Friday, February 13, 2026

लाचारीशी जडले नाते ऐसे उबाठाचे

Share

बागवान मो. सुफियान मो. इब्राहिम
शेख हुसेना बानो शेख हबीब
बरीरा उम्मे रोमन डॉ. मो. वरकतुल्लाह
रईस खान सरफराज खान
सायेरा बेगम अलिमुद्दीन
नौशीन फातिमा मो. अलीम कुरेशी
शरफूद्दीन सिद्दीकी इफ्तेखारुद्दीन
सबाह आफरीन अन्सारी मो. अब्दुल साजिद
साबिहा बेगम हसन बजहाव
सय्यद इकबाल सय्यद खाजा
सय्यद समी सय्यद साहेबजान
तांबोळी जाहेदा परवीन
शेख रईस हबीब

तुम्हाला काय वाटलं…? ही ज्ञानपीठ पारितोषिकासाठी संभावित उर्दू साहित्यिकांची यादी आहे? की मुंबई विद्यापीठाच्या M.A. (उर्दू) परीक्षेच्या गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांची यादी? तर दोन्हीही नाही. ही आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची परभणीतील गुणवत्ता यादी…

६५ नगरसेवकांच्या परभणी महापालिकेत २०२६ च्या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या शिवसेना (उबाठा)ला २५ जागा मिळाल्या आणि त्यांच्या महाविकास आघाडीतील मित्रपक्ष काँग्रेसला १२. एकूण ३७ नगरसेवक म्हणजे बहुमताचा आकडा पार.

शिवसेना (उबाठा)च्या त्या २५ नगरसेवकांपैकी हे तब्बल १३ नगरसेवक मुसलमान आहेत तर काँग्रेसच्या १२ पैकी ८ नगरसेवक मुसलमान आहेत. हा विकास आघाडीच्या म्हणजे ३७ पैकी २१ नगरसेवक मुसलमान.

ज्या काँग्रेसकडून ज्वलंत हिंदुत्ववादी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुस्लिम लांगुलचालनाचे धडे गिरवले. त्याच गुरुस्थानी असलेल्या काँग्रेसला शिष्य शिवसेना (उबाठा)ने परभणीत मुस्लिम अनुनयाच्या कलेत चीतपट केले. गुरुची विद्या गुरुला फळली. मुस्लिम अनुनयाची कला. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा पुत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे इतक्या लवकर आत्मसात करतील व त्यात प्राविण्य मिळवतील अशी पुसटशी देखील कल्पना देखील काँग्रेसला गेली नसेल त्यामुळे ते गाफील राहिले असावेत.

अर्थात जगात दोन पराभव हे आनंददायी आणि अभिमानास्पद मानले जातात. एक पुत्राकडून झालेल्या पित्याचा पराभव आणि दुसरा शिष्याकडून झालेला गुरुचा पराभव.

राजकारणात मात्र शिष्याकडून झालेला गुरुचा पराभव हा गुरुसाठी चिंतेचा विषय असतो. कारण आता शिष्य गुरुसाठी त्याच्याच कलेत प्रतिस्पर्धी झाला आहे.

सर्वात जास्त नगरसेवक निवडून आलेले असल्यामुळे महापौर पदाचा मान शिवसेना (उबाठा)ला मिळणार हे सांगायलाच नको. पण तो मान कोणाला द्यायचा? मातोश्रीवरून महापौर पदाचा उमेदवार ठरवला गेला असला तरी न सांगता तो मुसलमानाच ठरवला गेला. काँग्रेससोबत असल्यामुळे आपण दिलेल्या पाठिंब्याची पुरेपूर किंमत परभणीच्या मुस्लिम समाजाने शिवसेना (उबाठा)कडून वसूल केली. पहिल्यांदाच निवडून आलेल्या सय्यद इकबाल सय्यद खाजा यांची महापौरपदी निवड करण्यात आली. काँग्रेसने उपमहापौर पदासाठी अनुभवी अशा गणेश देशमुख यांचे नाव निश्चित केले.

शिवसेना (उबाठा)चे २५ पैकी उरलेले १२ नगरसेवक हिंदू आहेत. त्यापैकी एखाद्या नगरसेवकाचा महापौर म्हणून विचार करण्याची हिंमत सुद्धा मातोश्रीमध्ये उरलेली नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तसा विचार केला असता तर परभणीत पक्षाची वाताहात झाली असती. न जाणो आपल्या मनात असा विचार आला आहे हे आपल्या मुसलमान नगरसेवकांना कळले तर, महाराष्ट्रात हाती आलेली एकमेव महानगरपालिका देखील हातातून निसटेल या भीतीपोटी सय्यद इकबाल सय्यद खाजा यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

अखिल ब्रम्हांडात शिवसेना (उबाठा)ची बाजू मांडणारे विश्व प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी यावर सारवासारव करताना सांगितले की, महापौर कोणत्या धर्माचा आहे यापेक्षा त्याने शहराच्या विकासासाठी काय केले, हे महत्त्वाचे आहे.

जर देशाचे राष्ट्रपती मुसलमान असू शकतात, तर महापालिकेचे महापौर मुसलमान का होऊ शकत नाहीत? अशी मखलाशी देखील त्यांनी केली. महापौरांनी हिंदू-मुस्लिम वादात न पडता शहराच्या समस्या आणि नागरी सुविधांवर लक्ष केंद्रित करावे असे ज्ञानामृत देखील पाजले आहे.

परभणीतील मुस्लिम मतदारांची आणि नगरसेवकांची संख्या लक्षात घेऊन पक्षाने हा निर्णय घेतल्याचे संजय राऊत यांनी समर्थन केले. (पक्षापुढे दुसरा पर्यायही नव्हता हे between the lines आपण वाचायचे आहे…)

बहुदा परभणीत राज्यातील एकमेव आपला महापौर होणार या अत्यानंदात विश्व प्रवक्ते संजय राऊत शिवसेनेच्या साबीर भाई शेख यांचे उदाहरण द्यायला विसरले असावेत.

साबीर भाई शेख १९९१ ते २००४ शिवसेनेचे आमदार होते. अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातून ते निवडून जात. १९९५ साली सेना भाजप युती सरकारमध्ये ते कामगार मंत्री झाले. साबीरभाई एक उत्तम पहिलवान होते. हिंदू धर्म, संत वाङ्‌मय, साहित्य आणि शिवपुराणाचा त्यांनी अभ्यास केला होता. त्या जोरावर ते एक उत्तम वक्ता झाले होते. शिवसेनेची तोफ म्हणून ते ओळखले जात. शिवसेनाप्रमुखांनी त्यांना “शिवभक्त” ही उपाधी दिली होती.

शिवसेनेचे एकमेव मुसलमान आमदार असून शिवसेनाप्रमुखांनी इतर अनेक पर्याय उपलब्ध असूनही साबीर भाईंना मंत्रीपद दिले ते त्यांच्या “ज्ञानाच्या आणि निष्ठेच्या बळा”वर… 

आज सय्यद इकबाल सय्यद खाजा परभणीचे महापौर झाले आहेत ते निव्वळ मुसलमान नगरसेवकांच्या “संख्याबळा”वर… उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यापुढे दुसरा पर्यायच उरला नव्हता. यालाच “लाचारी” म्हणतात.

मुख्यमंत्री पदाच्या क्षणभंगुर हव्यासापोटी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे लाचारीशी असे नाते जडले आहे की, त्यांच्या पक्षाचा सर्वनाश हीच त्यांची अटळ नियती आहे.

अन्य लेख

संबंधित लेख