Wednesday, August 20, 2025

उद्धव आणि राज ठाकरेंची युती ठरली अपयशी; बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे युतीचा दारुण पराभव

Share

मुंबई: मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांच्या सहकारी पतपेढीच्या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘उत्कर्ष पॅनेल’चा दारुण पराभव झाला आहे. या निवडणुकीत ‘उत्कर्ष पॅनेल’ला एकही जागा मिळवता आली नाही, तर ‘शशांक राव पॅनेल’ने १४ जागा जिंकून एकतर्फी विजय मिळवला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य राजकीय एकत्रिकरणाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक महत्त्वाची मानली जात होती, मात्र या निकालाने दोन्ही ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसला आहे.

बेस्ट कर्मचारी सहकारी पतपेढीसाठी १८ ऑगस्ट रोजी मतदान झाले होते. मुसळधार पावसामुळे निकाल जाहीर होण्यास उशीर झाला आणि मंगळवारी रात्री उशिरा हा निकाल जाहीर झाला. या पराभवामुळे ठाकरे गटाने बेस्ट पतपेढीतील तब्बल नऊ वर्षांची सत्ता गमावली आहे.

हा निकाल केवळ पतपेढीच्या निवडणुकीपुरता मर्यादित नसून, आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण मानला जात आहे. ठाकरे गट आणि मनसे आगामी महापालिका निवडणूक एकत्र लढवणार असल्याच्या चर्चांना या निकालामुळे मोठा धक्का बसला असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

या निकालाने राजकीय वर्तुळात धक्का बसला असून, ‘उत्कर्ष पॅनेल’च्या पराभवामुळे ठाकरे गटाच्या आणि मनसेच्या एकत्रित राजकीय वाटचालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या निकालाचे पडसाद येत्या काळात मुंबईच्या राजकारणात उमटण्याची शक्यता आहे.

अन्य लेख

संबंधित लेख