मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती सरकारच्या एका वर्षाच्या कार्यकाळात विविध आव्हानांचा समर्थपणे सामना केल्याचे ठामपणे सांगितले. सरकारमधील तिन्ही प्रमुख नेते एकत्रितपणे निर्णय घेत असून, त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न शासन करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री म्हणाले, “वर्षानुवर्षे निवडणुका न झाल्याने स्थानिक स्तरावरील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. मात्र, आता निवडणुका सुरू झाल्यामुळे लोकशाही खालपर्यंत पोहोचेल आणि स्थानिक संस्थांच्या निवडणुकांनंतर महाराष्ट्र अधिक गतिमान होणार आहे.”
मुंबई महाराष्ट्राचीच!
महाराष्ट्राच्या अखंडत्वावर आणि मुंबईच्या अस्तित्वावर फडणवीस यांनी कोणताही संभ्रम न ठेवता स्पष्टीकरण दिले की, “महाराष्ट्र हे एक शक्तिशाली राज्य आहे आणि त्यात कुठलाही संभ्रम ठेवण्याची गरज नाही. १०६ शहीदांनी तयार केलेला संयुक्त महाराष्ट्र अजूनही अखंड आहे. मुंबई महाराष्ट्रापासून कधीही वेगळी होणार नाही. मुंबई नेहमी महाराष्ट्राची राहिली आहे आणि राहणार आहे.”
संविधानिक मार्गाने राज्याचा विकास
फडणवीस यांनी सांगितले की, राज्य सरकार छत्रपती शिवराय आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या संविधानिक मार्गाने राज्याचे कामकाज आणि विकास करत आहे.