भारतातील राजकारण आता केवळ सभांपुरते, पोस्टरपुरते किंवा निवडणूक प्रचारापुरते मर्यादित राहिलेले नाही. सोशल मीडिया, मीम संस्कृती, वायरल व्हिडिओ आणि डिजिटल मोहिमा यांच्या माध्यमातून नव्या पिढीच्या मानसिकतेवर प्रभाव टाकण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. विशेषतः Gen Z या तरुण पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी “उपरोधिक” किंवा “सटायर” या नावाखाली अनेक मोहिमा राबवल्या जात आहेत. अशाच मोहिमांपैकी एक म्हणजे अभिजीत दिपके यांनी सुरू केलेली “कॉकरोच जनता पार्टी” ही संकल्पना. वरकरणी ही चळवळ विनोदी, व्यवस्थेविरोधातील तरुणांचा रोष व्यक्त करणारी आणि बेरोजगार तरुणांचा आवाज असल्याचा दावा केला जात असला, तरी तिच्यामागे व्यवस्थित आखलेले डिजिटल प्रोपागंडा टूलकिट असल्याचा संशय अनेकांना वाटत आहे.
अभिजीत दिपके हे पूर्वी आम आदमी पक्षाशी संबंधित डिजिटल मोहिमांमध्ये कार्यरत होते. सोशल मीडिया स्ट्रॅटेजी, मीम-आधारित प्रचार आणि ऑनलाइन नैरेटिव्ह तयार करण्यात त्यांचा अनुभव असल्याचे त्यांच्या जुन्या प्रोफाइल्स आणि पोस्ट्समधून स्पष्ट दिसते. त्यामुळे अचानक निर्माण झालेली “कॉकरोच जनता पार्टी” ही चळवळ नैसर्गिक जनआंदोलन नसून डिजिटल पद्धतीने तयार केलेले राजकीय ब्रँडिंग असल्याची चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे ही मोहीम सुरू झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांत लाखो फॉलोअर्स जमा होणे, विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एकाच प्रकारचे संदेश व्हायरल होणे आणि अनेक प्रभावी राजकीय व पत्रकारितेतील व्यक्तींनी त्याला तत्काळ समर्थन देणे, या सर्व गोष्टी केवळ योगायोग मानणे कठीण आहे.
आजच्या डिजिटल युगात प्रोपागंडा म्हणजे केवळ खोटी माहिती पसरवणे नाही. तरुणांच्या भावनांना हात घालणे, त्यांच्यात असंतोष निर्माण करणे, व्यवस्थेविरोधात सतत नकारात्मकता पसरवणे आणि शेवटी त्या मानसिकतेला विशिष्ट राजकीय दिशेकडे वळवणे, ही त्याची आधुनिक पद्धत बनली आहे. “कॉकरोच जनता पार्टी” नेमके हेच करत असल्याचा आरोप होत आहे. बेरोजगारी, शिक्षण, करिअर, महागाई यांसारख्या वास्तविक समस्यांचा आधार घेत तरुणांना “संपूर्ण व्यवस्था तुमच्या विरोधात आहे” असा संदेश दिला जात आहे. त्यातून सरकार, न्यायव्यवस्था आणि संस्थांबद्दल अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न दिसून येतो.
या मोहिमेतील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे डेटा संकलन. “कॉकरोच जनता पार्टी” च्या नावाखाली शेअर करण्यात आलेल्या Google Forms आणि डिजिटल नोंदणी मोहिमांमधून हजारो तरुणांची वैयक्तिक माहिती जमा केली गेली. नाव, मोबाईल नंबर, ई-मेल, शैक्षणिक माहिती, सोशल मीडिया प्रोफाइल्स यांसारखा डेटा भविष्यातील राजकीय मोहिमांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. जगभरात अनेक वेळा असे दिसून आले आहे की, सोशल मीडिया डेटा वापरून तरुणांच्या मानसिकतेवर प्रभाव टाकला जातो. त्यामुळे ही मोहीम केवळ उपरोधिक नसून भविष्यातील मोठ्या डिजिटल नेटवर्कची पायाभरणी असू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
अभिजीत दिपके यांच्यावरील जुने वादही या चर्चेला अधिक गंभीर बनवतात. आर्टिकल ३७० हटवल्यानंतर त्यांनी केलेल्या काही सोशल मीडिया पोस्ट्सवरून त्यांच्यावर देशविरोधी प्रचाराचे आरोप झाले होते. लीगल राइट्स ऑब्झर्वेटरीसारख्या संस्थांनी त्यांच्याविरोधात तक्रारी दाखल केल्या होत्या. त्या प्रकरणांमध्ये वेगळावादी प्रचार, भ्रामक माहिती आणि समाजात अस्थिरता निर्माण करण्याचे आरोप करण्यात आले होते. जरी या आरोपांवर अंतिम न्यायालयीन निर्णय आलेला नसला, तरी त्या पार्श्वभूमीमुळे त्यांच्या नव्या मोहिमेकडे संशयाने पाहिले जात आहे.
Gen Z ही भारतातील सर्वात मोठी आणि प्रभावी मतदार पिढी बनत आहे. ही पिढी पारंपरिक माध्यमांपेक्षा सोशल मीडियावर अधिक विश्वास ठेवते. त्यामुळे मीम्स, रील्स, ट्रेंडिंग हॅशटॅग आणि वायरल कंटेंट यांच्या माध्यमातून त्यांच्यावर प्रभाव टाकणे अत्यंत सोपे झाले आहे. “कॉकरोच जनता पार्टी” ही त्याच प्रकारच्या डिजिटल मानसशास्त्रीय युद्धाचे उदाहरण मानले जात आहे. वरकरणी विनोद आणि उपरोध वाटणाऱ्या गोष्टींचा वापर करून राजकीय असंतोषाचे रूपांतर संघटित डिजिटल चळवळीत करण्याचा प्रयत्न यात दिसतो.
लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. मात्र त्या नावाखाली जर तरुणांना दिशाभूल केली जात असेल, भावनिकरीत्या भडकावले जात असेल किंवा डिजिटल माध्यमांतून संस्थांविरोधात अविश्वास पसरवला जात असेल, तर त्याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. “कॉकरोच जनता पार्टी” ही केवळ एक उपरोधिक मोहीम आहे की भविष्यातील राजकीय प्रोपागंडा टूलकिटचा भाग आहे, हा प्रश्न आता अधिक तीव्रतेने उपस्थित होत आहे.
– अमिता आपटे