प्रस्तावना
आजकाल वर्तमानपत्रांची पाने, आभासी जगताचे पडदे आणि बैठकांमध्ये दोन नव्या संज्ञांचा सुकाळ झालेला दिसतो—’मिलेनिअल्स’ आणि ‘जेन झी’. तपशिलात जाऊन पाहिले तर मन सुन्न होते. आत्ताचा तिशीतला जीव आणि त्याच्याच पाठीवर अवघ्या पाच-दहा वर्षांनी जन्माला आलेला दुसरा विशीतला जीव; आज मात्र यांच्यात संस्कृतीचे, जाणिवांचे आणि जीवनमूल्यांचे जणू अथांग अंतर निर्माण झाल्याचा आभास उभा केला जात आहे. मिलेनिअल्स ‘वर्क-लाइफ बॅलन्स’ शोधत थकलेले, तर जेन झी काम सोडून थेट ‘बर्नआऊट’ घोषित करणारे! एका पिढीला दुसऱ्या पिढीचे कपडे, त्यांचे मीम्स, कामाची पद्धत आणि त्यांची भाषा यात विसंगती दिसते आहे. समाजमाध्यमांवर रोज या दोन गटांमध्ये मिश्कील, पण कधीकधी टोकाची चढाओढ सुरू असते. माणसांची—विशेषतः अजून जगण्याचा थांग शोधू पाहणाऱ्या नव्या दमाच्या मनांची—अशी वर्गवारी करून त्यांना एकमेकांविरुद्ध उभे ठाकताना पाहून अंतःकरण अस्वस्थ झाल्याशिवाय राहत नाही.
संज्ञांचा उगम कुठून झाला?
मुळात ‘मिलेनिअल्स’ आणि ‘जेन झी’ या संज्ञांचा प्रवास केवळ कालखंडाला किंवा पिढ्यांना नावे देण्यापुरता मर्यादित नाही, तर डिजिटल युगात माणसांच्या सामाजिक ओळखी कशा घडवल्या जातात, याचा तो एक बोलका नमुना आहे. अमेरिकन लेखक नील होवे आणि विल्यम स्ट्रॉस यांनी १९८७ च्या सुमारास पिढ्यांच्या अभ्यासाची पायाभरणी केली; आणि पुढे २००० मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या ‘Millennials Rising’ या पुस्तकाने ‘मिलेनिअल्स’ ही संज्ञा जागतिक पटलावर चर्चेत आणली. (त्यापूर्वी या पिढीसाठी ‘जेन वाय’ हा शब्दही वापरला जात होता.) त्यानंतर काळाच्या ओघात पुढच्या पिढीचे बारसे ‘जेन झी’ म्हणून झाले; जरी या नावाची जनक म्हणून कोणतीही एक व्यक्ती ठामपणे सांगता येत नसली, तरी इंटरनेटने व्यासपीठ मिळवून दिल्याने हा शब्द वाऱ्यासारखा सर्वदूर पसरला. इसवी सन २००० नंतर आलेले ब्लॉग्स, ऑनलाइन चर्चा मंच आणि सोशल नेटवर्किंगच्या प्रसारामुळे या पिढ्यांमधील कथित फरकांची चर्चा दैनंदिन गप्पांचा भाग बनली. पुढे फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूबने या चर्चेला खतपाणी घातले; तर इन्स्टाग्राम आणि टिकटॉकने ‘मिलेनिअल्स vs जेन झी’ या संघर्षाचेच एका चटकदार आणि मनोरंजक आशयात रूपांतर केले. फॅशन, भाषा, संगीत, करिअर, आर्थिक स्वातंत्र्य, नातेसंबंध आणि तंत्रज्ञानाचा वापर—अशा प्रत्येक पैलूवर मीम्स, रिल्स आणि विनोदी तुलनांचा असा काही पाऊस पाडला गेला, की या संज्ञा प्रत्येकाच्या रोजच्या जगण्यात सहज मिसळून गेल्या.
मात्र या संघर्षाचा खरा लाभार्थी कोण?
एकाच महागाईच्या, एकाच सामाजिक अनिश्चिततेच्या आणि डिजिटल जगाने दिलेल्या मानसिक एकाकीपणाच्या धुक्यात चाचपडणारी ही आजचीच तरुणाई आहे. मग त्यांच्यात ही कृत्रिम भिंत कोणी आणि का चिणली? या’जनरेशन वॉर’चे मुख्यतः दोन मोठे आणि छुपे लाभार्थी आहेत:
१. सोशल मीडिया अल्गोरिदम आणि ‘अटेंशन इकॉनॉमी’: डिजिटल विश्वात ‘विवाद’ हा सगळ्यात वेगाने विकला जाणारा माल आहे. शांतता, सामंजस्य आणि ऐक्य यावर लाईक्स किंवा शेअर्सचे आकडे वाढत नाहीत; पण “मिलेनिअल्स कसे जुनाट/आळशी आहेत” किंवा “जेन झी कसे बेजबाबदार/उद्धट आहेत” अशा आशयाचे व्हिडिओ बनवले की अल्गोरिदमचा चक्रव्यूह वेगाने फिरू लागतो. कमेंट बॉक्समध्ये एकमेकांना तुच्छ लेखणाऱ्या तरुणांच्या भांडणातून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स अब्जावधींचा नफा कमावतात. तरुणांचा संताप आणि अहंकार हे या डिजिटल कंपन्यांचे इंधन बनले आहे.
२. बाजारपेठ आणि कॉर्पोरेट ब्रँडिंग: भांडवली बाजारपेठेला जिवंत माणसे नको असतात, त्यांना हवी असतात नफ्याची ‘कन्झ्युमर सेगमेंट्स’. जोपर्यंत तरुणाई एकसंध आहे, तोपर्यंत त्यांच्या गरजा समान दिसतील; पण एकदा का त्यांच्यात पिढीच्या नावाखाली मानसिक भिंत उभी केली, की कंपन्यांचे काम सोपे होते. मिलेनिअल्सना भूतकाळाची आठवण करून देत “नॉस्टॅल्जिया” विकायचा आणि जेन झीला ट्रेंड्सच्या नावाखाली “एस्थेटिक्स” आणि”FOMO” विकायचा! एकाच वर्गाला दोन वेगळे ग्राहक बनवून त्यांच्या खिशातून पैसे काढण्याचे हे आधुनिक मार्केटिंगचे अवाढव्य तंत्र आहे.
मग दोघांसमोरील आव्हाने वेगळी आहेत का?
वास्तवात पाहिले तर या दोन्ही पिढ्या एकाच नावेतले प्रवासी आहेत:
- गगनाला भिडलेली महागाई दोघांनाही तितकीच होरपळत आहे.
- करिअर आणि भविष्याची चिंता दोघांच्याही डोळ्यांत सारखीच आहे.
- कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ऑटोमेशनमुळे रोजगारावर टांगलेली अनिश्चिततेची तलवार दोघांच्याही डोक्यावर समान आहे.
- डिजिटल जगाने दिलेला मानसिक ताणतणाव आणि ऑनलाइन सोशलायझिंगच्या पडद्याआड दडलेले एकाकीपण दोघांच्याही वाट्याला आलेले आहे.
स्वामी विवेकानंद म्हणाले होते, ‘मला शंभर कृतिशील तरुण द्या, मी भारताचा कायापालट करीन.’ आज देशासमोरील आव्हाने पेलण्यासाठी तरुणाईने संघटित होण्याची नितांत गरज आहे; परंतु जर या पिढ्यांना एकमेकांच्या कपड्यांवरून, कामाच्या पद्धतीवरून, बोलण्याच्या लहेजावरून किंवा समाजमाध्यमांवरील क्षुल्लक ‘इमोजीं’वरून आपापसात भिडवून दिले, तर ते मूळ दुखण्यापासून आणि खऱ्या प्रश्नांपासून आपोआप भरकटतील. जेव्हा घरातल्या दोन भावंडांनाच एकमेकांचे वैरी बनवले जाते, तेव्हा बाहेरचा लुटारू निर्धास्तपणे घराची राखरांगोळी करून निघून जातो, हे विसरून कसे चालेल?
संघटन में शक्ति है
इतिहास साक्षी आहे, कोणत्याही देशात किंवा समाजात पायाभूत परिवर्तन घडवायचे असेल, तर तरुणांची एकसंध ताकद लागते. मिलेनिअल्सकडे गेल्या एका दशकाचा प्रत्यक्ष अनुभव, मंदी आणि संकटांशी दोन हात करण्याचे धैर्य आणि व्यवस्थेची प्रगल्भ समज आहे; तर जेन झीकडे तंत्रज्ञानाची अफाट गती, स्पष्टवक्तेपणा आणि अन्यायाविरुद्ध थेट आवाज उठवण्याचे निडर धाडस आहे.
मग कॉर्पोरेट ब्रँड्सनी आखून दिलेल्या साच्यात आणि सोशल मीडियाच्या अल्गोरिदमने फेकलेल्या तुकड्यांवर आपण आपापसात भांडत बसणार आहोत का? आपली ही नाव जर बुडाली, तर नुकसान कुठल्या एका पिढीचे नाही, तर संपूर्ण देशाच्या भविष्याचे होणार आहे.
आपल्यात ‘गट’ पाडणारे या वादावर आपले उखळ पांढरे करून घेत राहतील; पण विचार करायचा आहे तो आपणच—आभासी जगाच्या या कुटिल पटावर आपण केवळ प्यादे बनून राहणार आहोत, की एकत्र येऊन आपल्या खऱ्या भविष्याची दिशा ठरवणार आहोत?