मुंबई : आगामी नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीमध्ये (BJP) अनेक ठिकाणी बंडखोरीचे चित्र दिसत असताना, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी यावर सकारात्मक भूमिका मांडली आहे. अंतिम अर्ज माघारीच्या तारखेपर्यंत बहुतांश बंडखोरी आवरण्यास पक्ष यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘कार्यकर्ता शेवटी पक्षासाठीच समर्पित’
बंडखोर अपक्ष उमेदवारांशी संवाद सुरू असल्याची माहिती देताना बावनकुळे म्हणाले की, “आमच्या त्या त्या भागातील प्रभारी नेते, जिल्हानिहाय प्रभारी हे सर्व नाराज कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. अनेक अपक्ष उमेदवार हे पक्षाचेच कार्यकर्ते आहेत. निवड प्रक्रियेत संधी न मिळाल्याने नाराजी निर्माण झाली असली तरी, शेवटी कार्यकर्ता पक्षासाठीच समर्पित असतो.” त्यांनी पुढे सांगितले की, अनेक वर्षांनी निवडणुका होत असल्याने अनेकांना संधीची अपेक्षा होती. आम्ही त्यांना विनंती करत आहोत आणि अर्ज माघारीच्या अंतिम तारखेपर्यंत बंडखोरी मोठ्या प्रमाणात कमी झालेली दिसेल.
मुंबई मनपा निवडणूक: ‘ठाकरे बंधू’ एकत्र आले तरी फरक पडणार नाही!
मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येण्याच्या चर्चेबद्दल विचारले असता, बावनकुळे यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “भाजपचा फॉर्म्युला स्पष्ट आहे आणि महायुती एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण, आशिष शेलार, अमित साटम तसेच एकनाथ शिंदे व अजित पवार हे सर्व नेते एकत्रित रणनीती आखत आहेत.” डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून मुंबईची जनता मोठ्या अपेक्षेने पाहत आहे आणि मुंबईची जनता आम्हालाच निवडून देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.