प्राचीन काळापासून भारतीय उपखंडाला ‘भारत’ हे नाव आहे. पण जेव्हा या नावाचा विचार करतो, हे केवळ एका देशाचं नाव नाही; ती एक संस्कृती आहे, एक जीवनशैली आहे आणि हजारो वर्षांचा एक देदीप्यमान इतिहास आहे; जो आपल्या ‘स्व’ चा भाग आहे. आज आपण ज्या देशात राहतो, ज्याला आपण अत्यंत अभिमानाने ‘भारत’ म्हणतो, त्या नावाचा जन्म कसा झाला? त्यामागे कोणत्या रंजक आणि ऐतिहासिक गोष्टी दडलेल्या आहेत? आज या नावाच्या उगमाची गोष्ट आपण जाणून घेऊया.
अभिमानाने म्हणूया ‘भारत’
‘भारत’ हा मूळचा संस्कृत शब्द. यात एकूण दोन शब्द आहेत; पहिला ‘भा’ म्हणजे तेज, प्रकाश किंवा ज्ञान; आणि ‘रत’ म्हणजे रममाण झालेला किंवा मग्न असणारा. म्हणजेच, जो देश आणि जिथली प्रजा सदैव ज्ञानाच्या, सत्याच्या आणि अध्यात्माच्या प्रकाशात रममाण असते, तो देश म्हणजे ‘भारत’!
जगाला जेव्हा अज्ञानाच्या अंधाराने वेढले होते, तेव्हा आपले पूर्वज उपनिषदे, वेद आणि विज्ञानाचा शोध घेत प्रकाशाच्या वाटेवर चालत होते. म्हणूनच या भूमीला ‘भारत’ म्हटले गेले. या शब्दाचा आणखी एक व्यावहारिक अर्थ आहे. संस्कृतमध्ये प्रत्येक शब्दाच्या मुळाशी एक धातु असतो आणि त्यापासून तो शब्द तयार होतो. असाच एक धातु आहे ‘भृ’, ज्याचा अर्थ होतो ‘पोषण करणे’ किंवा ‘सांभाळणे’. जो भूभाग सर्व प्रजेला पोटशी धरून तिचे भरण-पोषण करतो, तिचे रक्षण करते, तो भारत; आणि भरण-पोषण पूर्वापार माता ज्या प्रेमाने करत आली आहे त्याच प्रेमाने आपण आज तिला ‘भारतमाता’ असेही म्हणतो.
ऐतिहासिक कथा
आपल्या देशाला ‘भारत’ हे नाव मिळण्यामागे इतिहासात आणि पुराणात वेगवेगळ्या महापुरुषांच्या अत्यंत रंजक कथा आढळतात.
त्यापैकी एक प्रसिद्ध कथा म्हणजे शकुंतलेच्या चक्रवर्ती पुत्राची. राजा दुष्यंत आणि राणी शकुंतला यांचा मुलगा ‘भरत’. हा मुलगा इतका शूर होता कि तो जंगलातल्या सिंहाची पिल्लं पकडून खेळायचा आणि त्यांचे दात मोजायचा! या सम्राट भरताने आपल्या शौर्याच्या जोरावर संपूर्ण आर्यावर्तावर एकाच छत्राखाली राज्य स्थापन केले. त्याच्या या अफाट पराक्रमामुळे या संपूर्ण देशाला ‘भारत’ हे नाव मिळाले आणि येथील प्रजा ‘भारती’ म्हणून ओळखली जाऊ लागली.
आणखी एक कथा आहे. ऋग्वेद काळात आर्यांची एक अत्यंत प्रबळ आणि शक्तिशाली टोळी होती, जिचे नाव ‘भरत’ होते. या भरत टोळीचा राजा सुदास याने ‘दाशराज्ञ युद्धात’ (दहा राजांच्या महायुद्धात) शत्रूंच्या अफाट सैन्याचा पराभव केला. रावी नदीच्या काठावर झालेल्या या ऐतिहासिक विजयानंतर या भरत प्रजातीचे वर्चस्व संपूर्ण आर्यावर्तात पसरले आणि हळूहळू संपूर्ण प्रदेशाला त्यांचेच नाव लाभले.
भारतवर्षाची इतर नावे
प्राचीन काळातील ऋषीमुनींना देशाच्या भौगोलिक सीमांचे अचूक भान होते. विष्णु पुराण’ या ग्रंथातील एका अत्यंत प्रसिद्ध श्लोकात म्हटले आहे की, जो देश समुद्राच्या उत्तरेला आणि बर्फाच्छादित हिमालयाच्या दक्षिणेला वसलेला आहे, तो देश ‘भारत’ आहे. पूर्वी या भूभागाला ‘अजनाभवर्ष’ किंवा ‘हेमंतवर्ष’ असेही म्हटले जायचे.
भारताच्या दक्षिण टोकावरील ‘कन्याकुमारी’ देवीच्या नावावरून दक्षिण आशियाई देशांमध्ये मूळ भारताला ‘कुमारीद्वीप’ असेही संबोधले. त्यामुळे त्याचा स्वीकार भारतात होताच. तसेच, आपल्या पूर्वजांनी देशातील सात प्रमुख पर्वतांना ‘कुलपर्वत’ मानले होते. महेंद्र, मलय, सह्य, शुक्तिमान, ऋक्ष, विंध्य आणि पारियात्र हे ते सात कुलपर्वत होत. आजचा आपला सह्याद्री पर्वत हा देखील त्यातलाच एक! या कुलपर्वतांतून उगम पावणाऱ्या गंगा, गोदावरी, नर्मदा, कृष्णा, कावेरी आणि सिंधू या नद्यांनी आपल्या भूमीला खऱ्या अर्थाने ‘सुजलाम् सुफलाम्’ बनवले आहे.
पण आपले पूर्वज केवळ भूगोलावर थांबले नाहीत. त्यांनी भारताला केवळ राहण्याची जागा मानले नाही, तर ती एक ‘कर्मभूमी’ आहे असे सांगितले. याचा अर्थ असा की, जगातले इतर देश हे केवळ भौतिक सुखाचा उपभोग घेण्याची ठिकाणे (भोगभूमी) आहेत, पण भारत ही अशी भूमी आहे जिथे माणूस आपले कर्तव्य पार पाडून, सत्कर्मे करून मोक्ष मिळवू शकतो. मार्कंडेय पुराणात तर असे म्हटले आहे की, प्रत्यक्ष स्वर्गातील देवही भारतात मनुष्य म्हणून जन्म घेण्यासाठी आसुसलेले असतात!
‘हिंदुस्थान’ ते ‘इंडिया’चा प्रवास
काळाच्या ओघात अनेक परकीय व्यापारी, प्रवासी आणि आक्रमक या देशात आले. सिंधू नदीच्या खोऱ्यात आल्यावर इराणी (पारशी) लोकांनी आपल्या सिंधू नदीला ‘हिंदू’ असे नाव दिले, कारण त्यांच्या इराणी भाषेत ‘स’ चा उच्चार ‘ह’ असा होत असे. यावरून ‘हिंदुस्थान’ हे नाव रूढ झाले. पुढे ग्रीक लोकांनी याच सिंधू (Indus) नदीवरून आपल्याला ‘इंडिया’ असे नाव दिले. वैदिक वाङ्मयात पृथ्वीच्या केंद्रस्थानी असलेल्या मुख्य भूभागाला ‘जंबुद्वीप’ असेही म्हटले गेले आहे, ज्याचा केंद्रबिंदू आपला भारत देश होता. इंग्रजांच्या काळात ‘इंडस व्हॅली’ वरून ‘इंडिया’ हे नाव रूढ झाले जे खरे तर ग्रीकांनी वापरले होते.
जेव्हा १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला देश स्वतंत्र झाला, तेव्हा आपल्या संविधानाने या दोन्ही नावांचा अत्यंत सलोख्याने आणि सन्मानाने स्वीकार केला. संविधानाच्या पहिल्याच कलमात लिहिले आहे: “India, that is Bharat, shall be a Union of States” म्हणजेच, “इंडिया, म्हणजेच भारत, हा राज्यांचा संघ असेल.”
शेवटी
‘भारत’ हा शब्द ऋग्वेदातील यज्ञीय अग्नीच्या तेजातून, चक्रवर्ती सम्राटांच्या पराक्रमातून आणि ज्ञानाच्या अखंड उपासनेतून (भा-रत) निर्माण झाला आहे. आधुनिक संविधानाने देखील या प्राचीन वारशाचा आदर ठेवून ‘भारत’ हे नाव स्वीकारले, जे या देशाच्या हजारो वर्षांच्या सांस्कृतिक आणि भौगोलिक अखंडतेची साक्ष देते. त्यामुळे, जोपर्यंत आपण या देशात ज्ञानाच्या आणि कर्माच्या वाटेवर चालत राहू, तोपर्यंत या भारतभूमीचे महात्म्य अबाधित राहील!