Wednesday, May 20, 2026

KEM: आमची माती आमची माणसं आमची नावं…

Share

इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या लाहोरमधील ९ ठिकाणांची इस्लामी नावे बदलून त्यांना पुन्हा मूळ हिंदू किंवा ब्रिटिशकालीन नावे देण्यात आली आहेत. लाहोरच्या इस्लामपुराचे नाव कृष्णनगर करण्यात आले असून तेथील बाबरी चौक पुन्हा एकदा जैन मंदिर चौक बनला आहे. मौलाना जफर अली चौकाचे नामकरण पुन्हा पूर्वीप्रमाणे लक्ष्मी चौक असे करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या नव्या नामकरणाविरोधात आवाज उठवण्याची तेथील कोणत्याही कट्टरपंथी संघटनेची हिंमत झाली नाही.

१९९० च्या दशकात हिंदुस्थानात बाबरी मशीद पतनानंतर जैन मंदिर चौकाचे नाव बदलून बाबरी मशीद चौक असे करण्यात आले होते. हा राजकीय निर्णय होता (आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तेव्हा केंद्रात नवाज शरीफ यांचेच सरकार होते) परंतु तिथे पिढ्यानपिढ्या राहणाऱ्या लोकांनी कधीच मनापासून ते स्वीकारले नव्हते. कारण जैन मंदिर चौक हे नाव त्यांच्या मुस्लिम पूर्वजांनीच दिले होते. लाहोरच्या नाव बदलण्याच्या या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात पाकिस्तानच्या सिंध आणि खैबर पख्तूनख्वा प्रांतांमध्येही मूळ नावांची घोषणा केली जाऊ शकते.

इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ आणि पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाझ यांनी १९ मार्च रोजी एक उच्चस्तरीय बैठक बोलावली. त्यात लाहोर हेरिटेज एरिया रिवाइव्हल (LHAR) प्रकल्पावर चर्चा झाली. लाहोरच्या नवीन नावांना पुन्हा जुन्या हिंदू किंवा ब्रिटिश वारसा काळातील नावांवर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. युरोपमध्ये कधीही ऐतिहासिक नावांची छेडछाड होत नाही. त्यामधून आपण प्रेरणा घेतली पाहिजे आणि लाहोरचा इतिहास जपला पाहिजे असे मत नवाझ शरीफ यांनी व्यक्त केले.

लाहोर हेरिटेज रिवायव्हल प्रोजेक्ट (Lahore Heritage Revival Project) हा पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील ऐतिहासिक शहर लाहोरचे जुने सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभव परत आणण्याचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.

लाहोर अथॉरिटी फॉर हेरिटेज रिव्हायव्हल (LAHR) या प्रकल्पाच्या देखभालीसाठी पंजाब सरकारने विशेष प्राधिकरणाची स्थापना केली आहे. याच्या सुकाणू समितीचे प्रमुख (Patron-in-Chief) माजी पंतप्रधान नवाझ शरीफ आहेत.

ऐतिहासिक स्थळांच्या आसपास झालेली बेकायदेशीर बांधकामे हटवून परिसर मूळ स्वरूपात आणणे आणि शहराला गर्दीमुक्त करणे हे या प्रकल्पाचे एक मुख्य उद्दिष्ट आहे. तसेच देशी व परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी जुन्या शहराची रचना सुधारणे, भूमिगत पार्किंगची सोय करणे आणि जुन्या ऐतिहासिक दरवाजांची पुनर्बांधणी करणे यावर भर दिला जात आहे.

या प्रकल्पांतर्गत शहराच्या ऐतिहासिक महत्त्वानुसार भागांचे वर्गीकरण केले जात आहे. जुन्या रस्त्यांवरून ओव्हरहेड वायरिंग हटवून ती भूमिगत केली जात आहे. जेणेकरून प्राचीन वास्तूंचे मूळ सौंदर्य अबाधित राहील. मॉल रोडवरील १०४ ऐतिहासिक वास्तू आणि जुन्या बाजारपेठांचे मूळ वास्तुशिल्प (Architecture) जतन करून त्यांचे सौंदर्य वाढवण्याचे काम या प्रकल्पांतर्गत केले जात आहे.फाळणीपूर्वीच्या हिंदू आणि शीख समाजाच्या ऐतिहासिक खुणा व जागांची नावे पुन्हा पूर्ववत करून… लाहोरला त्याच्या मूळ सांस्कृतिक मुळांशी जोडण्याचा हा एक अनोखा प्रयत्न आहे…

फाळणीपूर्वी, १९३५ च्या सुमारास लाहोरच्या मॅक्लिओड रोडवर ‘लक्ष्मी इन्शुरन्स कंपनी’च्या मालकीची एक भव्य इमारत होती. इन्शुरन्स कंपनीची स्थापना स्वातंत्र्यलढ्यातील प्रमुख नेते लाला लजपत राय आणि पंडित संथानम यांनी स्वदेशी चळवळीचा भाग म्हणून केली होती. हिंदू धर्मातील समृद्धी आणि धनसंपत्तीची देवी ‘लक्ष्मी’ हिच्या नावावरून या कंपनीचे व इमारतीचे नाव ठेवले गेले होते. या इमारतीच्या मुख्य दर्शनी भागावर पूर्वी देवी लक्ष्मीची एक मूर्ती किंवा प्रतिमा देखील कोरलेली होती. या ऐतिहासिक इमारतीमुळे या संपूर्ण चौकाला ‘लक्ष्मी चौक’ म्हणून ओळखले जाऊ लागले. फाळणीपूर्वी हा चौक लाहोरमधील सांस्कृतिक, व्यापारी आणि करमणुकीचे मुख्य केंद्र होता. येथे लाहोरमधील सर्वात मोठा दिवाळी उत्सव साजरा केला जायचा, ज्यामध्ये हिंदू, मुस्लिम आणि शीख धर्मीय एकत्र येत असत.

इस्लामी रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या निर्मितीनंतर या चौकाचे नाव बदलून अधिकृतपणे ‘मौलाना जफर अली खान चौक’ असे करण्यात आले होते. परंतु, लाहोरच्या स्थानिक नागरिकांनी आपल्या तोंडी असलेले ‘लक्ष्मी चौक’ हेच नाव कायम ठेवले.

अखेर आता इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या पंजाब सरकारने लाहोरचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी या चौकाचे नाव कागदोपत्रीही पुन्हा अधिकृतपणे बदलून ‘लक्ष्मी चौक’ असेच केले आहे.

नाव बदलणे ही इस्लामी शासकांची फितरत आहे…

काफीरांची मूळ ओळख मुळापासून पुसून टाकणे, त्यांचा इस्लामपूर्व इतिहास अक्षरशः विस्मृतीत ढकलणे, त्यांच्या पुढच्या पिढ्यांना नावावरून देखील आपली मूळ ओळख पटता कामा नये यासाठी इस्लामी शासक सर्वप्रथम मूळची सगळी नावे बदलून टाकतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सरदार नेतोजी पालकर औरंगजेबाला जाऊन मिळाले. औरंगजेबाने त्यांचे धर्मांतर केले व सर्वप्रथम त्यांचे नाव बदलून मोहम्मद कुली खान असे ठेवले.

राजा हिंदू प्रजा हिंदू मात्र आमच्या प्राणप्रिय मातृभूमीच्या विभाजनानंतर सिंधमधील “अमरकोट” संस्थान इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमध्ये विलीन झाले आणि तिथल्या शासकाने सर्वप्रथम त्याचे नाव बदलून “उमरकोट” केले. आज तो इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान मधील एक जिल्हा आहे.

काही वर्षांपूर्वी इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या सिंग प्रांताच्या दादू जिल्ह्यातील “रहमानी नगर” रेल्वे स्टेशनच्या नावाचा पत्रा सोसाट्याच्या वाऱ्याने उडाला. आणि आत मधील सीता रोड हे रेल्वे स्टेशनचे मूळ नाव उघडे पडले. त्याचप्रमाणे विभाजनानंतर इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या शासकांनी मूळची हिंदू व ब्रिटिशकालीन नावे बदलून टाकली. मात्र आता, भिकेला लागलेल्या इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानने देशी व विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आपल्या ऐतिहासिक स्थळांना मूळ नावे द्यायची मोहीम हाती घेतली आहे. हे ही नसे थोडके…

तुम्ही तुमचा उपासना, पंथ बदलू शकता पण तुमचे पूर्वज आणि तुमचा इतिहास बदलू शकत नाही हे इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या उशिरा का होईना पण लक्षात आले…

भारत आणि इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमधील ऐतिहासिक स्थळांच्या नामांतरांमध्ये जमीन आस्मानाचा फरक आहे. इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानचा इतिहास सुरू होतो १४ ऑगस्ट १९४७ पासून. भारत वर्षाचा इतिहास हा सनातन आहे. अनादी आहे. ८oo वर्षांच्या मुघलांच्या आणि १५० वर्षांच्या ब्रिटिशांच्या राजवटीत आमच्या ऐतिहासिक नावांशी छेडछाड करून ती बदलली गेली. त्यांना परत मूळ स्वरूपात आणणे हे आमच्यासाठी गुलामगिरीच्या निशाण्या पुसण्यासारखे आहे. म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महायुती सरकारने औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर नामांतर केले तर उस्मानाबादचे धाराशिव व इस्लामपूरचे ईश्वरपूर हे नामांतर आमच्यासाठी गुलामगिरीची निशाणी पुसणारे अतिशय अभिनंदनीय व स्वागतार्ह असे पाऊल आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या पावलावर पाऊल ठेवून मुंबई महापालिकेने KEM रुग्णालयाचे म्हणजे किंग एडवर्ड स्मारक (मेमोरियल) रुग्णालयाचे नामांतर त्याची अद्याक्षरे न बदलता कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल रुग्णालय असे केले. मात्र, मुंबई महापालिका ही आपली वडिलोपार्जित संपत्ती असल्याच्या मग्रुरीत मग्न असलेली व ती हातातून निसटल्यामुळे बिथरलेल्या लाचार सम्राट उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिल्लक सेनेने त्याला आक्षेप घ्यायला सुरुवात केली.

वास्तविक इसवी सन १८९६ मध्ये मुंबईत पसरलेल्या प्लेगच्या साथीमुळे लाखो लोकांचा मृत्यू झाला होता. वाढत्या लोकसंख्येच्या मानाने मुंबईत पुरेशा वैद्यकीय सुविधा उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे एका मोठ्या रुग्णालयाची गरज निर्माण झाली. तत्कालीन ब्रिटिश नियंत्रित जे. जे. रुग्णालयात उच्च शिक्षित आणि पात्र भारतीय डॉक्टर व शिक्षकांना काम करण्याची किंवा मानाची पदे मिळवण्याची संधी नाकारली जात होती.

ब्रिटिशांच्या या भेदभावाला आणि वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी मुंबईतील राष्ट्रप्रेमी नागरिक, नेते आणि देणगीदार एकत्र आले. त्यांनी पूर्णपणे भारतीय डॉक्टरांद्वारे चालवले जाणारे स्वदेशी रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेतला. सेठ गोरधनदास सुंदरदास यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या मोठ्या देणगीतून ‘सेठ जी. एस. मेडिकल कॉलेज’ सुरू करण्यात आले.

रुग्णालयासाठी निधी गोळा करत असताना, तत्कालीन ब्रिटिश किंग एडवर्ड (सातवे) यांच्या स्मारकासाठी जमा झालेला निधी या रुग्णालयासाठी वापरण्यात आला. त्यामुळे त्याचे नाव ‘किंग एडवर्ड मेमोरियल (केईएम) रुग्णालय’ ठेवण्यात आले. खरे बघता किंग एडवर्ड मेमोरियल इस्पितळाचे खरे आर्थिक देणगीदार सर्वसामान्य मुंबईकर. सेठ गोरधनदास सुंदरदास यांचे कुटुंबीय हेच आहेत. कारण तत्कालीन ब्रिटिश किंग एडवर्ड (सातवे) यांच्या स्मारकासाठी जमा झालेला निधी हा देखील भारतीयांकडूनच गोळा करण्यात आला होता. तो आमचाच पैसा होता. आमच्याच पैशाने ते इस्पितळ बांधले गेले आहे. केवळ शासक असल्यामुळे त्या इस्पितळाला किंग एडवर्ड यांचे नाव देण्यात आले.

त्यातून आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या व क्रांतिकारकांच्या अतुलनीय शौर्यामुळे व प्राणांच्या बलिदानामुळे आपल्या देशाला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले आणि आमचा ब्रिटिशांशी शासक म्हणून असलेला संबंध संपला. मी “स्वतंत्र” झालो. त्यानंतर KEM रुग्णालयाचे नाव काय ठेवायचे हा सर्वस्वाने आमचा निर्णय असणार आहे. याच “स्वातंत्र्या”ला अनुसरून मुंबई महापालिकेने या रुग्णालयाचे नाव कौशल्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक (मेमोरियल) रुग्णालय असे केले. त्यातल्या त्यात त्याची K.E.M. ही आद्याक्षरे बदलण्यात आली नाहीत.

वास्तविक स्वदेशी वारसा जतन करण्यासाठी आणि ब्रिटिशकालीन वसाहतवादी मानसिकतेच्या खुणा पुसून टाकण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

ज्वलंत हिंदुत्वाचा वारसा सांगणाऱ्या लाचार सम्राट उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिल्लक सेनेने खरे म्हणजे मुंबई महापालिकेच्या या निर्णयाचे स्वागतच करायला हवे होते. पण भारतीय जनता पक्षाच्या पराकोटीच्या द्वेषापायी राज्याची व मुंबई महापालिकेची सत्ता आपल्या हातातून निसटून भारतीय जनता पक्षाकडे गेल्यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या शिल्लक सेनेने या नामांतरावरून विनाकारण थयथयाट केला आहे. या संदर्भात रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. सौ. संगीता रावत यांना निवेदन सादर करण्यात आले. ऐतिहासिक रुग्णालयाचे नामांतर करू नये, अशी मागणी लाचार सेने तर्फे करण्यात आली. त्यांच्या पक्षाच्या राजकीय वारशाला हे न शोभणारे असले तरी सध्याच्या त्यांच्या लाचारीच्या राजकारणाला अनुरूप असेच हे दळभद्री वर्तन आहे. सवंग लोकप्रियतेसाठी केलेली नौटंकी यापलीकडे मुंबईकरांच्या दृष्टीने त्याला काहीही किंमत नाही.

KEM रुग्णालयाच्या नमांतरामुळे सामान्य मुंबईकर मात्र अतिशय खुश आहे आणि शिल्लक सेनेने KEMच्या नामांतरासाठी लाहोरमध्ये सुरू असलेल्या नामांतराचा हवाला देऊ नये. कारण लाहोर मधील नामांतर ही इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानची सांस्कृतिक व आर्थिक मजबुरी आहे. त्यांची सांस्कृतिक मूळे ही सनातन संस्कृतीतच रुजलेली आहेत. कितीही प्रयत्न केला तरी त्यांना तो इतिहास पुसता येणार नाही.

तसेच आज भिकेला लागल्यामुळे लाहोर त्याच्या मूळ स्वरूपात दाखवले तर भारतापासून अनेक विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने लाहोरला येतील. आपल्याला परकीय चलन मिळेल असे अगतिकतेचे अर्थकारण देखील त्यामागे आहे. भारतातील नामांतर हे मात्र स्वदेशी वारसा जतन करण्यासाठी आणि ब्रिटिशकालीन वसाहतवादी मानसिकतेच्या खुणा पुसून टाकण्यासाठी उचललेले “स्व तंत्रा”चे दमदार पाऊल आहे त्यामुळे राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण त्याचे स्वागत केले पाहिजे.

अन्य लेख

संबंधित लेख