरून आणि नंतर १९८० मध्ये पक्ष नेतृत्वावरून हटवण्यात आले…

कॉम्रेड डांगे यांची कन्या रोझा देशपांडे यांनी काँग्रेसशी सहकार्य ठेवण्याच्या उद्देशाने ‘ऑल इंडिया कम्युनिस्ट पार्टी’ (AICP) नावाचा वेगळा पक्ष स्थापन केला होता… कॉम्रेड डांगे यांनी या पक्षाच्या अधिवेशनाला हजेरी लावली आणि त्यांच्या राजकीय भूमिकेचे समर्थन केले… पक्षाच्या शिस्तीचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून अखेर १९८१ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (CPI) राष्ट्रीय परिषदेने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली…

पक्षातून बाहेर पडल्यानंतर डांगे हे ऑल इंडिया कम्युनिस्ट पार्टी (AICP) आणि नंतर युनायटेड कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियामध्ये (UCPI) सामील झाले…

भारतीय कम्युनिस्ट चळवळीतील भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI) मधून बाहेर पडलेल्या काही उजव्या विचारसरणीच्या गटांच्या विलीनीकरणातून UCPIया पक्षाची स्थापना झाली…

यात प्रामुख्याने कॉम्रेड मोहित सेन यांच्या नेतृत्वाखालील ‘इंडियन कम्युनिस्ट पार्टी’ आणि एस. ए. डांगे यांच्या नेतृत्वाखालील ‘ऑल इंडिया कम्युनिस्ट पार्टी’ एकत्र आली होती…

कॉम्रेड डांगे आणि मोहित सेन हे या पक्षाचे मुख्य संस्थापक नेते होते… पक्षाच्या स्थापनेच्या वेळी कॉम्रेड डांगे हे अध्यक्ष तर मोहित सेन हे सरचिटणीस बनले…

पारंपारिक कम्युनिस्ट पक्षांच्या उलट… UCPI ने तत्कालीन काँग्रेस (आय) सोबत संयुक्त आघाडीला आणि त्यांच्या धोरणांना पाठिंबा दिला होता…

हा पक्ष प्रामुख्याने सोव्हिएत युनियनच्या ‘पेरेस्त्रोइका’ (पुनर्रचना) धोरणांचा समर्थक आणि डाव्या विचारसरणीमध्ये सुधारणावादी मानला जात होता…

परंतु भारतीय कम्युनिस्ट चळवळीतील कॉम्रेड डांगे यांचा प्रभाव हळूहळू कमी होत गेला…

कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचा वेद तसेच भारतीय इतिहास व तत्वज्ञानाचा गाढा अभ्यास होता… परंतु त्यांचा आग्रह किंवा दृष्टिकोन धार्मिक नसून ऐतिहासिक भौतिकवादी (Historical Materialist) होता…

कॉम्रेड डांगे संस्कृत भाषेत पारंगत होते आणि त्यांना वेदांचे सखोल अध्ययन होते… ते कालिदास, तुकाराम, कबीर यांच्यापासून ते शेक्सपिअरपर्यंत सर्वांवर सविस्तर चर्चा करू शकत असत…

‘इंडिया: फ्रॉम प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी’ (India From Primitive Communism to Slavery) या१९४९ मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या गाजलेल्या ग्रंथात त्यांनी प्राचीन भारतीय इतिहासाचा आणि वैदिक साहित्याचा (विशेषतः ऋग्वेदातील यज्ञ, दासप्रथा, मातृसत्ताक पद्धतीचा अस्त इ.) मार्क्सवादी दृष्टिकोनातून अभ्यास केला होता…

त्यांचा आग्रह वेदांचे धार्मिक पावित्र्य प्रस्थापित करण्याचा किंवा त्यांचे उदात्तीकरण करण्याचा नव्हता… उलट, प्राचीन भारतीय समाजव्यवस्थेतील उत्पादन संबंध (Modes of production), श्रम आणि सामाजिक-आर्थिक स्थित्यंतरे समजून घेण्यासाठी त्यांनी वैदिक व प्राचीन वाङ्मयाचे विश्लेषण केले होते…

एकंदरीत कार्ल मार्क्सच्या कम्युनिस्ट तत्वज्ञानाचे अंधानुकरण न करता… त्याला भारतीयत्वाची जोड देणाऱ्या कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांची आज जयंती… त्यानिमित्त एका सच्च्या भारतीय कॉम्रेडला आमचा लाल सलाम🙏🙏🚩🚩🌹🌹

अन्य लेख

संबंधित लेख