Wednesday, August 20, 2025

‘सगळे उघडे, नागडे झाले’; बेस्ट निवडणूक निकालावरून आशिष शेलार यांची विरोधकांवर टीका

Share

मुंबई: बेस्ट (BEST) कर्मचाऱ्यांच्या सहकारी पतपेढीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपच्या समर्थकांना मोठा विजय मिळाला आहे. या निवडणुकीत पक्ष म्हणून थेट सहभाग नसतानाही भाजपचे समर्थक समजल्या जाणाऱ्या ‘शशांक राव पॅनेल’ने १४ पैकी १४ जागा जिंकून एकतर्फी विजय मिळवला. दुसरीकडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘उत्कर्ष पॅनेल’ला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आणि त्यांना एकही जागा जिंकता आली नाही.

या निकालावर प्रतिक्रिया देताना, भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी हा “भाजपासाठी मुंबईकरांचा शुभसंकेत” असल्याचे म्हटले आहे. सोशल मिडीयावर पोस्ट करत त्यांनी म्हटलंय कि, “बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत मुंबईकर जिंकले, कामगार जिंकले. कामगारांनी आम्हाला शुभसंकेत दिला आणि ‘पत’ आणि ‘पेढी’साठी लढणाऱ्यांच्या हाती मोठा भोपळा दिला”.

“पक्ष म्हणून आम्ही निवडणूक लढलो नाही, पण आमचे प्रसाद लाड आणि शशांक राव विजयी झाले आहेत. हा एक मोठा शुभसंकेत आहे. बॅलेट पेपरवर मतदान झालेली ही निवडणूक जिंकून आम्ही सिद्ध केले आहे की मुंबईकर, कामगार आणि श्रमिक आमच्या बाजूने आहेत.”

या निकालाने अनेक राजकीय विश्लेषकांचे अंदाज चुकले आहेत. यावर निशाणा साधत त्यांनी म्हटले की, “तमाम तथाकथित राजकीय विश्लेषक, मतचोरी झाले म्हणणारे तथाकथित तज्ञ आणि विश्वविख्यात प्रवक्त्यांपासून गल्लोगल्लीतल्या “निर्भय”वक्त्यांपर्यंत…, सगळे उघडे, नागडे झाले आहेत. भर पावसात तोंडावर आपटले आहेत. हा निकाल मुंबई आमची आहे आणि मुंबईकरही आमचे आहेत, हे पुन्हा एकदा दाखवतो”, असे ते म्हणाले.

अन्य लेख

संबंधित लेख