Thursday, October 1, 2026

शहीद करीमाच्या नावाची गरीमा BLF ची महिला ब्रिगेड

Share

इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये सक्रिय असलेल्या बलुच लिबरेशन फ्रंटने (BLF) आपल्या नव्या “महिला लढाऊ युनिट”च्या सशस्त्र कारवायांचा व्हिडीओ जारी केला आहे…

‘करीमा आर्म्ड असॉल्ट डिव्हिजन’ म्हणजेच ‘काड’ या महिला युनिटने… २२ सप्टेंबर रोजी बलुचिस्तानमधील केच जिल्ह्यातील तुर्बतजवळ जसाक परिसरात चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरच्या (CPEC) मार्गावर पाकिस्तानी लष्कराच्या ३ वाहनांच्या ताफ्यातील एका क्विक रिस्पॉन्स फोर्सच्या ताफ्यावर ‘काड’च्या महिला लढवय्यांनी हल्ला केल्याचा दावा BLFने केला आहे… या कारवायांमध्ये एकूण ९ पाकिस्तानी लष्करी सैनिक ठार झाल्याचा संघटनेचा दावा आहे… या कारवाईदरम्यान BLFच्या ‘कुरबान’ युनिटनेही ‘काड’ला मदत केल्याचे संघटनेने म्हटले आहे…

ज्या “करीमा” नावाने BLF ने आपले महिलांचे सशस्त्र युनिट  सुरु केले आहे… त्या करीमा बलोच (त्यांना करीमा मेहराब म्हणूनही ओळखले जाते) या पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतातील एक प्रमुख मानवाधिकार आणि स्वातंत्र्य समर्थक कार्यकर्त्या होत्या… त्यांनी बलुचिस्तानमधील लोकांवर पाकिस्तानी लष्कर आणि गुप्तचर यंत्रणेकडून (ISI) होणाऱ्या अत्याचारांविरोधात जागतिक स्तरावर आवाज उठवला होता… त्या बलुचिस्तानमधील ‘बलुच स्टुडंट्स ऑर्गनायझेशन – आझाद’ (BSO-Azad) या राजकीय विद्यार्थी संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्षा होत्या… २०१६ मध्ये बीबीसीने (BBC) त्यांचा जगातील १०० सर्वात प्रभावशाली आणि शक्तिशाली महिलांच्या यादीत समावेश केला होता…

बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून स्थानिक नागरिकांचे केले जाणारे अपहरण, हत्या आणि होणारे मानवाधिकार उल्लंघन याविरोधात त्यांनी व्यापक आंदोलने केली… पाकिस्तान सरकारने त्यांच्यावर देशद्रोहाचे आणि दहशतवादाचे आरोप लावले होते… स्वतःच्या जीवाला धोका निर्माण झाल्यामुळे २०१५-१६ मध्ये त्यांनी पाकिस्तानातून पलायन केले आणि कॅनडामध्ये राजकीय आश्रय घेतला…

२०१६ मध्ये रक्षाबंधनानिमित्त करीमा बलोच यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाऊ संबोधले होते… त्यांनी मोदींना आंतरराष्ट्रीय स्तरावर बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी आणि तेथील गायब होणाऱ्या बहीण-भावांसाठी आवाज उठवण्याचे आवाहन केले होते… त्यामुळे त्या भारतीय प्रसारमाध्यमांमध्ये कमालीच्या चर्चेत आल्या होत्या… डिसेंबर २०२० मध्ये कॅनडातील टोरंटो येथे राहणाऱ्या करीमा अचानक बेपत्ता झाल्या… त्यानंतर २ दिवसांनी टोरंटोच्या ‘हार्बरफ्रंट’ जवळील ओंटारिओ सरोवरामध्ये त्यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत तरंगताना आढळला… बलुच संघटना, त्यांचे कुटुंबीय आणि अनेक कार्यकर्त्यांनी असा आरोप केला की, पाकिस्तानच्या आयएसआय (ISI) आणि लष्कराने त्यांची कॅनडामध्ये हत्या घडवून आणली… कॅनडाच्या स्थानिक पोलिसांनी हा मृत्यू ‘नॉन-क्रिमिनल’ (अपराध नसलेला किंवा अपघाती) घोषित केला असला, तरी त्यांच्या मृत्यूवर जगभरात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आणि सखोल तपासाची मागणी करण्यात आली होती…

त्या शहीद करीमा यांना श्रद्धांजली म्हणून… सप्टेंबर २०२६ मध्ये त्यांच्या नावाने या पहिल्या पूर्णवेळ सशस्त्र महिला युनिटची घोषणा केली…

BLF’ ने जारी केलेल्या अधिकृत व्हिडिओंमध्ये… या महिला ब्रिगेडच्या सदस्यांना डोंगराळ भागात अत्याधुनिक शस्त्रास्त्रे चालवण्याचे, लष्करी वाहने आणि मोटारसायकल वापरण्याचे कठीण प्रशिक्षण घेताना दाखवण्यात आले आहे…

या ब्रिगेडमधील महिला केवळ प्रत्यक्ष युद्धातच नाही, तर गुप्तहेर माहिती गोळा करणे (Intelligence), कम्युनिकेशन (संवाद), वैद्यकीय मदत (Medical Support) आणि लॉजिस्टिक्स यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या ऑपरेशनल जबाबदाऱ्याही सांभाळत आहेत…

आता BLF ने देखील औपचारिकरीत्या स्वतंत्र महिला असॉल्ट ब्रिगेड (KAAD) स्थापन केल्यामुळे बलुचिस्तानमधील संघर्षाने एक नवे आणि अधिक आक्रमक वळण घेतले आहे… या चकमकीदरम्यान पाकिस्तानी सैन्याने महिला तुकडीला वेढण्याचा प्रयत्न केला असता… कुर्बान युनिटने त्यांना बॅकअप (पाठींबा) दिला आणि पाकिस्तानी सैन्याशी थेट मुकाबला करून महिला सैनिकांना सुरक्षितपणे बाहेर काढले…

या चकमकीत महिला तुकडीचे रक्षण करताना कुर्बान युनिटचा मुख्य लढाऊ सैनिक चाकर मुराद ऊर्फ दिलीप जान हा मारला गेला…

कुर्बान युनिट (Qurban Unit) ही BLF ची अत्यंत महत्त्वाची आणि घातक तुकडी (Vanguard Force) आहे… कुर्बान युनिट ही प्रामुख्याने ‘मरतेदमपर्यंत लढणारी’ (Fight-to-the-death) तुकडी मानली जाते… पाकिस्तानी सुरक्षा दलांचे ताफे, लष्करी तळ आणि त्यांच्या चौक्यांवर गनिमी काव्याने थेट आणि मोठे हल्ले करण्यासाठी BLF या युनिटचा वापर करते…

‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’च्या (BLA) मजीद ब्रिगेडसारख्या इतर आत्मघाती पथकांच्या तुलनेत… BLF आपल्या कुर्बान युनिटच्या अंतर्गत रचनेबाबत मात्र कमालीची गुप्तता पाळते…एकंदरीत BLFच्या महिला ब्रिगेडच्या उदयानंतर पाकिस्तान सरकारची झोप उडाली नसेल तरच नवल…

अन्य लेख

संबंधित लेख