भटके-विमुक्त समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, कौशल्य विकास, स्वयंरोजगार आणि आर्थिक सक्षमीकरणाला प्राधान्य देण्याची गरज आहे. या समाजातील कोणत्याही बालकाचे शिक्षण त्यांच्या भटक्या जीवनपद्धतीमुळे बाधित होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी, असे आवाहन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.
फर्ग्युसन महाविद्यालयात महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्यावतीने आयोजित ‘भटके-विमुक्त दिवस’ या राज्यस्तरीय कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, भटके-विमुक्त विकास परिषदेचे अध्यक्ष उद्धवराव काळे, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव आप्पासो धुळाज, संचालक सोनाली मुळे आदी उपस्थित होते.
भटके-विमुक्त आणि घुमंतू समाजाचे शेती, शिल्पकला, पशुपालन, वाहतूक, लोककला क्षेत्रातील योगदानाचा विशेष उल्लेख करून राज्यपाल वर्मा म्हणाले, भटके-विमुक्त समाजाचा संघर्ष हा केवळ इतिहासाचा नाही तर सामाजिक न्यायाचा विषय आहे. स्थिर निवास, जमिनीचा अधिकार, नागरिकत्वाची कागदपत्रे, शिक्षण, आरोग्य, रोजगार, निवारा आणि शासकीय योजनांचा लाभ मिळविताना समाजाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या अडचणी दूर करण्यासाठी शासन आणि समाजाने एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यपालांच्या हस्ते भटके-विमुक्त समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच समाज बांधवांना प्रतिनिधिक स्वरूपात जातीच्या प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या विविध पुस्तिकांचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाला भटके-विमुक्त समाजाचे प्रतिनिधी, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि अधिकारी उपस्थित होते.