मुंबई : कोल्हापूरचे आराध्य दैवत आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र जोतिबा मंदिर परिसराच्या विकासासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. “जोतिबा डोंगराचे पर्यावरणीय महत्त्व अनन्यसाधारण आहे, त्यामुळे या परिसराचा विकास करताना पर्यावरणाचा समतोल राखला जावा,” असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. विधानभवन येथे आयोजित शिखर समितीच्या बैठकीत मंदिर परिसराच्या १७० कोटी रुपयांच्या सुधारित विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली.
२५० कोटींचा भव्य आराखडा
श्रीक्षेत्र जोतिबा मंदिर व परिसर विकासाचा एकूण आराखडा २५० कोटी रुपयांचा आहे. यापैकी ८० कोटी रुपयांची कामे प्रगतीपथावर असून, उर्वरित १७० कोटींच्या कामांना आता वेग मिळणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ज्योतिबा मंदिर डोंगर परिसराचा विकास करताना मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात यावी. आधी लागवड केलेल्या वृक्षांचे जिवंत राहण्याचे प्रमाण वाढविण्यात यावे. डोंगर परिसरावर घनकचरा व्यवस्थापन प्रभावीपणे करण्यात यावे. मंदिर परिसरात अनेक भाविक अन्नदान करीत असतात या अन्नदानाकरिता अन्न छत्रालय विकसित करण्यात यावे. येथे जास्तीत जास्त भाविक सामावून घेण्याची क्षमता असावी.
डोंगर परिसराचे पर्यावरणीय महत्त्व लक्षात घेता, येथे असणाऱ्या वस्तीमधील सांडपाणी व्यवस्थापन करावे. येथे येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता स्वच्छतेबाबत काटेकर नियोजन करण्यात यावे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
थोडक्यात विकास आराखडा
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात असलेल्या श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर व परिसर विकास आराखडा आराखड्यामध्ये श्री ज्योतिबा डोंगरावरील जुन्या पायवाटांचे दुरुस्तीसह रुंदीकरण करण्यात येणार आहे. तसेच पायवाटांच्या बाजूने विविध प्रकल्पांमध्ये बाधित होणाऱ्या वृक्षांचे पुनर्रोपण, सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष, विद्युत नियंत्रण कक्ष, पोलीस कक्ष व देवस्थान व्यवस्थापन कार्यालय, यमाईदेवी मंदिर परिसरात भाविकांसाठी सुविधा केंद्र, मंदिराचे दक्षिणद्वार प्रवेश मार्गाची दुरुस्ती, शाहूकालीन हुजूरवाडा इमारत संवर्धन, कुशीरे ते गायमुख तलाव पार्किंगसह पादचारी मार्गाचा विकास, पाच मेगावॉट समतेचे वीज उपकेंद्र व सौर ऊर्जा प्रकल्प, भाविकांसाठी निवास व्यवस्था, प्राथमिक आरोग्य सुविधा कक्ष व अन्नछत्र, वाडी रत्नागिरी गावामधील रहिवासी व भाविकांसाठी कायमस्वरूपी पाणी पुरवठा व्यवस्था करण्यात येणार आहे.