सणवार म्हटले की देवाची पूजा, आरती आलीच. त्यातही नवरात्रीसारखा मोठा उत्सव म्हटला की नऊ दिवस सकाळी आणि संध्याकाळी घटस्थापना, पूजा आणि आरती केली जाते. पूजेसाठी आणि देवीला प्रसन्न करण्यासाठी आपण आवर्जून विविध प्रकारची फुले आणि पानांचे हार वाहतो. सजावटीसाठीही फुलांचा भरपूर वापर केला जातो. पण एकदा वाहिलेली फुले संध्याकाळपर्यंत किंवा दुसऱ्या दिवशी सुकून जातात.
मग या सुकलेल्या फुलांचे निर्माल्य होते आणि आपण ती टाकून देतो. पण ही फुले, कडुलिंबाची किंवा विड्याची पाने टाकून देण्यापेक्षा त्यांचे वेगळे आणि अत्यंत उपयुक्त वापर करता येतात. या निर्माल्यापासून घरच्या घरी धूपकांडी आणि सेंद्रिय खत तर बनवता येतेच, शिवाय सौंदर्याचा निखार वाढवण्यासाठीही त्याचा छान उपयोग होतो. पाहुयात या निर्माल्याचे काही सोपे उपयोग…
१. जास्वंद आणि कडुलिंबाची पाने केसांसाठी उपयुक्त
नवरात्रीत देवीला जास्वंदाची फुले आणि कडुलिंबाची पाने आवर्जून वाहिली जातात. केसांच्या आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी जास्वंद व कडुलिंब अतिशय गुणकारी मानले जातात. खोबरेल तेलात जास्वंदीची वाळलेली फुले आणि कडुलिंबाची पाने घालून ते तेल मंद आचेवर उकळावे. त्यामुळे त्यातील अर्क तेलात उतरतो. हे तेल थंड करून केसांच्या मुळांशी लावल्यास केसगळती थांबण्यास, कोंडा कमी होण्यास आणि केस मजबूत होण्यास मदत होते.
२. विड्याच्या पानांचे आरोग्यदायी उपयोग
देवीच्या पूजेमध्ये किंवा घटस्थापनेच्या विधीत विड्याच्या पानांना (तांबूल) विशेष महत्त्व असते. या पानांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि औषधी गुणधर्म असतात. पूजा झाल्यानंतर ही पाने फेकून न देता त्यात बडीशेप, धणाडाळ, खडीसाखर आणि गुलकंद घालून त्याचा चविष्ट व आरोग्यदायी तांबूल (मावा) बनवता येतो. तसेच विड्याच्या पानांची बारीक पेस्ट करून ती गरम तेलात उकळून गाळून घेतल्यास आणि ते तेल केसांना लावल्यास केसांचे उत्तम नॅचरल कंडिशनिंग होते.
३. फुलांपासून घरच्या घरी उत्तम सेंद्रिय खत
नवरात्रीतील नऊ दिवसांत गोळा होणाऱ्या निर्माल्याचा वापर घरातील रोपांसाठी उत्तम खत बनवण्यासाठी करता येतो. सुकलेली फुले आणि पाने एकत्र करून मिक्सरमध्ये त्याची पावडर करून घ्यावी. ही पावडर कुंडीतील मातीत मिसळल्यास रोपांना आवश्यक पोषण मिळते, ज्यामुळे झाडांची वाढ छान होते आणि नवीन फुले येण्यास मदत होते.
४. सुगंधित आणि नैसर्गिक धूपकांडी
सुकलेल्या फुलांच्या पाकळ्या वेगळ्या करून २ दिवस कडक उन्हात वाळवून घ्या. त्यात वाळलेली कडुलिंबाची पाने किंवा संत्र्याची वाळलेली साले मिसळा. आता या वाळलेल्या पाकळ्या, ८ ते १० लवंगा, पाव वाटी कापूर आणि कडुलिंबाची पाने हे सर्व मिक्सरमध्ये बारीक दळून घ्या. या पावडरमध्ये २ चमचे मध आणि २ चमचे तूप घालून सर्व मिश्रण नीट एकत्र करा. त्याचे छोटे छोटे धुपाचे गोळे (किंवा धूपकांडीच्या आकाराचे शंकू) तयार करा. मिश्रण कोरडे वाटल्यास त्यात थोडे मध किंवा पाणी घालू शकता. हे धूपाचे गोळे एका ताटात ठेवून सुकू द्या. संध्याकाळच्या आरतीच्या वेळी हा धूप जाळल्यास घरातील वातावरण प्रसन्न आणि सुगंधित राहते.