Monday, January 19, 2026

मातीचा ब्रँड-ब्रँडची माती

Share

उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्यावर उभ्या केलेल्या कपोलकल्पित “ठाकरे ब्रँड” च्या जोरावर “मुंबई आमचीच” “महापौर आमचाच” म्हणून गमजा मारणाऱ्या ठाकरे बंधूंच्या त्या तथाकथित “ठाकरे ब्रँड”ची. मुंबई महानगरपालिका २०२६ निवडणुकीत मुंबईकरांनी अक्षरशः माती करून टाकली. उद्धव ठाकरे यांना १६० पेक्षा जास्त जागा लढवून त्यापैकी ६५ तर राज ठाकरे यांना ५२ पैकी अवघ्या ६ जागा जिंकता आल्या. २२७ पैकी ७१ जागा ह्या उद्धव आणि राज ठाकरे यांच्या या बनावट “ठाकरे ब्रँड”ची आजची खरी औकात आहे.

संबंध महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला १५३ जागी तर, राज ठाकरे यांच्या मनसेला केवळ १३ ठिकाणी नगरसेवक निवडून आणता आले आहेत. ही उद्धव आणि राज ठाकरे यांच्या मराठी मिडियाने फुलवलेल्या त्या पोकळ “ठाकरे ब्रँड”ची आजची खरी कवडीमोल किंमत आहे.

ब्रँड (Brand) काय असतो ?

ब्रँड म्हणजे काय हे एका शब्दात सांगायचे असेल तर “विश्वास” आणि एका वाक्यात सांगायचे असेल तर, “बस, नाम ही काफी है!”

कोणताही ब्रँड हा त्याच्या उत्पादनाच्या आणि व्यवसायातील मूल्यांवर (Ethics) आधारित असतो. ग्राहकाला त्या ब्रँड विषयी प्रचंड विश्वासार्हता वाटत असते आणि हेच त्या ब्रँडच्या यशाचे गमक असते. कोणत्याही परिस्थितीत हा ब्रँड आपल्या गुणवत्तेशी तडजोड करत नाही हेच त्याचे वैशिष्ट्य असते. नफा तोटा दुय्यम मानून प्रसंगी तोटा सोसून देखील आपला दर्जा आणि आपली सचोटी टिकवून ठेवणे म्हणजे ब्रँड.

स्वतंत्र भारतातील ब्रँडचा आदर्श म्हणून बोट दाखवायचे असेल तर टाटा या ब्रँडकडे बोट दाखवता येईल. ताजमहाल हॉटेलपासून ते गृहप्रकल्पांपासून अगदी चहा आणि मीठापर्यंतच्या अनेक व्यवसायांत “टाटा” ब्रँड हे विश्वासार्हतेचे प्रतीक बनले आहे. टाटांच्या बाबतीत “बस, नाम ही काफी है…!” हीच सर्वसामान्य भारतीय ग्राहकांची धारण आहे. टाटांच्या उत्पादनात आपली कोणतीही फसवणूक होणार नाही याची खात्री ग्राहकांना आहे.

२००८ साली भारतीय मध्यमवर्गाला परवडणारी अतिशय स्वस्त अशी टाटा नॅनो कार केवळ १ लाख रुपयात देण्याचे आश्वासन रतन टाटा यांनी देशाला दिले. त्यासाठी पश्चिम बंगालच्या सिंगूरमध्ये त्यांनी करोडो रुपयांची गुंतवणूक केली. परंतु त्यावेळी विरोधी पक्षात असलेल्या ममता बॅनर्जी यांनी या प्रकल्पाविरुद्ध थैमान घातले आणि नाईलाजाने रतन टाटा यांना तो प्रकल्प गुजरातच्या साणंदमध्ये हलवावा लागला. यात टाटा समूहाच्या करोडो रुपयांचा चुरा झाला. वेळ आणि श्रम देखील वाया गेले परंतु, सगळ्या प्रकारचे अपरिमित आर्थिक नुकसान सोसून कोणतीही सबब न सांगता रतन टाटा यांनी भारताच्या जनतेला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे २००९ साली टाटा नॅनो कार १ लाख रुपयातच बाजारात उतरवली. याला म्हणतात ब्रॅंड…!

१८६८ साली जमशेदजी टाटा यांनी व्यापार आणि वस्त्रोद्योगाने सुरु केलेला टाटा ब्रँड पुढे २० व्या आणि २१ व्या शतकांत जे आर डी आणि रतन टाटा यांनी आपल्या टाटा ब्रँडला विस्तारित करून शिखरावर नेले. परंतु त्याच वेळी त्यांनी आपल्या ब्रँडची व्यावसायिक नितिमत्ता आणि मूल्ये कसोशीने जपली आज टाटा ब्रँड हा भारताचा सर्वांत विश्वासार्ह ब्रँड ठरला आहे. “Leadership with Trust” हे आपले घोषवाक्य त्यांनी अगदी सार्थ ठरवले आहे.

उद्धव आणि राज ठाकरे यांचा पोकळ “ठाकरे ब्रँड”

मुळात उद्धव आणि राज ठाकरे यांनी गवगवा केलेला “ठाकरे ब्रँड” हा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या ब्रँडची पुण्याई कुरतडून खाण्याचा केविलवाणा प्रयत्न होता.

१९६६ साली मुंबईतल्या मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी स्थापन झालेल्या शिवसेनेला राजकीय हिंदुत्व स्वीकारायला १९८०चे दशक उजडावे लागले. १९८७ च्या विलेपार्ले पोटनिवडणुकीत हिंदुत्वाचा प्रचार केल्याबद्दल बाळासाहेब ठाकरे यांच्या मतदानाचा आणि निवडणूक लढवण्याचा अधिकार १९९९ साली ६ वर्षांसाठी न्यायालयाने काढून घेतला. त्यामुळे बाळासाहेबांच्या राजकीय हिंदुत्वावर शिक्कामोर्तब झाले. त्यांची “हिंदुहृदयसम्राट” ही उपाधी महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून देशभरात सर्वमान्य झाली. “मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी” पासून सुरू झालेली शिवसेनेची नौका बाळासाहेबांनी “गर्वसे कहो हम हिंदू है” या ज्वलंत हिंदुत्वाच्या किनाऱ्यापर्यंत कुशलतेने आणली.

याच काळात “हिंदुत्वा”च्या आधारावर बाळासाहेब ठाकरे यांनी भाजप सोबत राजकीय युती केली आणि पुढे मृत्यूपर्यंत सत्ता असो अथवा नसो प्रसंगी आपला अहंभाव बाजूला ठेवल्यामुळे, तसेच युतीच्या बिकट प्रसंगी त्यांनी दाखलेले राजकीय चातुर्य आणि लवचिकता यामुळे कितीही कुरबुरी झाल्या तरी शिवसेनेची भाजपशी असलेली युती तुटली नाही.

याच सर्वसमावेशक “हिंदुत्वा” मुळे शिवसेना ही महाराष्ट्रात विशेषत: मुंबईत एक उल्लेखनीय राजकीय ताकद बनली. बाळासाहेबांच्या “मुंबई बंद”च्या एका हाकेसरशी मुंबईत कडकडीत बंद पाळला जाऊ लागला. पक्षोपक्षीचे राष्ट्रीय स्तरावरील दिग्गज नेते मातोश्रीवर खेटे घालू लागले.

ऑक्टोबर १९९१ मध्ये भारत आणि पाकिस्तान दरम्यान होणारा नियोजित क्रिकेट सामना रोखण्यासाठी मुलुंडचे कट्टर शिवसैनिक शिशिर शिंदे यांनी वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी कुदळ फावड्याने उखडून टाकली होती. त्यामुळे सर्वसामान्य भारतीय जनमानस सुखावले होते.

१९९२ साली अयोध्येला बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्यात आली तेव्हा “बाबरी मशीद माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे” म्हणून राजकीय हिंदुत्वात बाजी मारली.

त्याचवेळी १९९२/९३ च्या मुंबईतील बॉम्बस्फोट आणि हिंदू मुस्लिम दंगलीत बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदू समाजाची उघडपणे बाजू घेतली. मुंबईतल्या मुस्लिमबहुल वस्त्यांतील हिंदूंना शिवसेना हा एक आधार वाटत असे आणि त्यामुळे शिवसेनेचे हिंदुत्व उजळून निघाले. त्यामुळे आपल्याला मुस्लिम मते मिळतील अशी बाळासाहेबांनी कधी अपेक्षाही ठेवली नाही आणि त्यासाठी मुसलमानांचे लांगूलचालन देखील केले नाही. मात्र सकल हिंदू समाज शिवसेनेला हिंदुत्वामुळे भरभरून मतदान करत होता.

त्याचवेळी काँग्रेसच्या ढोंगी सर्वधर्मसमभाव यावर आणि मुसलमानांच्या लांगुलचालनावर बाळासाहेब ठाकरे आपल्या सामना मुखपत्रातून धारदार लेखणीने आसूड ओढत असत. मुसलमानांच्या सामाजिक आणि राजकीय आक्रमकतेला बाळासाहेब ठाकरे जाहीर सभांमधून कडक भाषेत खुले आव्हान देत. त्यामुळे हिंदू मानस सुखावत असे. याला त्यांनी “ज्वलंत हिंदुत्वा”चे नाव दिले. केवळ मराठी माणसाऐवजी हिंदू समाजाचा कैवार घेणारा हाच तो ज्वलंत हिंदुत्वाची ओळख असलेला राजकारणातला मूळचा बाळासाहेबांचा “ठाकरे ब्रँड”.

ठाकरे बंधूंचा नकली “ठाकरे ब्रँड”

खरं म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना वारसा हक्काने आपल्या वडिलांचा बाळासाहेब ठाकरे यांच्या स्थावर जंगम संपत्ती सोबत शिवसेना पक्ष देखील मिळाला. तसाच ज्वलंत हिंदुत्वाची ओळख असलेला “ठाकरे ब्रँड” देखील आयता मिळाला होता. त्यात कोणतीही भर न घालता तो बाळासाहेब ठाकरे यांनी तो नुसता जपला जरी असता तरी त्यांचे राजकीय भवितव्य उज्वल होते पण प्रत्यक्षात त्यांनी काय केले ?

मुख्यमंत्री पदाच्या लालसेपायी महाराष्ट्राच्या जनतेने युतीला दिलेला स्पष्ट कौल पायदळी तुडवून ३ दशकांची हिंदुत्वाच्या आधारावर उभी असलेली भाजपशी युती क्षणार्धात मोडून मुसलमानांचे अपरिमित लांगुलचालन करणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पायाशी त्यांनी लोळण घेतली. आपले क्षणभंगुर मुख्यमंत्री पद टिकावे म्हणून कारसेवकांच्या रक्ताने माखलेल्या हातांच्या समाजवादी पक्षाच्या नेत्यांना मातोश्रीवर बोलावून त्यांचे हात हातात घेतले. काँग्रेसच्या असलम शेख यांना त्यांनी मुंबईचे पालकमंत्री म्हणून नेमले. उर्दू भाषा भवनासाठी भायखळा येथे भूखंड दिला. आपल्या ताब्यातील मुंबई महापालिकेच्या तिजोरीतून या उर्दू भाषा भवनासाठी १३ कोटी रुपयांची तरतूद केली. महालक्ष्मीच्या हाजी अली दर्ग्याला राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डनच्या धर्तीवर बगीचा बनवण्यासाठी ५० कोटी रुपयांची आर्थिक देणगी दिली. मुंबईच्या आझाद मैदानावर मोर्चा काढून अराजक माजवणाऱ्या हुतात्मा स्मारकाची लाथा मारून विटंबना करणाऱ्या आणि आमच्या महिला पोलिसांच्या अब्रूला हात घालणाऱ्या रझा अकादमीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन त्यांना मिठ्या मारल्या.

देशद्रोहाच्या आरोपावरून फाशी गेलेल्या याकूब मेमनची कबर सजवली जात असताना सोयीस्कर मौन बाळगले. जाहीर सभांमध्ये “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बंधू भगिनी आणि मातांनो”चा उल्लेख टाळून हिंदूंच्या ऐवजी कधी मराठी तर कधी मतदार असा उल्लेख करायला सुरुवात केली. “जय श्रीराम” घोषणेची हरामखोरपणा म्हणून खिल्ली उडवली. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जनाब बाळासाहेब ठाकरे म्हणत उर्दू कॅलेंडर छापले. अजान स्पर्धा भरवल्या. “बोट ठेवीन तिथे मालमत्ता” असला कायदेशीर लँड जिहाद करणाऱ्या वक्फ बोर्डाला चाप लावण्यासाठी मोदी सरकारने आणलेल्या वक्फ सुधारणा कायद्याला विरोध केला. वं. बाळासाहेब ठाकरे यांच्या मूळच्या “ठाकरे ब्रँड”चे कमरेला गुंडाळलेले “ज्वलंत हिंदुत्व” सोडून बेशरमपणे ते डोक्याला बांधले. मुसलमानांच्या एकगठ्ठा मतपेटीसाठी आसुसलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी खऱ्यापेक्षा बाडगा जास्त कडवा असतो या न्यायाने मुस्लिम समाजाचे काँग्रेस राष्ट्रवादीपेक्षा अधिक असे कल्पनातीत परंतु किळसवाणे लांगूलचालन सुरु केले आणि वैचारिक बाटगेपणा करून आपल्या वडिलांनी बाळासाहेबांनी कष्टाने उभा केलेला “ज्वलंत हिंदुत्वा”चा “ठाकरे ब्रँड” त्यांच्या कर्मदरिद्री पुत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे याने मिठी नदीच्या गटारात आपल्या हाताने बुडवला.

गेल्या २५ वर्षांत मुंबई महापालिकेत सत्ता असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी टेंडरच्या “टक्केवारी”तून मिळवलेली अफाट माया मातोश्री २ ही निवडणुकीच्या अर्जात जाहीर केलेली कोट्यावधींच्या संपत्तीद्वारे मतदारांच्या समोर येत होती. यातून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा “टक्केवारी किंग” म्हणून उभी राहिली.

दुसऱ्या बाजूला गेल्या २० वर्षात राज ठाकरे यांनी आपल्या राजकीय भूमिका इतक्या वेळा बदलल्या की त्यांचे कार्यकर्ते मनोरुग्ण होण्याची वेळ आली आहे.

कधी मशिदीवरील भोंग्यांच्या विषयावरून हिंदुत्वाच्या बाजूने तर कधी महाकुंभमेळ्यातील पवित्र स्नानाची ती देखील काखा खाजवून नक्कल करत त्रिवेणी संगमावरच्या पवित्र गंगाजलाची जाहीरपणे थट्टा. दहीहंडीला मटण हंडीचे निमंत्रण स्वीकारतो म्हणून हिंदू भावनांची खिल्ली. मुंबईतील अमराठी भाषिक अन्य प्रांतीय हिंदूं विरुद्ध गरळ ओकताना त्यांच्यावर हात उचलताना बांगलादेशी घुसखोर मुसलमान आणि रोहिंग्यांविषयी अवाक्षरही न उच्चारणे. आम्ही हिंदू आहोत हिंदी नाही म्हणून हिंदी भाषिक हिंदूंचा द्वेष करणे. तामिळनाडूचे भाजपचे नेते अन्नामलाई यांची रसमलाई म्हणून टिंगल करणे व त्यांना जाहीरपणे भ*वा अशी शिवी हासडून समस्त दक्षिण भारतीय बांधवांचा अपमान करणे.

“मराठी मुसलमान कधीच दंगल करत नाहीत…” असे प्रमाणपत्र राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी देऊन टाकले. आपले वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर, उत्तर भारतातून येणाऱ्या रेल्वे गाड्या ते मुंबईला येऊच देणार नाहीत. एका दिवसात ते मुंबईत येणारे अन्य प्रांतीयांचे लोंढे थांबवतील. अशी फुशारकी देखील त्यांनी मारली म्हणजे म्हणजे अमराठी भाषिक अन्य प्रांतीय हिंदू बांधवांवर दादागिरी दाखवणाऱ्या मनसेची “मुसलमानांसमोर टर्रकन फाटते” हीच मुंबईकर सकल हिंदू मतदारांची धारणा झाली.

शिवाय टोलविरोधी सारखे एखादे आंदोलन सुरु करायचे आणि अचानक बंद करायचे. यामुळे राज ठाकरे यांच्या मनसेची प्रतिमा समाजात “मांडवली सम्राट” अशीच उभी राहिली.

सकल हिंदू समाज उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा तेजोभंग करणारे हे सगळे चाळे निमुटपणे बघत होता. सकल हिंदू समाजाला हिंदुत्वाची कावीळ झालेल्या ठाकरे बंधूंची ही राजकीय लबाडी कळत नव्हती असे नाही पण तो असहाय्य होता. तो वाट बघत होता योग्य संधीची अर्थात भारताच्या लोकशाही नेत्याला दिलेल्या अमूल्य देणगीची मतदानाची! आणि महाराष्ट्राच्या हिंदू मतदाराने २०२४ च्या विधानसभेला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला २०१९ च्या ५६ वरून २० वर तर राज ठाकरे यांच्या मनसेला १ वरून ० वर आणून ठेवले.

विधानसभेला मिळालेल्या या दणक्यामुळे गेली २० वर्षे एकमेकांना शिव्यांची लाखोली वाहणारे उद्धव आणि राज ठाकरे हे दोघे बंधू वडिलोपार्जित संपत्ती असल्याचा तोरा मिरवत मुंबई महापालिकेच्या वार्षिक ७४ हजार कोटी उलाढाल असणाऱ्या तिजोरीवर डल्ला मारण्यासाठी एक झाले. या एका महापालिकेसाठी त्यांनी उर्वरीत महाराष्ट्रातील २८ महानगरपालिकांमधील आपल्या उमेदवारांना अक्षरशः वाऱ्यावर सोडले.

दोघांना एकत्र येऊनही स्वकर्तृत्वाने ही निवडणूक जिंकणे अशक्य होते. जिंकता आली तर एखाद्या भावनिक मुद्द्यावरच. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अगोदरच दोघांच्या तोंडाला डांबर फासले गेले होते. मग दोघांसाठी सोयीचा भावनिक मुद्दा होता… मराठी माणूस. मराठी माणसाची अस्मिता आणि वारसा हक्काने आयता मिळालेला “ठाकरे ब्रँड”. मग काय… या दोन्ही कर्तृत्वशून्य बंधूंनी ज्वलंत हिंदुत्वाच्या “ठाकरे ब्रँड”ला मराठी अस्मितेचा चमचमणारा मुलामा चढवला आणि या दोन बंधूंचा “ठाकरे ब्रँड” नेमका इथेच गंडला.

बाळासाहेबांच्या ज्वलंत हिंदुत्वाच्या “ठाकरे ब्रँड” मध्ये मराठी अस्मिता

कमालीची सुरक्षित होती पण मराठी अस्मितेच्या या ढोंगी “ठाकरे ब्रँड” मध्ये हिंदुत्वाच्या सुरक्षेची कोणतीही खात्री नव्हती. किंबहुना विनाशाचीच शक्यता अधिक होती. ठाकरे बंधूंच्या नव्या मराठी अस्मितेच्या वेष्टणात गुंडाळलेल्या या नविन “ठाकरे ब्रँड”ने मुंबईकर सकल हिंदू मतदार लंडन, न्यूयॉर्कसारखा मुंबईचा महापौर मुसलमान भले मग तो “मराठी मुसलमान”. अगदी दाऊद इब्राहिम कासकर देखील होऊ शकेल या नुसत्या कल्पनेनेच हादरला. शिवाय या नव्या चटोर “ठाकरे ब्रँड”मध्ये अमराठी भाषिक अन्य प्रांतीय हिंदूंना कवडीचीही किंमत नव्हती. आलाच तर वाट्याला द्वेषच येणार होता.

हिंदुत्वाला गौण ठरवून मराठी अस्मितेला फुंकर घालणारा हा नकली “ठाकरे ब्रँड” मुंबईकरांनी मनापासून स्वीकारलाच नाही. अगदी मुंबईकर मराठी माणसाने देखील स्वीकारला नाही कारण त्याला अभिमान हिंदुत्वाचा होता. कोत्या मराठी अस्मितेपायी आपल्याच अमराठी भाषिक अन्य प्रांतीय हिंदू बांधवांचा द्वेष त्याला कसाच मान्य होण्यासारखा नव्हता आणि त्याच्यावर कडी म्हणजे मुंबईत बस्तान बसवलेल्या बांगलादेशी घुसखोर मुसलमान आणि रोहिंग्यांविषयी ठाकरे बंधूंचे सोयीस्कर मौन. हा कुठला थर्ड क्लास “ठाकरे ब्रँड” आणलाय असेच त्याचे मन म्हणत होते.

आम्ही दोघे एकत्र आल्यामुळे मुंबईचा समस्त मराठी मतदार आपल्या दावणीला बांधलेला आहे. असा गोड गैरसमज करून घेत. “मुंबई आमचीच” आणि “महापौर आमचाच” झालाच समजा. या मिजासीत हे बंधुद्वय प्रचार करत होते. त्यांच्या या “खयाली पुलावा”ला झणझणीत तडका मराठी मिडियाने दिला. दोन ठाकरे बंधू एकत्र आल्याने जणू काही पृथ्वीचा आस अजून थोडा कलला आहे. “राज तिलक की करो तैयारी, आ रहे हैं ठाकरे ब्रँडधारी” असे आभासी चित्र मराठी मिडियाने उभे केले आणि ठाकरे बंधु त्या मृगजळात हरखून गेले हरवून गेले.

पण मुंबईच्या चाणाक्ष सकल हिंदू मतदाराला पक्के ठाऊक होते स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा अस्सल गावरान भगव्या साजूक तुपाचा हिंदुत्वाचा सुंगध असलेला “ठाकरे ब्रँड” त्यांच्या मृत्यू बरोबरच त्यांच्या चितेवर जळून खाक झाला आहे. आज आपल्याला दाखवला जातो आहे तो “ठाकरे ब्रँड” म्हणजे डुकराच्या विष्ठेची दुर्गंधी येणारे हिरवेगार नकली डालडा आहे. शिवाय डुकराच्या विष्ठेची दुर्गंधी येणाऱ्या या हिरव्यागार नकली डालडाला टक्केवारी आणि मांडवलीची काळी किनार होतीच आणि इतका मुस्लिम अनुनय करून ठाकरे बंधुंच्या पदरात काय पडले? मुस्लीम समाजाने रझाकारी मानसिकतेच्या MIM ला एकगठ्ठा मतदान केले. एकटे लढून MIM चे ८ नगरसेवक निवडून आले आणि युती करून मनसेचे फक्त ६ खिक्… आणि दुसऱ्या बाजूला मुंबईकर सकल हिंदू मतदाराने ठाम निश्चय केला. यापुढे कोणत्याच निवडणुकीत No More हा हिरवागार डुप्लीकेट “ठाकरे ब्रँड”…! बाकी मुंबई महापालिकेच्या निकालांचा खणखणीत कौल तुमच्या समोर आहेच. ब्रँड मातीचाच होता मुंबईकर मतदारांनी त्या ब्रँडची माती केली!!!

– मालवणी खवट्या

अन्य लेख

संबंधित लेख