वारकरी संप्रदायाच्या परंपरेला आज काही स्वार्थी, वाचाळ आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमुळे मोठे गालबोट लागत आहे. विकास लवांडे हे त्याचेच एक ताजे, डोळ्यात अंजन घालणारे उदाहरण आहे. वारकरी संप्रदायाचा बुरखा पांघरून स्वतःचे वैयक्तिक, आर्थिक आणि राजकीय हितसंबंध जपणाऱ्या लवांडे यांना अखेर कायद्याच्या चौकटीत यावे लागले असून त्यांना अटक झाली आहे. ही अटक केवळ एका व्यक्तीची नाही, तर संप्रदायाच्या नावाखाली समाजात चालणाऱ्या ढोंगीपणावर आणि लबाडीवर लगावण्यात आलेली मोठी कायदेशीर चपराक आहे.
संप्रदायाच्या पवित्रतेला लागलेली कीड
विकास लवांडे स्वतःला वारकरी संप्रदायाचे पाईक आणि खंदे पुरस्कर्ते समजतात. कपाळाला बुक्का, गळ्यात तुळशीची माळ, अंगावर उपरणे अशा अवतारात कीर्तनकार आणि प्रवचनकार म्हणून त्यांनी मोठी प्रसिद्धी मिळवली. परंतु, त्यांचा खरा हेतू राजकीय होता. लोकांच्या आदराचा, विश्वासाचा वापर त्यांनी स्वतःची आर्थिक ‘दुकानदारी’ आणि राजकीय वजन वाढवण्यासाठी केला.
लवांडे यांच्या वागण्यात, बोलण्यात आणि एकूणच देहबोलीत नेहमीच उद्दामपणा आणि अहंकाराचा दर्प राहिला. संतांच्या अभंगांचा विपर्यास करून, स्वतःच्या सोयीनुसार त्याचे अर्थ लावून लोकांची दिशाभूल करणे हा त्यांचा मुख्य धंदा बनला. जेव्हा एखादी व्यक्ती धर्माचा वापर स्वार्थासाठी करते, तेव्हा ती संपूर्ण समाजाच्या पाठीत खंजीर खुपसत असते. लवांडे यांनी नेमके हेच पाप केले.
विषारी विधाने आणि समाजातील दुही
विकास लवांडे यांची विधाने कीर्तनकाराला शोभणारी नसून, समाजात द्वेष, कलह आणि दुही माजवणारी राहिली आहेत. सार्वजनिक मंचावरून आणि कीर्तनाच्या गादीवरून बोलताना त्यांनी अनेकदा नीतिमत्तेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. त्यांच्या काही प्रमुख चुका आणि विधाने खालीलप्रमाणे समाजाला घातक ठरली आहेत.
• जातिद्वेषाला खतपाणी : लवांडे यांनी संतांच्या नावाचा आणि मंचाचा गैरवापर करून विशिष्ट जाती-धर्माच्या विरोधात प्रक्षोभक आणि आक्षेपार्ह विधाने केली. संतांनी ‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म’ सांगून सर्व जाती-पातींना एकाच पंक्तीत आणून बसवले, तिथे लवांडे यांनी समाजात दुहीच्या भिंती घालण्याचे आणि विष पेरण्याचे काम केले.
• राजकीय लांगूलचालन आणि भाडोत्री नेतेगिरी: “आमुचा परमार्थ आहे चोख” असे वरवर सांगणारे लवांडे प्रत्यक्षात राजकीय नेत्यांच्या दावणीला बांधले गेले होते. आपल्या कीर्तनाचा आणि प्रवचनाचा वापर ते विशिष्ट राजकीय अजेंडा राबवण्यासाठी आणि विरोधकांवर खालच्या पातळीवर जाऊन वैयक्तिक चिखलफेक करण्यासाठी करत. ‘अमुक एका नेत्याला किंवा पक्षाला विरोध करणे म्हणजे विठ्ठलाचा विरोध करणे,’ अशी हास्यास्पद, तर्कहीन आणि भयंकर विधाने त्यांनी जाहीरपणे केली. यामुळे कीर्तनाचे पवित्र व्यासपीठ राजकीय आखाडा बनले.
• महिलांविषयी बुरसटलेली वक्तव्ये : कीर्तनाच्या गादीवरून मातृशक्तीचा आणि महिलांचा आदर करण्याऐवजी, महिलांच्या पेहरावावर, त्यांच्या स्वातंत्र्यावर आणि आधुनिकतेवर लवांडे यांनी बुरसटलेल्या विचारांची, कुत्सित शेरेबाजी केली. यामुळे वारकरी परंपरेतील संत मुक्ताबाई, संत जणाबाई आणि संत सोयराबाई यांच्या पुरोगामी विचारांचा घोर अपमान झाला.
कोर्टाचा दणका आणि अटकेची कारवाई
लवांडे यांचे विषारी उपद्व्याप केवळ वादग्रस्त विधानांपुरते किंवा वैचारिक चुकांपुरते मर्यादित राहिले नाहीत. वारकरी संप्रदायाच्या नावाखाली लोकांची आर्थिक फसवणूक करणे, बेकायदा व्यवहार करणे आणि सामाजिक सलोखा बिघडवून दंगलसदृश परिस्थिती निर्माण करणे, असे गंभीर गुन्हेगारी आरोप त्यांच्यावर सातत्याने होत होते. अखेर कायद्याचे हात त्यांच्यापर्यंत पोहोचले.
पुण्याजवळच्या वाघोली पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यामध्ये लवांडे यांना कोर्टाने यापूर्वी अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. मात्र, नुकत्याच झालेल्या सुनावणीत सरकारी वकिलांनी लवांडे यांनी पूर्वीचे गुन्हे लपविल्याचा युक्तिवाद केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरत पुणे सत्र न्यायालयाने लवांडे यांचे कायदेशीर संरक्षण काढून घेतले आणि त्यांचा अर्ज फेटाळून लावला. कोर्टाचा हा दणका मिळताच पुणे पोलिसांनी तत्परता दाखवत विकास लवांडे यांना भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १९६ (गटांमध्ये द्वेष निर्माण करणे) आणि २९९ (धार्मिक भावना दुखावणे) अंतर्गत अटक केली.
या अटकेमुळे लवांडे यांच्या तथाकथित ‘साधुत्वाचा’ आणि मुखवट्याचा बुरखा आता पूर्णपणे टरकला आहे. जेव्हा कीर्तनकार म्हणवणारा माणूस गंभीर गुन्हेगारी कृत्यांमध्ये अडकतो आणि त्याला पोलीस कोठडीची हवा खावी लागते, तेव्हा भाविकांना धक्का बसतो. लवांडे यांच्या या स्वार्थी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे संपूर्ण वारकरी संप्रदायाची नाहक बदनामी झाली.
संप्रदायाचे नुकसान
विकास लवांडेसारखे ढोंगी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जेव्हा समोर येतात, तेव्हा या तरुण पिढीचा एकूणच अध्यात्मावरचा, संतांच्या शिकवणीवरचा आणि या पवित्र परंपरेवरचा विश्वास उडण्याची भीती असते.
लवांडे यांच्या अहंकारामुळे, पैशाच्या हव्यासापायी आणि उद्धट भाषेमुळे समाजात प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या इतर निष्कलंक कीर्तनकारांबद्दल संशयाचे वातावरण निर्माण झाले. त्यांनी परमार्थाचे आणि भक्तीचे सरळ सरळ व्यापारीकरण केले. स्वतःचे साम्राज्य उभे करण्यासाठी संप्रदायाचा वापर करून व्यवस्थेलाच काळिमा फासला.
आतातरी डोळे उघडा
विकास लवांडे यांच्यावरची कायदेशीर कारवाई अत्यंत योग्य, कायदेशीरदृष्ट्या गरजेची आणि स्वागतार्ह आहे. कायदा आणि घटना सर्वांसाठी समान असते. वारकरी संप्रदाय हा शुद्ध २४ कॅरेट सोन्यासारखा आहे, त्याला अशा काही पितळी माणसांच्या कृत्यांमुळे डाग लागू शकत नाही.
मात्र, समाजाने आणि महाराष्ट्रातील जनतेनेही आता डोळस होण्याची गरज आहे. केवळ गळ्यात माळ घातली, कपाळाला टिळा लावला किंवा छान चाल लावून अभंग गायला म्हणजे कोणी संत होत नाही. त्याचे वैयक्तिक आचरण कसे आहे, तो समाजात प्रेम पसरवतो की द्वेष, हे पाहणे महत्त्वाचे आहे. लवांडे यांची अटक हा अशा सर्व वाचाळ, ढोंगी आणि धर्मविक्रेत्या प्रवृत्तींन कडक इशारा आहे. संतांच्या या महाराष्ट्र भूमीत कायमच संतांचे विचार चालणार आणि कोणत्याही लवांड्यांची चलाखी, लबाडी इथे टिकू शकत नाही, हे या प्रकरणाने आणि कायदेशीर कारवाईने पुन्हा एकदा सिद्ध केले. अशा लोकांपासून सावध राहिले, तरच संप्रदायाचे पावित्र्य टिकेल.
वाद आणि घडामोडी
• राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रवक्ते असणाऱ्या लवांडे यांनी वारकरी संप्रदायातील विशिष्ट व्यक्तींना प्रतिगामी आणि ‘घुसखोर’ असे संबोधले. या विधानांमुळे वारकरी आणि धार्मिक वर्तुळात तीव्र संताप निर्माण झाला.
• लवांडे यांच्या या वक्तव्यामुळे चिडून जाऊन, ९ मे रोजी कीर्तनकार संग्राम भंडारे आणि त्यांच्या समर्थकांनी पुण्यात लवांडेवर शाई फेकली.
• वाघोली आणि लोणी काळभोर पोलीस ठाण्यात लवांडे यांच्याविरोधात गुन्हे दाखल होते. त्यानंतर, न्यायालयाने अंतरिम जामीन फेटाळल्यामुळे २१ मे रोजी वाघोली पोलिसांनी त्यांना अटक केली.
• लवांडे यांच्या अटकेवर शरद पवार, सुप्रिया सुळे आणि इतर नेत्यांनी तीव्र आक्षेप घेतला असला तरी त्यांच्यावरील कारवाईचे समाजाच्या सर्व स्तरांतून मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे.
– सारंग दर्शने