Sunday, September 8, 2024

फसवणूक प्रकरणी मनोज जरांगे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी

Share

पुणे- मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे यांच्या विरोधात पुण्यातील न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. मंगळवारी होणाऱ्या सुनावणीसाठी जरांगे न्यायालयात हजर न राहिल्याने हे वॉरंट जारी करण्यात आले. हे प्रकरण २०१३ च्या फसवणूकीशी संबंधित आहे, ज्यामध्ये मनोज जरांगे आणि त्यांच्या दोन साथीदारांवर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील नाटके सादर करणाऱ्या नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

मनोज जरांगे आणि त्याच्या साथीदारांनी २०१३ मध्ये जालना जिल्ह्यात आयोजित केलेल्या ‘शंभूराजे’ या नाटकाच्या सहा प्रयोगांसाठी निर्माता धनंजय घोरपडे यांना ३० लाख रुपये देऊ केले होते. पैकी फक्त १६ लाख रुपये दिले असून उर्वरित रक्कम देण्यात आलेली नाही त्यामुळे कोथरूड पोलीस ठाण्यात जरांगे रांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याआधी सुद्धा कोर्टाने मनोज जरांगे यांच्या विरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते. मात्र आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले जरांगे ३१ मे २०२४ रोजी न्यायालयात हजर झाले होते. त्यानंतर न्यायालयाने त्यांचे वॉरंट रद्द केले, परंतु त्यांना ५०० रुपयांचा दंड ठोठावला होता.

मनोज जरांगे यांचे वकील हर्षद निंबाळकर यांच्या म्हणण्यानुसार जरांगे हे सध्या उपोषणाला बसलेले असल्याने मंगळवारी सुनावणीला उपस्थित राहू शकले नाहीत.

मराठा समाजाला इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गात आरक्षण देण्याची मागणी करणाऱ्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे नेतृत्व मनोज जरांगे करीत आहेत.

अन्य लेख

संबंधित लेख