Friday, August 14, 2026

नांदेडमध्ये सुखबीर सिंह बादल यांच्यावर हल्ला, बादल सुखरुप,

Share

मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

महाराष्ट्रातील नांदेड येथे आज दुपारी पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दल (SAD) अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांच्यावर हल्ला झाला.

बादल आणि त्यांची पत्नी हरसिमरत कौर हे गुरुद्वारा माता साहिब देवान जी मुगत येथे पायऱ्या उतरतानाच एका व्यक्तीने त्यांच्यावर चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला.

या हल्ल्यात बादल यांच्या उजव्या हाताला जखम झाली असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना टाके घालण्यात आले असून ते आता धोक्याबाहेर आहेत. नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी सांगितले की, हल्लेखोर हा गुरुद्वाऱ्यातील सेवादार असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

या घटनेत बादल यांच्या विशेष सुरक्षा पथकातील महाराष्ट्र पोलीस कर्मचारी जखमी झाले. बादल दाम्पत्याने नांदेडमधील तख्त श्री हजूर साहिब ला भेट दिली होती.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या हल्ल्याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या दोन वर्षांत बादल यांच्यावर हा दुसरा हल्ला आहे. यापूर्वी डिसेंबर २०२४ मध्ये अमृतसरच्या सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता.

शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष अॅडव्होकेट हरजिंदर सिंह धामी यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी म्हटले की, हा हल्ला केवळ अँटी-पंथ मानसिकतेचा पुरावा नसून गुरु घराच्या प्रतिष्ठेचा आणि शीख धर्माचा अपमान आहे.

SAD प्रवक्ते डॉ. दलजीत चीमा यांनी या हल्ल्याला पुर्वनियोजित  रचलेले कटकारस्थान म्हटले आहे. पंजाब भाजप अध्यक्ष केवळ सिंह ढिल्लों आणि वरिष्ठ भाजप नेते रवीनीत सिंह बिट्टू यांनीही या घटनेचा निषेध केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सुखबीर सिंह बादल यांच्यासोबत फोनवरुन चर्चा केली, यावेळी बादल यांच्या प्रकृतीची विचारपूस देखील केली. सुखबिरसिंह बादल यांची प्रकृती स्थिर आहे.

अन्य लेख

संबंधित लेख